मणिमोहोर

युवा विवेक    07-Dec-2022
Total Views |

manimohor
 
 
 
मणिमोहोर…..
आज काय होईल वाटतंय सांगू? पत्रावरचं हे नाव वाचून कदाचित बऱ्याचजणांना पत्र कोणाला लिहिलंय ते कळणार नाही. पण जसं पुढं पुढं वाचत जातील, तसं निदान थोड्या जणांना तरी तुला पहायची इच्छा झाली ना तरी मी खुश होईन बघ.
 
या निसर्गात मला भुरळ घालणाऱ्या कितीतरी गोष्टी आहेत. त्यातलाच तू एक. तुझ्याशी ओळख कशी झाली होती ते मी तुला सांगितलं होतं का रे? मुळात तुला पाहण्याआधी तुझ्या नावाच्या प्रेमात पडले होते मी. आमच्या वर्गात बॉटनी शिकताना सरांकडून तुझा उल्लेख ऐकला. तुला माहीत आहे, तुझं हे मराठी नावही त्याच सरांनी दिलंय तुला. तर त्यांनी जे वर्णन केलं होतं ना तुझं ते ऐकून तुला पहायची खूप इच्छा झाली. त्यात आणि त्यांनी सांगितलं की तू आता दुर्मिळ होत चालला आहेस. मग तर काय! लवकरात लवकर तुझी भेट घ्यायला हवी असं वाटायला लागलं. 'शेवटचे दोन दिवस' अशी जाहिरात पाहिल्यावर बायका जशा लगबगीने सेलमध्ये जातात ना, तशी लगबग करायला हवी असं वाटून गेलं. हो...हल्ली काही सांगता येत नाही रे… रस्त्याकडेचं झाड आज आहे म्हणेस्तोवर उद्या रस्ता रुंदीकरणात तोडलं जातं. एक तर तू दुर्मिळ, त्यात असं काही तुझ्या नशिबी यायच्या आत मला तुला दिमाखात उभं असलेलं बघायचं होतं. म्हणून सरांनी जिथे जिथे म्हणजे दोन तीन ठिकाणी हे झाड आहे असं सांगितलं होतं, तिथं तिथं मी लगेच गेले होते. तुला पाहिलं तेव्हा फुलं तर खेळत नव्हती तुझ्या अंगावर, पण तरी मला तू आवडलास. फुलांच्या सिझनमध्ये परत तुझी भेट घ्यायची ठरवून टाकलं होतं तेव्हा. मणिमोहोर… नावातलं हे सौंदर्य प्रत्यक्ष बघायचं होतं ना! पण मधेच ना एक गंमत झाली. तुटता तारा बघितला की मनातली इच्छा पुरी होते म्हणतात ना...पण माहितेय? तसं काही न बघताही माझी इच्छा अचानकच पूर्ण झाली. तो इतका मोठा धक्का होता माझ्यासाठी की मी बहुतेक हवेतच चालायला लागले असेन तेव्हा. तुला भेटण्यासाठी मी गावभर कुठं कुठं भटकले होते. पण तू तर कायमच माझ्यासोबत होतास हेच मला उशिरा लक्षात आलं. माझ्या नेहमीच्या कामाच्या अड्डयावर एकदा गेले असताना अचानक समोर कसलातरी खच पडलाय असं दिसलं. हे एकदमच कुठून कसं काय आलं ते बघायला म्हणून जवळ गेले आणि आश्चर्याचा धक्काच बसला. अरे...समोर तर तूच उभा होतास. ते ही फुलांसकट. त्याच फुलांच्या पायघड्या तुझ्या बुंध्यात घातल्या गेल्या होत्या. कित्ती कित्ती आनंद झाला म्हणून सांगू तुला! जमतील तितकी फुलं गोळा केली आणि लांब जाऊन कितीतरी वेळ तुला वरपासून खालपर्यंत निरखत उभी राहिले. येणाऱ्या जाणाऱ्या लोकांनी वेडी म्हटलंही असेल कदाचित... पण त्याची कोणाला तमा! तुझी बाळं मात्र सरांनी वर्णन केली तश्शीच होती अगदी. लाल-केशरी मोहोर...त्यावरच्या कळ्या म्हणजे तर टपोरा मोतीच. मणिमोहोर नाव अगदी सार्थ ठरवणाऱ्या….मनमुराद बघून घेतलं तुला त्यादिवशी. नंतरही सोबत होतीच की तुझी.
 
पुढं मी ते गाव सोडून दुसरीकडे रहायला गेले. अर्थात आपल्या आवडीच्या गोष्टी सोडून जाताना कोणालाही वाईट वाटणारच ना! मलाही वाटलं. जुन्या सुगंधी आठवणी सोबत घेऊन नवीन गावात रुळत होते. हळूहळू जम बसत होता तिथं. अशातच एक दिवस बाहेर जाताना एका झाडावर नजर पडली. अगदी निष्पर्ण….पहिल्यांदा वाटलं वठलंय की काय. पण का कोण जाणे….ते झाड पाहिलं ना की आतून काहीतरी आपलेपण जाणवत होतं. पण खात्री वाटत नव्हती. मग हळूहळू त्यावर पानं आली आणि मग ठरलेल्या वेळी फुलंही. ती पाहून जी काय अवस्था झाली माझी विचारूच नकोस. अरे त्या गावातही तो तूच उभा होतास रे दिमाखात. अचानक समोर कोणी माहेरचं माणूस भेटावं ना तसं वाटलं तुला तिथं बघून. इतरांसाठी भलेही दुर्मिळ असशील तू. पण मला मात्र मी जाईन तिथं मला भेटशील असं वचन दिल्यासारखं भेटत होतास. खरंच माझ्यासाठी किती आनंदाची भेट होती ती. मला ना कायम तुमचं कौतुक वाटतं….लोकांना किती आनंद देता रे तुम्ही! ते ही कसलीही परतफेडीची अपेक्षा न करता. कोणाच्या अध्यात ना मध्यात...आपलं आपण जगावं, फुलावं, फळावं… सोबत दुसऱ्यांचंही आयुष्य फुलवावं. किती छान आयुष्य आहे तुमचं. पुढचा जन्म वगैरे काही खरंच असेल ना तर मला तुमच्या रुपात या पृथ्वीवर परत यायला आवडेल बघ.
 
अरेच्या….तुला पत्र लिहायला लागले आणि भावुक व्हायला झालं. तू म्हणशील किती वेडी आहे ही. पण खरंच तुझ्यामुळं वेडीच झालेय. त्यात आणि प्रत्येक ठिकाणची तुझी अनपेक्षितपणे मिळालेली सोबत पाहून तर भारावून गेलेय रे. अशी कोणाच्या सोबतीची सावली कायम बरोबर असली म्हणजे मग एकटेपण वाटत नाही अजिबात. अगदी रोज भेट होत नसली तरी तू माझ्या आसपास आहेस ही भावनाच मला शक्ती देऊन जाते. "जेथे जाते तेथे तू माझा सांगाती" अशी पक्की खात्री आता मला वाटायला लागलेय. खूप खूप खुश आहे मी. थँक्स म्हणू तुला?
तुझ्यासाठी वेडी…
जस्मिन जोगळेकर.