मातृभाषेच्या पालखीचे भोई

युवा विवेक    21-Feb-2022   
Total Views |

मातृभाषेच्या पालखीचे भोई

 
matrubhasha

मातृभाषा म्हणजे जिचा परिचय आईच्या पोटात असताना, बाह्य जग बघण्याच्याही आधी होतो अशी भाषा. कोणतीही भाषा ही केवळ बोलण्याचं माध्यम असते असं नव्हे तर, त्याचवेळी ती संस्कृतीची संवाहकही असते. भाषेच्या या कार्याचा विचार केला तर मातृभाषेचं महत्त्व अधिक अधोरेखित होत जातं. आज २१ फेब्रुवारी रोजी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन आहे. त्यानिमित्ताने मातृभाषेच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकण्याचा हा प्रयत्न.

 

इंग्लिश ही ग्लोबल व्हिलेजची म्हणजेच इंटरनेटमुळे अधिकाधिक जवळ आलेल्या विश्वरुपी खेड्याची भाषा आहे असं आपण मानतो. कालाच्या पटलावर ते आपल्याला खरं वाटत असलं तरी ते पूर्णसत्य नाही. आज जगात लोकांची सर्वाधिक बोलली जाणारी मातृभाषा आहे चीनी, त्याखालोखाल क्रमांक लागतो तो स्पॅनिश आणि मग इंग्लिशचा. त्यानंतरचा चौथा क्रमांक आहे तो आपल्या भारतीय भाषेचा, अर्थात हिंदीचा. त्यानंतर पहिल्या दहा क्रमांकांमध्येच बंगाली आणि मराठीचाही क्रमांक लागतो. म्हणजे इंग्लिशही सध्याची व्यवहाराची भाषा असली तरी मातृभाषेचे महत्त्व इथे जाणवतं. इंग्लिशचे महत्त्व कायम राखताना मातृभाषेकडे दुर्लक्ष करून कसं चालेल.

 

आपल्यापैकी कित्येकांना आईआजीने चिऊकाऊच्या गोष्टी सांगून भरवलं असेल, बडबडगीतांनी आपलं बालपण रमणीय केलं असेल, गोष्टीच्या पुस्तकांनी आपलं मन रमवलं असेल, अनेक साहसकथांनी, विज्ञान साहित्याने आपली जिज्ञासापूर्ती केली असेल, आपल्या भाषांमधील गाण्यांनी, प्रार्थनांनी, स्तोत्रांनी आपलं मन सुसंस्कारित केलं असेल, अनेक कथांनी आपल्या जाणिवा विकसित केल्या असतील. जे संचित आपल्याला आपल्या बालपणी लाभलं ते आपल्या पुढच्या पिढीकडे सोपवणं म्हणजे मातृभाषेच्या पालखीतून संस्कारांची ठेव पुढे संक्रमित करणं.

 

मातृभाषा आणि संस्कृतीचा अनन्यसाधारण संबंध असतो ही केवळ बोलण्याची बाब नाही. ते स्पष्ट करणारी उदाहरणं आम्हाला कॉलेजमध्ये अभ्यासायला मिळाली. रेन रेन गो अवे या कवितेचच घ्या. पाश्चात्त्य भूप्रदेशात पाऊस हा अखंड चिरचिर पडतच असतो. थंडीत त्यामुळे वातावरण अगदी असह्य होते, पण भारतासारख्या उष्ण कटिबंधीय आणि शेती हा प्राथमिक आर्थिक स्रोत असणाऱ्या प्रदेशात पाऊस हा ठराविक काळ पडणं हे अत्यंत गरजेचं. तेव्हा रेन रेन गो अवे हे येथील लोकांना कसं लागू पडेल. दुसरं उदाहरण आहे ते शेक्सपिअरच्या मिडसमर नाईट्स ड्रीमया नाटकाच्या शीर्षकाचं. युरोपादी भूभागात ग्रीष्म ऋतू हा प्लेझंट म्हणजे आनंददायी ऋतू मानला जातो. इथे या नाटकाच्या शीर्षकाचं भाषांतर मराठीत उन्हाळ्याच्या मध्यरात्री पडलेलं स्वप्न असं कसं करून चालेल. उन्हाळ्यात गर्मीने जीव जात असताना कुठून पडतील स्वप्न. म्हणून याचं भाषांतर केलं गेलं ते ऐन वसंतात अर्ध्या रात्री’. कारण आपल्याकडे वसंत हा आनंददायी मानला गेला आहे. हे सारं इथे सांगण्याचं कारण म्हणजे मातृभाषेचं महत्त्व जाणायला हवं आणि त्याचे संदर्भही जपायला हवेत.

 

भाषा मरता देश ही मरतो, संस्कृतीचाही दिवा विझेअसं कवी वसंत बापटांनी आपल्या कवितेत म्हटलं आहे. भाषा लोप पावली की तिचे सांस्कृतिक संदर्भही विझू लागतात. एकदा मातृभाषेचा वापर कमी झाला की पुढील चौथ्या पिढीपर्यंत भाषेचा लय झालेला असतो. हे शास्त्रीय दृष्टिकोनातून सिद्ध झाले आहे. मातृभाषांबद्दलची विलक्षण अनासक्ती असल्यामुळे आज जगाच्या पाठीवर अनेक भाषा लोप पावत चालल्या आहेत. अंदमान बेटावरची 'बो' ही भाषा जगातील अनेक पुरातन भाषांपैकी एक. बोआ सिनिअरया बो भाषेत बोलणाऱ्या शेवटच्या स्त्रीचं २०१० साली निधन झालं आणि तिच्याबरोबर तिची भाषाही अस्ताला गेली. बोआच्या निमित्ताने भाषा संस्कृतीतील एक दुवा निखळला. माणसाची मातृभाषा ही त्याची अस्मिता असते. समाज आणि संस्कृती यांच्याशी आपल्याला जोडून ठेवणारा दुवा म्हणजेच आपली भाषा. परंतु जेव्हा एखाद्यावर दुसरी भाषा लादली जाते, तेव्हा आपल्या भाषेशी असणारे नाते तुटते आणि त्याची मानसिक कुचंबणा होऊ लागते. अशा वातावरणात माणूस स्वत:ला असुरक्षित समजू लागतो. लक्षात घ्या, बंगाली ही मातृभाषा असलेल्या पूर्व पाकिस्तानावर अन्यायकारक अशी ऊर्दूची सक्ती करण्यात आली आणि तीच खदखद पुढे बांग्लादेशच्या निर्मितीला कारक ठरली.

 

भारतासारख्या बहुभाषिय राष्ट्रात एकाच भाषेचा आग्रह हा सक्तीचा ठरू शकतो आणि इंग्लिश नाकारणं हे जगापासून फारकत घेणं ठरू शकतं. या दोन्हीचा सुवर्णमध्य काढण्याची जबाबदारी आपल्यासारख्या तरुणांची आहे. आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनाची २०२२ची संकल्पना आहे ती बहुभाषिय शिक्षणासाठी तंत्रज्ञानाचा वापर आव्हाने आणि संधी. मातृभाषा ही व्यवहार भाषा व्हावी हा खरं तर आपल्यासाठी सोनियाचा दिनू ठरेल. पण भारतासारख्या अनेक भाषांचं अस्तित्व असणाऱ्या देशात ही संकल्पना राबवणं हे आव्हान असू शकेल कदाचित, पण भविष्यात ते वरदानही ठरू शकेल. मातृभाषा, परिसर भाषा, राष्ट्रभाषा आणि व्यवहार भाषा या साऱ्यांचं सहअस्तित्व व महत्त्व स्वीकारून स्वतःची आणि देशाची प्रगती साधणं हे आपल्यासमोरचं ध्येय असायला हवं.

 

एखाद्याला इंग्लिश येत नाही म्हणून त्याला प्रगतीची, भावी शिक्षणाची दारं बंद होणं हे अत्यंत धोकादायक आहे. भारतात स्थानिक भाषा असूनही आजही अनेक स्पर्धा परीक्षा, प्रवेश परीक्षा मात्र इंग्लिशमधून घेतल्या जातात. 'नीट'ची (NEETची) अर्थात राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा आता भारतीय भाषांतून घेण्यास सुरुवात झाली असली, तरी अन्य स्पर्धा परीक्षांमध्ये वेगवेगळ्या प्रमाणपत्र अभ्यासक्रमात जर भारतीय भाषांचाही पर्याय उपलब्ध झाला तर विद्यार्थ्यांची इंग्लिशची भीती कमी होईल, त्याचबरोबर परीक्षार्थींचा टक्काही वाढेल. अतिशय कौशल्यपूर्ण काम करणारे विद्यार्थी इंग्लिशच्या भीतीपायी अभ्यासक्रमांना प्रवेश घेणं टाळतात. याच परीक्षा स्थानिक भारतीय भाषेत घेतल्या गेल्या, तर अशा कोर्सेसकडे येण्याचा विद्यार्थ्यांचा कल वाढेल आणि ते रोजगारक्षम होतील.

 

मातृभाषा, मातृभाषेतील-परिसरभाषेतील शिक्षण, त्यातील सांस्कृतिक संदर्भ याकडे सकारात्मकपणे पाहणं हे आज गरजेचं झालं आहे. गेल्या पंचवीसेक वर्षात इंग्लिश माध्यमातून शिक्षण घेण्याच्या प्रभावामुळे आधीच मराठीची पिछेहाट सुरू झाली आहे. आता आपली भाषा टिकवण्याची, जोपासण्याची जबाबदारी मुख्यत्वे तरुण पिढीवर आहे. कारण तरूण पिढी ही तरूण, ज्येष्ठ आणि बाल या तीनही पिढ्यांचा सांधा जुळवणारी पिढी असते. आपल्याला मातृभाषेची पालखी वाहणारे भोई व्हायचंय.

 

मृदुला राजवाडे