आत्ममग्न समाजाला दिशा देणारा सिनेमा...

युवा विवेक    23-Feb-2022   
Total Views |

आत्ममग्न समाजाला दिशा देणारा सिनेमा...


pawankhind 

पावनखिंड सिनेमा येणार असं जाहीर झाल्यापासून सिनेमा पाहायचा असं ठरलं आणि प्रदर्शित झाल्याच्या दुसऱ्या दिवशी तो पाहायलाही मिळाला. काय नाहीय या सिनेमात. सिनेमा सुरू होतो आणि पहिल्यांदा सिंधुताई सपकाळ, बाबासाहेब पुरंदरे, लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहिलेली समोर येते. प्रमोद कहार हा सिनेमाचा संकलक कोरोनाच्या काळात गेल्यामुळे त्यांच्यावरची मिनिटभराची फिल्म दिसते. त्यांच्याबद्दलची ही कृतज्ञताच आपल्याला भावते. या दृश्यांपासूनच आपण एकदम सिनेमाशी कनेक्ट होतो. सिनेमाच्या सुरुवातीलाच निर्माण झालेला हा जिव्हाळा आपल्याला सिनेमाच्या कोशात खेचून घेतो आणि मग सत्यात उतरत जातं ते स्वराज्य प्रेमाचं जिवंत रसायन.

 

घोडखिंड ते पावनखिंड हा इतिहास आपल्या सगळ्यांना माहिती असणारा आहे, पण हा इतिहास आजच्या काळाशी जोडून घेण्याचं कौशल्य या सिनेमाच्या माध्यमातून दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी अतिशय यथोचितपणे साधलं आहे. आताच्या काळात आत्ममग्न झालेल्या, स्वत्व हरवलेल्या समाजात इतिहासाच्या एका घटनेचं पुनरुज्जीवन करून प्राण फुंकण्याचं महत्त्वाचं काम या सिनेमाच्या निमित्ताने होईल अशी आशा निर्माण झालेली आहे. ‘ज्याला स्वार्थ दिसतो, त्याला स्वराज्य प्रेम दिसणार नाही आणि त्याला स्वामीनिष्ठाही कळणार नाही’, असला संवाद आपल्याला वर्तमान परिस्थितीची जळजळीत जाणीव करून देणारा आहे. स्वदेश, स्वराज्य आणि त्याची आस असणारा समाज काय करू शकतो, हे इतिहासात आपण वाचत असतो, पण ते जेव्हा डोळ्यांसमोर घडतं तेव्हा त्यातला जिवंतपणा मनात अधिक उतरत जातो.

 

या सिनेमाचं वैशिष्ट्य म्हणजे यातली भाषा. उगाच जड, शब्दबंबाळ भाषा न वापरता आजच्या काळातील सोपी, सुटसुटीत आणि सहज भाषा वापरून स्वराज्य प्रेमाचा ज्वलंत इतिहास प्रेक्षकांसमोर उभा केलेला आहे, तो थेट प्रेक्षकांच्या मनापर्यंत पोहोचणारा आहे. म्हणून राजांची झालेली एन्ट्री प्रेक्षकांनाहर हर महादेवची घोषणा द्यायला भाग पाडते आणि जय भवानी जय शिवाजी गर्जनेनं प्रेक्षागृह दुमदुमून जातं. यातच भर म्हणून आपलं स्वराज्य प्रेम दाखवताना आलेला प्रासंगिक विनोदही प्रेक्षकांना हसायला लावतो, वेळप्रसंगी रडवतो, आणि सतत अंतर्मुखही करतो.

 

अखंड 12 तास चाललेली लढाई आणि त्या लढाईत एकापेक्षा एक वरचढ ठरणारी बांदल सेना आपल्या डोळ्यांत अंजन तर घालतेच, पण वेळोवेळी पाणीही आणते. एकावेळी गर्जना देणारा प्रेक्षक अनेक प्रसंगात मुसमुसताना दिसतो. प्रेक्षागृहात तरुणांची असणारी जोरदार उपस्थितीही जास्त महत्त्वाची आहे.

 

भावनांना हात घालत, आपल्या मनातील स्वार्थावर काम करत, त्याग आणि समर्पणामुळे, तो त्याग आणि समर्पण अर्थातच व्यक्तिगत नाही तर स्वराज्यासाठीचा त्याग मोठा करत, आताच्या काळात आपण किती क्षुद्रपणे जगतो आहोत ही भावना प्रेक्षकांच्या मनात निर्माण करून, स्वराज्याची ज्वाला मनात धगधगत ठेवत, सतत प्रेक्षकांना आत्ममग्नतेची जाणीव करून देत आपल्या मनातील देशप्रेमाची ज्योत धगधगत ठेवायला मदत करणारा आहे. आजच्या सोशल मीडियाच्या वॉरमध्येही तरुणांच्या मनात स्वराज्य प्रेमाची धग जागी ठेवण्यासाठी अशा सिनेमांची अत्यंत गरज असण्याच्या काळात पावनखिंड येणं हे सुचिन्ह आहे, असं मानायला काहीच हरकत नाही.

 

आपल्या स्वार्थासाठी आपण लढत असलेली लढाई आणि महाराज, त्यांच्या मावळ्यांनी स्वराज्यासाठी लढलेली लढाई यात जमीन - अस्मानाचं अंतर आहे. स्वप्न दाखवणं, जिद्द पेरणं आणि माणसं उभी करण्याची प्रक्रिया महाराजांनी केली आणि त्याला फळ आलं ते त्यांच्या मावळ्यांच्या रूपाने आणि इतिहास घडला. इतिहास घडला तो प्रेरणेचा, जिद्दीचा आणि स्वराज्य प्रेमाचा. आजही तो इतिहास आपली मान उंच करतो, आपल्या मनात स्वराज्य प्रेम प्रखर करतो आणि त्यातून देशप्रेमाचं एक रोपटं रुजतं. ते रोपटं रुजवण्याचं काम हा सिनेमा करेल आणि या सिनेमा अष्टकातील पुढचे सिनेमे पूर्ण होईपर्यंत या रोपट्याचा वृक्ष झालेला असेल. हेच या सिनेमा अष्टकाचं यश असेल. त्यासाठी सिनेमाच्या सगळ्या टीमला शुभेच्छा!!!

- डॉ. अर्चना कुडतरकर