शिवजन्मोत्सव !

युवा विवेक    25-Feb-2022   
Total Views |

शिवजन्मोत्सव !

 
shivjayanti

सालाबादप्रमाणे यंदाही अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात आली. हे नाव उच्चारताच धमन्यांमधील रक्त वीरश्रीने तापते व रोमारोमात देशभक्तीचा संचार होतो. गेली शंभराहून अधिक वर्षं केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर अवघा हिंदुस्थान गोब्राह्मणप्रतिपालक शिवरायांची जयंती एखाद्या कुलाचाराप्रमाणे साजरी करतोय. लोकमान्य टिळकांनी या उत्सवाची सुरुवात केली ही बाब जगजाहीर आहे, परंतु एखाद्या चळवळीला जेव्हा राष्ट्रीय स्वरूप प्राप्त होते, त्या वेळी तिच्या संकल्पनेपासून सिद्धीपर्यंत राबवलेल्या प्रत्येक कृतीला एक विशेष महत्व इतिहासात प्राप्त होते. याच घटनांचा मागोवा आपण या लेखात घेऊ या.

 

विचारांची बीजं रोवली गेली :

ही कल्पना १८९६ साली साकार झाली असली, तरी १८८५ साली म्हणजेच दहा वर्षांपूर्वी घडलेल्या एका घटनेने लोकांचे लक्ष वेधून घेतले होते आणि ती घटना म्हणजे कुलाब्याच्या जंगल खात्यातील एका अधिकाऱ्यांने मुंबई सरकारकडे समाधीच्या डागडुजी करीता केलेली विनंती. झाले असे की, सात आठ वर्षांपूर्वी मुंबईचे गव्हर्नर 'सर रिचर्ड टेंपल' रायगड पहायला गेले व त्या वेळी रायगडावर वस्ती नसल्यामुळे तिथे अनेक प्रकारची झाडेझुडपे नांदू लागली होती. कोळीष्टकांनी आणि लहान सहान दगड धोंड्यांनी कब्जा केला होता. हे दृश्य पाहून टेंपल साहेबांनी कुलाब्याच्या कलेक्टरला 'अशा इतिहासप्रसिद्ध स्थळाच्या डागडुजीकडे तुमचे लक्ष कसे गेले नाही अशा आशयाचे पत्र पाठवले होते' आणि म्हणून ही विनंती केली व ती वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाल्यामुळे लोकांमधे याविषयी चर्चा रंगू लागली. १८८५ साली गोविंद बाबाजी जोशी नामक ग्रंथकार ही चर्चा वाचून प्रथमतःच रायगड पहायला गेले व तिथली दु:स्थिती पाहून एक सबंध ग्रंथच लिहून काढला‌. विशेषतः डग्लस या लेखकाने महाराजांची समाधी अशा स्थितीत आहे याबद्दल केवळ त्यांच्या वंशजांनाच नव्हे, तर सामान्य माणसांनाही दोष दिला, ही बाब जोशी यांच्या मनाला फार लागली व त्यांनी एका चळवळीला सुरुवात केली. परंतु‌, ती चळवळ साफसफाई करिता सालाना ५ रूपयांच्या निधी मंजुरीनंतर जवळजवळ बंदच पडली. त्यानंतर जवळपास १० वर्षांनी हा उत्सव साजरा केला गेला.

 

पुनश्च चर्चा रंगू लागली :

२० एप्रिल १८९४ साली आर.पी. करकेरिया यांनी अफजलखान वधाविषयी तत्कालीन समाजामध्ये असलेल्या गैरसमजांचे निराकरण करणारा आणि प्रतापगडचा इतिहास सांगणारा 'प्रतापगडचा किल्ला' या विषयावर मुंबईच्या रॉयल एशियाटिक सोसायटीपुढें एक निबंध वाचला. यामुळे टिळकांना लोकांमधे देशभक्तीचा प्रसार होताना दिसला व 'केसरी'ने हा विषय लावून धरला. अनेक लेख प्रसिद्ध होऊ लागले व लोक याकडे आकर्षित होऊ लागली. लवकरच वैयक्तिक चळवळीमुळे 'केसरी'कडे वर्गण्या यायला सुरुवात झाली. लोकमान्यांना ही चळवळ केवळ एका व्यक्तीपुरता मर्यादित ठेवायची नव्हती, ती सर्वांची व्हावी हा या लोकवर्गणी मागील हेतू होता.

 

यासंदर्भात ३० मे रोजी हिराबागेतील मैदानावर एक सभा पार पडली. तिथे चाफळकरस्वामींपासून अनेक सरदार जहागिरदार उपस्थित होते. तिथे दोन ठराव मांडण्यात आले, पहिला १८८५ ची चळवळ व ही जवळ एकच आहे हा होता, तर दुसरा कमिटी नेमण्याबाबत होता. शेवटी पन्नास, पंचावन्न गृहस्थांनी नावे या कमिटीत घातली होती.

 

पुढे दादासाहेब पंत यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी नेमण्यात आली. छत्रीच्या खर्चाचा अंदाज घेतला असता तो आकडा वीस पंचवीस हजारांवर गेला. (हा आकडा त्या काळातला आहे बरं !) ही रक्कम जमा झाल्यास पुढच्या गोष्टींकडे लक्ष देण्याचे ठरले. हळूहळू वर्गणी जमू लागली. २० ऑगस्टला वर्गणीचा आकडा ६५०० पर्यंत गेला तर मार्च (१८९६) मधे हा आकडा १६००० वर गेला. ही सारी माहिती 'केसरी'तून प्रसिद्ध होत होती‌. १५ एप्रिल हा दिवस उत्सवासाठी ठरला होता. लोकांच्या उत्साहाला नुसते उधाण आले होते. कोणी कविता करत होते, गडकिल्ल्यांची प्रवासवर्णने, ऐतिहासिक संशोधने वर्तमानपत्रात छापून येत होती, उत्सवासाठी अनेक कल्पना पत्राद्वारे लोक कळवत होती. महाडकर उत्सवाकरिता एक विशेष वर्गणी राबवीत होते, तर पुण्यासही एक वेगळी कमिटी नेमण्यात आली होती. यातच २९ डिसेंबर १८९५ रोजी टिळकांनी रे मार्केटच्या भव्य मैदानात सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांच्या समवेत एक सभा घेतली व स्फुर्तीदायक वातावरण तेवत ठेवले.

 

अडचणी आणि मार्ग :

ज्या प्रमाणे या उत्सवासाठी साहाय्यक म्हणून माणसे पुढे आली त्याचप्रमाणे हा उत्सव होऊ नये यासाठीदेखील काही मंडळी प्रयत्न करित होती. 'हा उत्सव ब्राह्मण भोजनासाठी आहे', 'केसरीमधे प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातींचे पैसे टिळक पैसा फंडातून वजा करतील', अशा प्रकारचे तथ्यहीन आक्षेप काही मंडळी घेत होती. टाईम्सने तर 'इंग्रजांनी निधी मंजूर केला असताना, या चळवळीची गरज काय' असा आक्षेप नोंदवला होता; पण ही चळवळ स्वयंस्फूर्त आहे असे उत्तर एका इचलकरंजीच्या गृहस्थाने देऊन त्यांचे यथोचित खंडन केले होते. अर्थातच सगळ्यांना अगदी चोख उत्तरे मिळाली. अशा छोट्या-मोठ्या अडचणी येत असताना ऐन उत्सवाच्या वेळी एक विघ्न येऊन ठेपले, आणि ते म्हणजे जंगल खात्याने संमती दिली असता हा उत्सव जत्रा कायद्याअंतर्गत येतो ही सबब सांगून कलेक्टरने नाकारलेली परवानगी. लगेच टिळक महाबळेश्वर येथे गेले व आधी कौन्सिलदारकांची व नंतर गव्हर्नर साहेबांची भेट घेतली. अखेर परवानगी मिळाली व उत्सव ठरल्या वेळेवर त्याच उत्साहाने पार पडला. विस्तारभयास्तव उत्सवाच्या इतर तपशीलावर न बोलता इथेच लेखणीला विराम देते. टिळकांनी महत्प्रयासाने लोकांमधे एकात्मता आणि राष्ट्रीय भावना निर्माण व्हावी यासाठी हा उत्सव सुरू केला. तो आज आपण कुठे नेऊन ठेवला आहे, याबाबत सुज्ञ वाचकांनी विचार करावा. म्हणूनच हा लेखनप्रपंच.

 

संदर्भ : १) लोकमान्य टिळक यांचे चरित्र खंड १ - न.चिं.केळकर.

© मृण्मयी गालफाडे