वृद्धाश्रमाचा टॅबू झटकण्याची गरज

युवा विवेक    26-Feb-2022   
Total Views |

वृद्धाश्रमाचा टॅबू झटकण्याची गरज

 
vruddhashram

'आईबापाला वृद्धाश्रमात ठेवणारी मुलं किती दुष्ट आहेत?'

'अरेरे, बिचाऱ्यांवर मुलं असतानाही इथे राहण्याची वेळ आली.'

'कसं बरं ठेवलं आईवडिलांना इथे...'

एखाद्या व्यक्तीला वृद्धाश्रमात ठेवल्यावर असं उसासे टाकत म्हणताना किती सहजपणे आपण दोषारोपांच्या पट्ट्या मुलांच्या कपाळावर चिकटवतो. वृद्धांच्या समस्यांवर उत्तर शोधण्यापेक्षा वृद्धाश्रमात ठेवण्याचा निर्णय फार सहजपणे मुलं घेतात, कसे आईवडिलांना सोडून देतात अशी चर्चा समाजात लगेचच सुरू होते. पण बदलत्या सामाजिक रचनेचा, बदलत्या कुटुंबव्यवस्थेचा विचार करून या वृद्धाश्रमासारख्या व्यवस्थांकडे आवश्यकता म्हणून पाहणे गरजेचे आहे. आयुष्याच्या एका टप्प्यावर स्वतःची काळजी, औषधे-पथ्यपाणी याचा काटेकोर विचार करणं गरजेचं असतं. समाधानी वृद्धापकाळात अशा व्यवस्था महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतात. फक्त या सगळ्याकडे मुलं म्हणून, भावी वृद्ध म्हणून, केअरटेकर म्हणून आणि सामाजिक जबाबदारी म्हणून आपण कसं बघतो हेही महत्त्वाचं आहे.

 

वृद्धाश्रमांची आवश्यकताच का निर्माण झाली यावर चर्चा होणं गरजेचं आहे. पूर्वी एकत्र कुटुंबपद्धती होती. वैद्यकीय व्यवस्थांचा, सोयीसुविधांचा अभाव, आर्थिक चणचण यांमुळे साधारणतः माणसाचं आयुर्मान कमी होतं. एकत्र कुटुंबात तरुणांची संख्याही त्याच प्रमाणात असल्यानं घरातल्या घरातच वृद्धांची काळजी घेणं सोपं जाई. पूर्वीच्या काळी पुरुष अर्थार्जनासाठी बाहेर पडले तरी स्त्रीवर्ग घरी असे, त्यामुळे घरात कोणीच नाही अशी परिस्थिती नसे. घराबाहेर पडलेल्यांना घरातील वृद्धांची काळजी करावी लागत नसे. पण काळ बदलला त्याप्रमाणे व्यवस्थाही बदलत गेल्या. आरोग्य, शिक्षण, अर्थार्जन याच्या बदललेल्या गरजा, त्यासाठी स्थलांतरं यामुळे विभक्त कुटुंबपद्धती निर्माण झाली. उंबरठ्याच्या आड राहिलेल्या स्त्रिया शिकू लागल्या, आपल्या अस्तित्वाच्या शोधासाठी आणि अर्थार्जनाच्यासाठी घराबाहेर पडू लागल्या. त्यामुळे वृद्धांची काळजी घेणं, त्यांच्या वैद्यकीय समस्या, भावनिक गुंतागुंत सोडविण्यासाठी घरात कोणी नाही अशी स्थिती अनेक घरांत निर्माण झाली. चार-पाच अपत्यांची संख्या कुटुंबनियोजनामुळे अनेक घरांत एक किंवा दोनवर आली. (भविष्यात म्हणजे आपल्या उतार वयात ती कदाचित एक किंवा शून्य अशीही झालेली असू शकेल.) त्यामुळे वृद्धांची काळजी घेण्याची जबाबदारी विभागली जाण्याचं प्रमाणंही आटत गेलं. या सगळ्या गोष्टी परिस्थितीजन्य असल्या तरी अनेक कारणं ही मानवकेंद्रीदेखील आहेत. माणसांनी आपलं विश्व चार भिंतीच्या आत कोंडून घेतलं. शेजारपाजार-परिचित यांच्याशी असणारे ऋणानुबंध आटले. वास्तविक स्नेहपूर्ण शेजारामुळे अनेकदा नोकरदार वर्ग हा घरातल्या वृद्धांबाबत आश्वस्त राहू शकतो. पण पाश्चिमात्यांच्या प्रभावाखालील टाऊनशिप कल्चरमध्ये ही संस्कृती लोप पावत चालली आहे.

 

या व अशा अनेक कारणांमुळे वृद्धाश्रम व्यवस्थेचे महत्त्व अधोरेखित होत चाललं आहे. नको असणारे आईवडील सोडून देणे वा अगदीच कठोर शब्दात सांगायचं तर टाकून देणे ही वृद्धाश्रमाची पूर्वीच्या काळी असलेली व्याख्या बदलत गेली आहे. काळाप्रमाणे होणारा हा एक मोठा बदल आहे. घरात एकटंच राहणारं वृद्ध जोडपं किंवा एकेकटे राहणारे वृद्ध अनेक आरोग्यविषयक समस्यांना तोंड देत असतात. अनेकांची घरं वस्तीबाहेर किंवा स्वतंत्र असतात. अशी वेळी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून एकटं राहण्याची भीती वाटत असते. काही विनापत्य किंवा अविवाहित जोडप्यांच्या वृद्धापकालाचा प्रश्न हा अधिक गंभीर असतो. कारण जबाबदारी घेणारं कोणी नसतं. कधी एकाच घरात दोन दोन आजारी माणसं असतात. काही अतिवृद्ध हे आजारामुळे किंवा अपघातामुळे अंथरुणाला खिळून असतात व घरात नर्स ठेवून सगळं करून घेणं आर्थिकदृष्ट्या आणि परक्यावर विश्वास ठेवण्याबाबत परवडत नाही. माणसांचं आयुर्मान वाढल्याने नव्वदीच्या आईवडिलांचं सगळं करणारी मुलंही सत्तरीकडे झुकलेली असतात. त्यांचंही वय बोलत असतं. पुढच्या पिढीची काळजी घेण्याचीही जबाबदारी त्यांच्यावर असते, त्यामुळे दोन्हीकडचे तीर सांभाळणं कठीण होतं. अशा अनेक कारणांमुळे वृद्धाश्रम हा शाप ठरण्याऐवजी आधारभूत ठरू शकतो. वृद्धांच्या समस्या आणि त्याची व्याप्ती ही बदलत व वाढत गेली आहे. केवळ पैसा किंवा नकोसं असणं हेच त्यामागचं कारण असत नाही.

 

भारतीय संस्कृतीत वानप्रस्थाश्रमानंतर संन्यासाश्रम सांगितलेला आहे. पूर्वीच्या काळी तसं घडतंही असावं. वृद्धाश्रम हा सुखकर संन्यासाश्रमच म्हणता येईल. जिथे आपण लहानाचे मोठे झालो ते घर, आपले स्वकष्टार्जित घर, आपली जन्मभराची गुंतवणूक खर्चून घेतलेलं घर अशी भावनिक गुंतवणूक असणं अजिबात गैर नाही; पण अनेकदा काळाची गरज म्हणून वृद्धाश्रमात जाण्याचा निर्णय योग्य वयात घेणं इष्ट ठरतं. विशेषतः जे अविवाहित आहेत वा अपत्यविहीन आहेत त्यांनी फारच प्रॅक्टिकलपणे या गोष्टीचा विचार केला पाहिजे. काही ठिकाणी थेट वृद्धाश्रम नाहीत, पण ठराविक रक्कम गुंतवून तुमच्या अंतिम क्षणांपर्यंत राहण्याची सोय होईल अशा स्कीम्सही आहेत. निम्न मध्यमवर्ग ते श्रीमंत आर्थिक गट अशा सर्व आर्थिक स्तरांना परवडतील असे वृद्धाश्रम आज उपलब्ध आहेत.

 

या सगळ्यापलीकडे जाऊन सामाजिक जबाबदारी म्हणून सगळ्यांनीच याचा विचार केला तर मध्यममार्ग काढणंही शक्य होईल. परिसरातील, सोसायटीतील युवकांनी आळीपाळीने वृद्धांची सामाजिक, आरोग्यविषयक जबाबदारी घेणं, त्यांना वेळ देणं, त्यांच्या भोजनाची सगळ्यांनी जबाबदारी वाटून घेणं, त्यांच्या घरात विश्वासू माणसं नेमणं, त्यांच्यावर देखरेख ठेवणं, वृद्धांची मुले बाहेरगावी असतील तर त्यांच्याशी संपर्कात राहणं, गरज पडल्यास वैद्यकीय मदत करणं, वृद्धाश्रमात ठेवले असल्यास त्यांना भेटणं, वेळ देणं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांची भावनिक आंदोलनं समजून घेणं. ठराविक दिवसांनी आपल्या जवळच्या वृद्धाश्रमात जाऊन समयदान करणं, त्यांच्यासोबत वेळ घालवणं. यामुळे दोन गोष्टी होतील. आपल्या आसपासच्या वृद्धांना वृद्धाश्रमात ठेवावं लागणार नाही. गरजेनुसार ठेवलंच तरी आपण आपली सामाजिक जबाबदारी पूर्ण केल्याचं समाधान मिळेल.

 

वृद्धाश्रम ही सामाजिक गरज झाली आणि ती योग्यही असली तरी ती तडजोड स्वरूपातील असेल. कारण, अपना घर तो अपना होता है. पण वृद्धाश्रम व्यवस्थेबाबतचा टॅबू मनातून दूर करणं अत्यावश्यक आहे. तितकीच आवश्यक आहे आपली जबाबदारी ओळखणं. सगळ्या पिढ्यांमधील सेतू बांधण्याची जबाबदारी युवा पिढीच्या खांद्यावर अधिक आहे. एक पाऊल पुढे टाकण्याची गरज आहे. कारण आज ते जात्यात आहेत आणि आपण सुपात आहोत, उद्या कदाचित आपणही जात्यात असू. भरडलं जायचं की नाही हे आपलं आपण वेळीच ठरवायला हवं.

 

- मृदुला राजवाडे