लाडू

युवा विवेक    03-Feb-2022   
Total Views |

लाडू


ladoo 

लाडू... अस्सल भारतीय पदार्थ! भारतातील एकही गाव नसेल जिथे लाडू करत नाहीत. सण कोणताही असो, जगाच्या कोणत्या तरी कोपऱ्यात भारतीय लाडू खात असतील. व्यक्तीच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत हा गोड पदार्थ सोबत करतो , असं म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. “शादी का लड्डू, तर इतका प्रसिद्ध आहे की, आता लाडू कधी खायला देणार?” असा प्रश्न विचारल्यावर मुलगा-मुलगी आपसूक लाजतात किंवा त्यांना लाजावे लागते!

 

गोडमिट्ट आणि गोलगुटुक अशा लाडवांचा इतिहास मात्र रंजक आहे. आपल्या गणपतीबाप्पालाही लाडू अतिशय आवडतात, इतका जुना इतिहास आहे. आयुर्वेदात, वेदांमध्येही लाडूचा उल्लेख आहे. शल्यक्रियेचे जनक सुश्रुत यांनीही तीळ, गूळ आणि शेंगदाणे यांचे लाडू औषधांसोबत द्यावे, असे सांगितले आहे. खरं तर लाडूचा शोध औषध म्हणून लागला. मुलींचे हॉर्मोन्स बॅलन्स होण्यासाठी मेथी, मखाना आणि काही पौष्टिक पदार्थ घालून, त्याचे लहान बॉल्स वळून खायला देत असत. आजच्या भाषेत फंक्शनल फूड किंवा न्यूट्रस्युटिकल! या अशा औषधी लाडूंचा आपण भारतीयांनी इतका मेकओव्हर केला की, आता डॉक्टर सांगतात, “लाडू कमी खा किंवा खाऊच नका.लाडूचे हजारो प्रकार असतील ना! एका वृत्तपत्राने लाडू विशेषांकछापला होता आणि तो विशेषांक कित्येक वर्षे आमच्या घरी जपून ठेवला होता. अगदी बापुडवाण्या, गरीब पोळीच्या लाडूपासून ते केवळ ड्रायफ्रूट्सने सजलेल्या महाराणी लाडूपर्यंत शंभरेक प्रकार छापलेले होते. आमच्या घरी त्यातले दोन-चार प्रकार केले गेले आणि इंटरनेटच्या जमान्यात त्या विशेषांकाची रवानगी रद्दीवाल्याकडे झाली. रद्दीवाल्याने ते कागद भेळवाल्याला विकले असतील आणि त्यावर दिलेली तिखटजाळ भेळ पाहून रेसिपीमधल्या लाडूच्या डोळ्यात पाणी आले असेल!

 

लाडूची पाककृती पाहिल्यास रवा/डाळीचे पीठ तुपात खरपूस भाजावे आणि थंड झाल्यावर पिठीसाखर मिसळून लाडू वळावे.” इतकी सोपी वाटते. नीट भाजला न गेल्यामुळे लाडू खातांना टाळूला च्युईंगमसारखा चिकटला, तूप जास्त झाल्यामुळे फतकल मांडून बसला की, समजते, हे काम तितके सोपे नाही. अजून नारळीपाक आणि बुंदी अशा साखरेचा पाक असलेल्या दुप्पट कठीण प्रकारांबद्दल बोलायलाच नको. कदाचित म्हणूनच लाडू भाजण्याचे काम घरातील मोठ्या आणि अनुभवी स्त्रीला दिले जाते. तुपात बेसन भाजतांना खमंग सुवास घरभर दरवळतो शिवाय शेजारच्या घरीही डोकावून येतो. गरमागरम लाडू खाण्याची मज्जा खासच असते, न मुरलेले कैरीचे लोणचे जसे खास असते तशीच! यावर मी एक शक्कल शोधली आहे, लाडू मायक्रोवेव्हमध्ये किंवा लहान कढईत गरम करून खायचा.

 

गहू, तांदूळ, नाचणी, मूग, हरबरा, नारळ, सुकामेवा, डिंक, मेथी, मुरमुरे, तीळ, शेंगदाणे अशा अनेक पदार्थांचे लाडू करता येतात आणि ते सगळे प्रकार लोक आवडीने खातात. बेसनापासूनच बेसन, रवा-बेसन, मोतीचूर, बुंदी असे चार प्रकार, तर मला माहीत आहेत, अजूनही असतील. याबद्दल लिहायला आणि रेसिपीज शिकायला काही वर्षे कमी पडतील! साध्या हलवायाच्या दुकानात, चहाच्या टपरीवर, श्रीमंत लोकांच्या डायनिंग टेबलवर कुठेही लाडू सहज अॅडजस्ट होतो आणि मिरवतोही! हलवायाच्या दुकानात बुंदी, मोतीचूर असे लाडू सहज मिळत असले तरी, बेसनाचे लाडू मात्र घरी केलेलेच हवेहवेसे वाटतात. चितळे बंधू यांनी रेडिमेड मिक्स आणले ते याचमुळे. आजही मार्केटमध्ये पाहिल्यास अनेक कंपन्यांनी रेडिमेड मिक्स आणले आहेत. फक्त बेसनाचं नव्हे तर नाचणी, ओट्सचे लाडू देखील आहेत. हल्दीरामचे मोतीचूर, बेसन, आटा, बुंदी, जोधपुरी लाडू आहेत. अनेक घरगुती उद्योग करणाऱ्या स्त्रिया डिंकाचे आणि इतर लाडू विकतात.

 

आजही डिंकाचे, मेथीचे लाडू हिवाळ्यात खातात, बाळंतिणीला खायला देतात ते शक्ती मिळण्यासाठी. यातील मुख्य पदार्थ म्हणजे साखर/गूळ, डाळीचे पीठ आणि तूप. प्रोटीन, कार्बोहायड्रेट्स आणि फॅट, तीन आवश्यक नुट्रीएंट्स. साखरेचे प्रमाण जास्त असल्याने आणि साखरेतून कोणतीही उपयोगी जीवनसत्वे मिळत नसल्याने लाडवांना फिटनेसच्या दुनियेत गुन्हेगार म्हणून घोषित केलेले असले तरी, ती चूकही आपलीच आहे. आयुर्वेदिक रेसिपी प्रमाणात खाल्यास आपल्यासाठी हानिकारक नक्कीच नाही किंबहुना आता आपण त्याला अजून पौष्टिक रूप देऊ शकतो! साखरेऐवजी स्टिव्हियासारखे नैसर्गिक स्वीटनर वापरून, इतर प्रोटीन असलेले पदार्थ वापरून हा पदार्थ बनवल्यास गिल्टफ्री डेझर्ट ठरू शकेल. गुळातही तितक्याच कॅलरीज असतात आणि बाकी नुट्रीअंट्स अगदी कमी प्रमाणात मिळतात. लहान मुलांसाठी किंबहुना सगळ्या वयोगटातील लोकांसाठी, समस्यांसाठी सायंटिस्ट लोकांनी प्रतिकारशक्ती वर्धक, न्यूट्रस्युटिकल लाडू बनवायला हवे मग कदाचित वैद्य सुश्रुत यांच्या वारसा चालवल्याचे समाधान मिळेल!

- सावनी