घरगुती हिंसाचार कधी थांबेल?

युवा विवेक    11-Mar-2022   
Total Views |

घरगुती हिंसाचार कधी थांबेल?


domestic violence 

१० मार्च २०२२ रोजी सकाळपासून पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूक निकालांची रणधुमाळी सुरू होती. जसजसे आकडे बदलत होते, तसतसे निकाल वृत्तवाहिन्यांच्या वेबसाईटवर अपडेट होत होते. वेबपोर्टल्सवर अपडेट्स पाहताना एका बातमीनं माझं लक्ष वेधून घेतलं. दोन उच्चशिक्षित सुनांचा मांत्रिकाच्या साहाय्याने अघोरी कृत्य करून शारीरिक आणि मानसिक छळ केल्याप्रकरणी पुण्यातील एक व्यावसायिक, त्यांची दोन मुलं, मांत्रिक यांच्यासह नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे सारं घडलंय ते घराण्याला, वंशाला दिवा हवा म्हणून!

 

निवडणूक निकालांच्या बातम्यांच्या मांदियाळीत ही बातमी अक्षरशः हरवून गेली होती; पण म्हणून तिची तीव्रता नक्कीच कमी होत नाही. निवडणूक निकालांचा अन्वयार्थ लावताना ही बातमी माझं मन खात होती.

 

नुकताच, ८ मार्च रोजी आपण जागतिक महिला दिन साजरा केला. घरात, कार्यालयात, शाळांमध्ये, सार्वजनिक स्थळी वेगवेगळ्या प्रकारे कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. कुठे भेटवस्तूंच्या स्वरूपात, कुठे हॉटेलिंग, तर कुठे नवे कपडे. कार्यालयांत सजावट करण्यात आली, घरातल्या बाईला सरप्राईज देण्यात आलं. कालाच्या फुटपट्टीवर मोजलं, तर हे सकारात्मक चित्र असलं, तरी स्त्रीवर्गाचा खूप मोठा टक्का हा आजही अन्यायाला तोंड देतो आहे, हे सत्य नाकारता येणार नाही. शिक्षणाच्या सोयीसुविधा, आरोग्याच्या सोयीसुविधा, सामाजिक समानता, प्रगतीची समान संधी, नोकरीची समान संधी अशा अनेक पातळ्यांवर आजही स्त्रियांना झगडावं लागतंय, स्वतःच्या अस्तित्त्वासाठी धडपडावं लागतंय. 'डोमेस्टिक व्हायलन्स' (घरगुती हिंसाचार) हा त्यातलाच एक प्रकार. आज तळागाळातल्या अशिक्षित महिलांपासून ते श्रीमंतांपर्यंत अनेक जणी या हिंसाचाराला तोंड देत आहेत; पण घराच्या, शयनकक्षाच्या चार भिंतींच्या आतल्या हिंसाचाराचा आक्रोश अनेकदा उंबरठ्याच्या बाहेर ऐकूच येत नाही.

 

२०२०मध्ये प्रकाशित झालेल्या एका लेखात मिळालेल्या माहितीनुसार दर तीन स्त्रियांपैकी एका स्त्रीला घरगुती हिंसाचाराला तोंड द्यावं लागतं आणि दहापैकी एक स्त्री याविरोधात तक्रार नोंदवते. घरगुती हिंसाचारात पुढील गोष्टींचा समावेश होतो. एक, शारीरिक हिंसा - यात कानाखाली मारणं, लाथ मारणं, मारहाण करणं याचा समावेश होतो. दोन, लैंगिक अत्याचार यात बळजबरीने लैंगिक संबंध ठेवणं, लैंगिक अत्याचार करणं यांचा समावेश होतो. तीन, मानसिक छळ अपमान करणं, कमी लेखणं, सतत मानहानी करणं, जीवाची भीती दाखवणं, मुलांपासून दूर करण्याची भीती दाखवणं याचा समावेश होतो. चार ताबा मिळवणं यात कुटुंबापासून, मित्रांपासून एकटं पाडणं, हालचालींवर लक्ष ठेवणं, आर्थिक स्रोत-शैक्षणिक-रोजगार-आरोग्यसुविधा यांच्यावर बंधनं आणणं या सगळ्याचा समावेश घरगुती हिंसाचारामध्ये होतो. याला अनेक कारणं असू शकतात. हुंडा, शिक्षण, रोजगार, लैंगिक असमाधान, मूल होण्याची मागणी, विवाहबाह्य संबंध, शैक्षणिक स्वातंत्र्य, अगदी स्वयंपाक आवडत नाही, रूप आवडत नाही, स्वभाव आवडत नाही किंवा दुसऱ्या कुणावरचा रागसुद्धा कारण असू शकतं. पुरुषाचं व्यसन, कमी शिक्षण, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विवेकाचा, समजुतदारपणाचा अभाव अशा कोणत्याही कारणाने घरगुती हिंसाचार घडून येतो.

 

भारतात स्त्रीला फार पूर्वीपासून समान दर्जा राहिलेला आहे. तिला शक्तीचं रूप मानलं जातं; पण काळाच्या ओघात, परकीय आक्रमणांच्या परिणामामुळे स्त्री उंबरठ्याच्या आत कैद झाली. तिच्या सर्वांगीण प्रगतीवर मर्यादा आल्या, त्यांचा अवकाश संकुचित होत होत चूल आणि मूल यात सामावला. त्यामुळे तिच्या सामाजिक स्थानावरही त्याचा परिणाम झाला. स्त्री ही आपल्यापेक्षा कमकुवत आहे, हा समाजाने पुरुषवर्गाला करून दिलेला समज आहे, तितकाच तो स्त्रियांच्याही मनात भरलेला आहे. पुरुषाच्या मानाने स्त्रीची शारीरिक ताकद कमी पडते हे खरं असलं, तरी मानसिक ताकदीच्या बाबतीत ती तितकीच किंबहुना अधिक सबल असल्याचं वेळोवेळी दिसून आलं आहे. घरगुती हिंसाचाराबाबत मात्र स्त्रियांच्याही मनात आज तितकी जागृती नाही, त्याच्या विरोधात न्याय मागताना नेहमीच वेगवेगळ्या कारणांना कच खाल्ली जाते असंही पाहण्यात आलं आहे. समाज काय म्हणेल, मुलं काय म्हणतील, घरचे काय म्हणतील अशा अनेक प्रश्नांनी ती ग्रासलेली असते.

 

२६ ऑक्टोबर २००५ रोजी घरगुती हिंसाचारविरोधी कायदा अस्तित्त्वात आला. घरगुती हिंसाचाराविरोधी कायद्यामुळे महिलांना संरक्षण मिळाले. कायदा त्याचे काम करेलच. निरनिराळ्या सामाजिक संस्थाही स्त्रियांना मदत करण्यासाठी तत्पर आहेत; पण मुळात गरज आहे ती अन्यायाविरोधात आवाज उठवण्यासाठी स्त्रियांमध्ये असलेल्या स्वत्वाच्या, अस्तित्त्वाच्या जाणिवेची. समाजाच्या तळागाळातील स्त्रियांना अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण याचा समान वाटा मिळण्याची. त्याचप्रमाणे तिच्यातील आद्यशक्तीची तिला जाणीव करून देण्याचीही आवश्यकता आहे. यासह गरज आहे ती या कायद्याचा दुरुपयोग होणार नाही याकडे लक्ष ठेवण्याची. कारण अपप्रवृत्ती सर्वांमध्ये असू शकतात. त्यामुळे प्रत्येक तक्रारीचं सखोल विश्लेषण करून तिला/त्याला योग्य शिक्षा मिळणं आवश्यक आहे.

 

स्त्रियांना न्याय मिळावा, त्यांचा छळ होऊ नये यासाठी युवापिढीवर, बालकांवर समानतेचे संस्कार होणं आवश्यक आहे. घरातील स्त्री व पुरुषाला समान वागणूक मिळत असल्याचा, त्यांना एकमेकांकडून आदर मिळत असल्याचा, एकमेकांच्या मताचा, मानसिक स्थितीचा विचार केला जात असल्याचा त्यांना अनुभव करून देणं ही गरजेचं आहे. इथे मुद्दा शिक्षणाचा, आर्थिक स्थितीचा नाही, तर तो आहे सजग नागरिक घडवण्याचा. त्यासाठी आपल्या मूळ भारतीय संस्कारांचा अंगिकार करण्याची गरज आहे.

 

लेखाच्या सुरुवातीला उल्लेखलेल्या प्रकरणाचा तपास होईल, सत्यासत्यता पडताळली जाईल, त्याचा जो काही निष्कर्ष निघेल त्यानुसार आरोपीला शिक्षाही होईल; पण घरगुती हिंसाचार करण्याच्या प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी आपण सर्वांनी हातात हात घेऊन, समान न्यायाचा पुनरुच्चार करणं, आपल्या आजूबाजूला-घरात हे घडत असेल तर त्या विरोधात आवाज उठवणं ही काळाची गरज आहे. कारण अन्याय करणं हा गुन्हा असेल, तर तितकाच मोठा गुन्हा आहे तो सहन करणं आणि अक्षम्य गुन्हा आहे तो निमूटपणे पाहत राहणं. चला, डोळे-कान उघडे ठेवूया आणि आपला विवेक जागृत ठेवूया. घरगुती हिंसाचाराचा नायनाट करण्यासाठी पाऊल पुढे टाकू या.

 - मृदुला राजवाडे