जिलेबी

युवा विवेक    17-Mar-2022   
Total Views |

जिलेबी


jilebi 
 
तुम्हीही हे गाणं सुरात गायलात ना? इन्स्टाग्रामवर काही महिने या गाण्याच्या रील्सने धुमाकूळ घातला होता. समुद्रकिनारा की पहाड, कॉफी की चहा असे पर्याय स्क्रीनवर झळकायचे आणि आवडत्या पर्यायाकडे लोक धावायचे, बॅकग्राऊंडला हे गाणं. मी बरेच रिल्स पाहिले, पण एकाही रिलमध्ये जिलेबी आणि कॉम्पिटिशनला दुसरा पदार्थ असा पर्याय नव्हता. जिलेबीशी स्पर्धा कोणी करूच शकत नाही. (हे खोटं आहे. गुलाबजाम, पुराणपोळीसमोर जिलेबी जिंकणं अवघड आहे; पण आज तिच्यावर लेख आहे म्हणून साखरेच्या पाकाइतकं गोड लिहिणार आहे!) जिलेबी, जलेबी, जिलेपी (बांग्लादेश), झुलबिया (इराण) अशी वेगवेगळी नावे आहेत. हा प्रकारही इराणमधून भारतात आला म्हणतात. मैदा, यिस्ट, पाणी यांचे मिश्रण फर्मेंट करायला ठेवायचे, दुसऱ्या दिवशी हे पीठ गोलाकार आकारात तळायचे आणि तयार जिलेबी साखरेच्या पाकात मुरवायची. ही सोप्या भाषेतील रेसिपी! बेकिंग सोडा घालून रवा किंवा मैद्याची इन्स्टंट रेसिपीही आहे. ड्राय यिस्ट बाजारात मिळायला लागण्याआधी पिठाला फर्मेंट करून, त्यात मायक्रोबियल ग्रोथ करून, 'खमीर' नावाचा प्रकार लोक करायचे. खमीर करायला, तापमानानुसार २-३ दिवस लागतात आणि मग पीठ फर्मेंट करायला परत एक दिवस! या सगळ्या मेहनतीपेक्षा बाजारातून जिलेबी आणण्याकडे लोकांचा कल जास्त असायचा, आजही आहे. जिलेबीला तसं सणावाराच्या पंगतीत स्थान जवळपास नाही, लग्न-मौंजीसारख्या कार्यक्रमात पंगतीत भाव जास्त! इतर दुग्धजन्य पदार्थांपेक्षा स्वस्त आणि जास्त काळ टिकणारा पदार्थ म्हणून सर्वांना परवडणारा.
 

जिलेबी मला कायम शाळेत ठीकठाक मार्क मिळवणाऱ्या; पण दिवसभर सगळीकडे भटकणाऱ्या, काकू लोकांच्या गप्पांमध्ये भाग घेणाऱ्या, ब्युटीपार्लर वगैरे सुरू करून बक्कळ पैसे मिळवण्याची स्वप्ने पाहणाऱ्या लहानशा गावातील मुलीसारखी वाटते. गावात 'शेरनी'; पण शहरात गेल्यावर हीच मुलगी अंडरकॉन्फिडन्ट वाटते, जशी जिलबी बर्फी, बासुंदी, गुलाबजाम समोर लाजरीबुजरी वाटते. हीच मुलगी शहरात गेल्यावर चारपाच महिन्यांनी एकदम चकाचक मेकओव्हर करून शहरातील मॉडर्न दिसणाऱ्या मित्र-मैत्रिणी मिळवते आणि तिच्या गुणांना अचानक भाव मिळतो. रबडी-जिलेबी, मावा जिलेबी असाच चकाचक शहरी प्रकार. हा मान अजून तरी जिलेबीच्या चुलत बहिणीला म्हणजे इमरतीला मिळाला नाहीये. (उडदाचे घराणे आहेच तसे तिरसट!) हलवाईच्या दुकानात गेल्यावर बर्फी, कलाकंद, म्हैसूरपाक वगैरे मंडळी मस्त काचेच्या पेटीत आरामात बसलेली असतात पण गरीब, केविलवाणी जिलेबी मात्र काउंटरच्या बाजूलाच असते. ढोकळा, फाफडा, समोसा असं कोणासोबत जोडी जमवली, तरच तिच्याकडे लक्ष जातं. लग्न-मौंजीतही जिलेबी आणि मठ्ठा हे शहाण्या लोकांनी कॉम्बिनेशन करून ठेवले आहे. गुजराती लोक सकाळी (रोज नव्हे) फाफडा आणि जिलेबी नाश्त्याला खातात, त्यांना कोपरापासून नमस्कार! इतका 'अनहेल्दी' नाश्ता, तर पंजाब्यांचा छोले-भटुरेही नाहीये. इंदूरमध्ये बरेच लोक सकाळी-सकाळी गरम दूध आणि जिलेबी खातात. जिलेबीला एकटीला फार महत्त्वच नाही, कोणाचा तरी सपोर्ट हवा.

 

जिलेबीचा जीव असतो तो तिच्या टेक्श्चरमध्ये. गरमागरम नसली, तरी पाकात मुरलेली आणि कुरकुरीत हवी! पाकाचे प्रमाण, तापमान आणि जिलेबी मुरवण्यासाठीचा वेळ याचं गणित चुकलं की, जिलेबीने मान टाकलीच म्हणून समजा. तशी उदास आणि पेंगुळलेली जिलेबी कोणालाही आवडत नाही. साखरेचा पाक असतांनाही खुसखुशीत नव्हे, तर कुरकुरीत टेक्श्चर टिकवणे कौशल्याचे काम. पीठ जास्त फर्मेंट झाले, तरी जिलेबी तळतांना विरघळते किंवा वेडावाकडा आकार धारण करते. केशरी-पिवळ्या रंगासाठी काही हलवाई केशर घालतात; पण बहुदा फूड कलर्सच वापरतात! इमरती हा जिलेबीचा उडदाच्या डाळीपासून बनवलेला आणि वेगळा आकार, रंग असलेला प्रकार. मला तरी कधीच आवडला नाही. (त्यामुळेच तितकासा प्रसिद्ध नसावा.) खवा घालून केलेली आणि तुपात तळलेली जिलेबी मी एकदा खाल्ली होती. अतिशय टेस्टी आणि अर्थात तब्येतीसाठी चांगली नाही; पण एखादी चाकोळी खायला हरकत नसावी. हो, चाकोळी हा शब्द मी दुसऱ्या कोणत्याही पदार्थाबद्दल वापरलेला ऐकला नाहीये.

 

गिट्स कंपनीने जिलेबी मिक्स कधीच मार्केटमध्ये आणले. एमटीआर, आनंद या ब्रॅन्डचेही रेडिमेड मिक्स मिळते. फ्रोझन जिलेबी अजून तरी सगळीकडे मिळत नाही. गुलाबजाम आणि जिलेबी मिक्सची कृती तशी सारखीच, पीठ भिजवून, तळून, पाकात मुरवायचे पण जिलेबीचा आकार सर्वांना जमत नाही आणि मग सरळ हलवाईकडे ऑर्डर दिली जाते.

 

नव्वदच्या दशकातील धारा कंपनीची जाहिरात आठवतेय? जिलेबीचे नाव घेतल्याबरोबर, घर सोडून निघालेला गोंडस मुलगा घरी परत येतो आणि घर सोडून जाण्याचा प्लॅन दहा-पंधरा वर्षांनी पुढे ढकलतो. रबडी आणि जिलेबी कॉम्बिनेशन पाहिले मला पारिजातकाच्या फुलाची आठवण होते. माझ्या प्रत्येक लेखात शेवटी त्या पदार्थासाठीचा आयडियल सीन असतो; पण आज काही खास सुचलं नाही. जनताजनार्दनाला आपलासा वाटणारा हा पदार्थ आहे. मग एक घटना आठवली. लहानपणी एकदा खूप हिंमत करून कोल्हापुरी तिखट मिसळ खायची ठरवलं. भावाशी स्पर्धा करायची होती. 'मी पण रेग्युलर मिसळ खाणार, कम स्पायसी नाही', असा हट्ट धरला. दोन घास खाल्ल्यावर चार जिलेब्या खाव्या लागल्या. त्या हॉटेलमध्ये फक्त भजी, मिसळ आणि जिलेबी मिळत होती. आजही तो प्रसंग आठवला की अंगावर काटा येतो. त्या दिवशी मला जिलेबीने वाचवले! त्यामुळे शतशः आभार आणि मनःपूर्वक नमन जिलेबीदेवीला.

- सावनी