व्यथा मृगाच्या आयुष्याची..!

युवा विवेक    02-Mar-2022   
Total Views |

व्यथा मृगाच्या आयुष्याची..!

 
व्यथा

सायंकाळ झाली होती. दीड-दोन वर्षांची मृगा अंगणातल्या लाल मातीत खेळण्यात रमली होती. तिच्या बाजूला तिच्यावर लक्ष ठेवायला तिचा आज्जा खाटेवर बिड्या फुंकीत बसला होता. 

गल्लीत पिंपळाच्या झाडाखाली मृगाचा बा चिंतेत डोक्याला हात लावून मावळत्या सूर्याला पाहात बसला होता. सांज सरेनाशी झाली होती त्याला. दुपारपासुन उपाशी होता बिचारा. एक-एक तास त्याला एक-एक दिवसासारखा वाटत होता !

 

अधूनमधून बायकोला कळा येत असल्या की, याच्या जीवाला धडकी भरायची. गावच्याला दवाखाना नसल्यानं बाळंतपण गावच्या म्हाताऱ्या बायकाच करत असायच्या. दिवस मावळतीला आला. चहूकडे अंधार पसरला होता !

दिवस अस्ताला गेला तशा सुमीच्या वेदना वाढल्या होत्या. कळा तीव्र झाल्या होत्या अन् आता तिला राहवत नव्हतं. अतोनात हालअपेष्टा ती सहन करत होती. अखेरीस वेळ आली अन् सुमी बाळंत झाली. तिने सुटकेचा निःश्वास सोडला.

 

घरात बाळ रडण्याचा आवाज आला. मृगाच्या बाच्या डोळ्यांतून अश्रूंचा पाट वाहू लागला. आजी नातवाला घेऊन तिच्या लेकाकडे आली. मृगाचा बा त्या लहानशा गोऱ्यापान, लालसर मांसाच्या गोळ्याकडं बघत आसवांचे टिपूस गाळत होता. गावभर आनंदीआनंद झाला..!

सुमी निपचित पडुन होती. आता तिच्या बाजूला तिचा लेक तिच्या जवळ होता. सासूबाईंची नातवाची दृष्ट काढायची हौस चालू होती. मृगाचा बा गावभर पोरगं झाला या आनंदात शिळणी वाटत होता.

 

या सर्वांत मृगाचा विसर सर्वांना पडला होता. परक्याची लक्ष्मी आताच परकीच झाली होती. दीड-दोन वर्षांच्या या लेकराला कुणी जेवायला पण बोलत नव्हतं; ते मात्र लाल मातीत खुश होतं कारण त्याला या मातीत खेळायला, ती खायला आज अडवणार कुणी नव्हतं..!

मृगाचा आजा नातू झाल्याच्या आनंदात गावच्या बाजूला असलेल्या वस्तीत गेला होता, गावरान दारू प्यायला म्हणून. आज त्याला अडवायला त्याचा लेक पण नव्हता. त्यामुळे त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.

 

जसा जसा अंधार पडत गेला मृगाचे डोळे छोटेछोटे होत गेले. शेवटी कंटाळून मृगा घरात आली. आजीने दिलेला फिका वरण-भात खाऊन, तिच्या माय जवळ येऊन झोपून राहीली. तिला नको होती कुठली गोष्ट अन् नको होती बाहुली तिच्यासोबत झोपायला..!

दिवसभर खेळून-खेळून दमलेली मृगा शांत झोपी गेली होती. तिची माय मात्र जागेपणी लेकाचे स्वप्न रंगवत त्याच्या स्वप्नात रंगली होती. यात तिलापण थोडा का होईना मृगाचा विसर पडला होता अन् मृगा वयाच्या दीड-दोन वर्षांतच परक्या घरचं धन झाली होती.

 

- भारत लक्ष्मण सोनवणे