इडली

युवा विवेक    03-Mar-2022   
Total Views |

इडली


idli

दिल्ली ६ मधील "ये दिल्ली है मेरे यार, बस इष्क, मोहोब्बत, प्यार" या गाण्याच्या चालीवर दक्षिण भारतातील शहरांसाठी मी, "ये चेन्नई है मेरे यार, बस इडली, डोसा, सांबर" असं म्हणत असते. चेन्नईऐवजी बँगलोर, कोचीन, हैदराबादही चालेल. मराठी जेवणाचं मला प्रचंड कौतुक आहे; पण कमी कॅलरीज असलेली इडली माझ्या मते स्वस्त, मस्त आणि पौष्टिक नाश्ता. उडुपी लोकांनी इडली आणि इतर दक्षिण भारतीय पदार्थांना भारतातील कानाकोपऱ्यात पोहोचवलंय आणि जगप्रसिद्ध इकोटेल आर्किड हॉटेलचे मालक, विठ्ठल कामत यांनी आत्मचरित्रपर पुस्तकाला चक्क 'इडली, आर्किड आणि मी' असं नावही दिलेलं आहे. तसं पाहिल्यास हा काही शाही पदार्थ नव्हे किंवा आपल्या कोणत्या सणाला यावाचून अडतं असंही नाही, पण दक्षिण भारतीय लोकांच्या घरातील पान (खरोखरच केळीचे पान) इडलीशिवाय हलत नाही.


इडलीचा जन्म भारतातच झाला, पण काही इतिहासकारांच्या मते इडली ही इंडोनेशियामधून भारतात आली. कारण भारतात तेव्हा वाफवण्याची भांडी उपलब्ध नव्हती. इसवीसन ९२० मध्ये शिवकोटयाचार्य यांच्या "वाद्दराधने" या कन्नड ग्रंथात ईड्डालिंगेचा उल्लेख आढळतो. इसवीसन ११३० मधील संस्कृत मानसोल्लासामध्ये इडलीला 'इड्डरीका' तर सातव्या शतकातील तमिळ मक्कापुराणाममध्ये 'इटली' या नावांनी संबोधले आहे. तांदूळ आणि उडद डाळीचे मिश्रण फर्मेंट करून, वाफवून इडली करतात. मिक्सरच्या जमान्यात तर खरोखर सोपी पाककृती आहे. तांदुळासोबतच गहू किंवा तांदुळाचा रवा, नाचणी तर अलीकडे ओट्सच्याही इडल्या करतात. महाराष्ट्रात तर भगर किंवा वरईच्या इडल्या उपवासाला खातात. सांबर, नारळाची चटणी, टोमॅट्याची चटणी, पोडी (दक्षिण भारतातील डाळींची कोरडी चटणी) यासोबत सहसा इडली खातात. टोमॅटो केचप/सॉस किंवा शेजवान सॉससोबत इडली खाणाऱ्या लोकांना शिक्षा म्हणून चटणीसाठी नारळ सोलून, फोडून, ते खोवायला बसवायला हवं. इडली थोडीफार सारखीच असली तरी सांबार आणि चटणी पाचही राज्यात वेगवेगळी असते. तामिळनाडू आणि केरळचा सांबार मसालेदार, तेलंगणा, आंध्र प्रदेशचा सांबार काहीसा तिखट तर कर्नाटकमधील सांबार काहीसा गोडसर असतो. नारळाची पांढरीशुभ्र चटणी तामिळनाडूमध्ये मिळते तर कर्नाटकमध्ये त्यात कोथिंबीर, कधीकधी शेंगदाणेही घालतात. तामिळनाडूच्या कांचीपुरम इडलीत ड्राय फ्रुट्सही असतात. ही कोविल (मंदिर) इडली नावानेही प्रसिद्ध आहे कारण कांचिपुरमच्या मंदिरात मिळते.


आपल्या गरमगरम वरणभात, तूप, लिंबू या कॉम्बिनेशनसाठी ज्या भावना आहेत, त्याच भावना दक्षिण भारतीयांच्या इडली-सांबारसाठी आहेत. पूड-चटणी किंवा तमिळमध्ये पोडी म्हणतात त्यासोबत इडली भन्नाट लागते, सोबत तूपही हवे. मिनी इडल्या किंवा इडल्यांचे तुकडे करून, फोडणी देऊनही पोडी इडली करतात, अप्रतिम चव! गुंटूर पोडी इडली म्हणून तिखटजाळ पोडीचा तेलात पोहत असलेला एक प्रकार नक्की खाऊन पाहण्यासारखा आहे. कर्नाटकमध्ये रवा इडलीत कोथिंबीर, जिरेही घालतात, त्यामुळे पांढरीशुभ्र दिसत नाही आणि पीठही काहीसे जाडसर असते. दुसऱ्या महायुद्धादरम्यान जेव्हा तांदुळाचा तुटवडा होता, तेव्हा बँगलोरमधील 'मावली टिफिन रूम्स' (MTR) या प्रसिद्ध रेस्तराँने रवा इडलीचा शोध लावला. फर्मेंटेशन केल्यामुळे कार्बोहैड्रेट्स आणि प्रोटीन पचायला अतिशय हलके होतात, त्यात यीस्ट किंवा बेकिंग सोडा मात्र अजिबात घालू नये. चेन्नईमधील इनियायन या इडली विक्रेत्याने ३० मार्चला 'जागतिक इडली दिन' म्हणून घोषित केले आणि आता जगभर हा दिवस साजरा केला जातो. आपल्या डिफेन्स फूड रिसर्च लॅबोरेटोरीने अवकाशात घेऊन जाता येईल अशी 'स्पेस इडली', सांबर आणि चटणीची पावडरही तयार केलेली आहे!! पूर्वी जेव्हा इडलीपात्रे उपलब्ध नव्हते तेव्हा केळीच्या पानावर पीठ वाफवले जायचे तर कधीकधी त्याच्या ढोकळ्यासारख्या वड्या पाडल्या जायच्या.


सिमेंट, वाळू एकत्र दळतात तश्या एका यंत्रात तांदूळ आणि डाळीचे मिश्रण दळले जात आहे, असे चित्र अनेक मॉल, दुकानांमध्ये दिसते. हे पीठ घरी आणून त्याच्या इडल्या करण्याचे प्रमाण जास्त आहे. एक पत्र्याची पेटी डोक्यावर घेऊन, रिक्षाचा हॉर्न हाताने वाजवत इडल्या विकणारे अण्णा सर्वांच्या परिचयाचे आहेतच. गिट्स, एमटीआर, चितळे, टाटा संपूर्णम, आयडी, आशीर्वाद अशा असंख्य ब्रँडचे इन्स्टंट इडलीचे पीठ मिळते. एमटीआर या कंपनीने तर रागी, रवा, बीटरूट, राईस, मिलेट असे अनेक प्रकार लॉन्च केले आहेत. रेडी टू ईट, ब्रेकफास्ट बॉक्स, कप-इडली या स्वरूपातही हा पदार्थ मिळतो. हा पदार्थ जगभर पोहोचलेला आहे, हेल्दी आहे, कमी कॅलरीज असलेला आहे, प्रोसेस्ड स्वरूपातही सगळीकडे मिळतो आता मॅकडोनाल्डसारख्या चेन्स उघडल्या पाहिजेत, पण ते कामही भारतात उडुपी रेस्टारंटने केलेले आहे. आता काय मंगळावर नेणार इडलीला? असं उपहासानेही म्हणू शकत नाही, 'स्पेस इडली' स्पेससूटसह तयार आहे, जाऊ शकते. हा पहिला पदार्थ आहे ज्यात मला काही सुधारणा, सजेशन्स सुचत नाहीयेत आणि ही अभिमानाची, कौतुकाची बाब आहे!


सकाळी सकाळी चेन्नईच्या रत्ना कॅफेमध्ये जावे आणि "ओर इडली प्लेट, ओर कॉफी" अशी आपल्या मराठी अक्सेंटमध्ये ऑर्डर द्यावी. आपला तोडकंमोडकं तामिळ बोलण्याचा प्रयत्न पाहून, ऐकणारा जाम खूश होतो. सांबर पिऊन टाकणाऱ्या त्या मऊसूत इडलीचा आस्वाद घेत फिल्टर कॉफी प्यावी, इंस्टंट साऊथ इंडियन झाल्याची फिलिंग येते! परदेशात गेल्यावरही आपल्या या स्टीम्ड राईस केकचे कौतुक ऐकवावे. हिरव्या केळीच्या पानावरची पांढरीशुभ्र इडली पाहून मला 'हम आपके है कौन' मधील 'जुते दे दो' गाण्यातला माधुरीचा घागरा आठवतो, तसेच कॉम्बिनेशन होते ना! केळीचे पान त्यावर पांढरीशुभ्र, मऊमऊ इडली, परफेक्ट मसाला घातलेला सांबार, नारळाची चटणी ही स्वर्गीय चव नसली तरी आपल्या सर्वांच्या दैनंदिन आयुष्यात या कॉम्बिनेशनचे स्थान अढळ आहे.
 
- सावनी