डॉक्टर म्हणून जगवताना

युवा विवेक    07-Mar-2022   
Total Views |

'डॉक्टर म्हणून जगवताना'

 
doctor

आज एका वेगळ्या विषयावर लिहिते आहे. 'जे जे आपणासि ठावे ते ते इतरांसि सांगावे' या समर्थांच्या उक्तीप्रमाणे माझ्या वाचनात आलेले हे पुस्तक आपणही वाचावे व आनंद घ्यावा, असे वाटले म्हणून हा लेखनप्रपंच. गेल्या दोन वर्षांपासून वैद्यकीय क्षेत्राचे महत्त्व प्रकर्षाने जाणवू लागले आहे. या क्षेत्रात काम करणाऱ्या माणसांविषयी मनात कमालीचा आदरभाव निर्माण झाला आहे. तो याआधी नव्हता असा नव्हे, पण त्यांची माणूस जगवण्याची धडपड आपण 'याची देही याची डोळा' प्रत्यक्ष पाहिल्यामुळे तो द्विगुणित झाला आहे. रोज किती तरी माणसांची आयुष्य जवळून बघणारे 'डॉक्टर कसे जगतात ?' हा प्रश्न आपल्यासारख्या सामान्य माणसांना पडतोच. याचे उत्तर दिले आहे डॉ.सलभा ब्रह्मनाळकर यांनी 'डॉक्टर म्हणून जगवताना' या पुस्तकात.

 

हे आत्मचरित्र नव्हे किंवा हे लोकांना मार्गदर्शनासाठी लिहिलेलं पुस्तकदेखील नव्हे. असं त्या स्वतःच प्रस्तावनेत म्हणतात. या पुस्तकात केवळ त्यांना प्रॅक्टिस करताना आलेले अनुभव आहेत. त्या कराड येथील एक प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ आहेत. २०१४मध्ये स्वेच्छानिवृत्ती स्वीकारेपर्यंत तब्बल तीस वर्ष अनेकांच्या सुखदुःखाच्या साक्षीदार आहेत. तीस वर्षे ! दोन तपांपेक्षा अधिक काळ. या काळात घडणारी वैद्यकीय स्थित्यंतरे त्यांनी उघड्या डोळ्यांनी पाहिली आहेत, नव्हे अनुभवली आहेत. डॉक्टरांना देव मानणारा काळदेखील बघितला आहे व एका डॉक्टरांकडे तपासल्यावर त्यांच्यावर विश्वास न ठेवता स्वतःच 'सेकंड ओपिनियन' घेणारा काळही अनुभवला आहे. एकीकडे आपले कर्तव्य बजावत असताना वैयक्तिक आयुष्यात निर्माण झालेल्या समस्या, विविधांगी रूग्णांना सेवा देताना मनात सुरू असलेले विचार, रोगाचेच नव्हे, तर स्वभावाचे केलेले निरिक्षण आणि या पुस्तकाचे मला जाणवलेले वैशिष्ट्य म्हणजे आपल्या चुका निर्भिडपणे वाचकांसमोर मांडण्याची वृत्ती अशा प्रसंगांनी हे पुस्तक नटलेले आहे. या क्षेत्राचे क्षितीज इतके विस्तिर्ण आहे की, हातून चुका होणे अटळ आहे, तरी त्यांना सावरून वेळप्रसंगी त्या स्वीकारून केलेली वाटचाल त्यांना आज एक यशस्वी डॉक्टर म्हणून 'जगवत' गेली आहे.

 

काय लिहू या पुस्तकाविषयी, इतक्या सहज सोप्या पद्धतीने त्यांनी त्यांचे अनुभवकथन केले आहे की, क्षणभर त्या आपल्या समोर बसून आपल्याला गोष्ट सांगतायत असा भास होतो. साधारण एम.बी.बी.एस.ची परीक्षा पास होऊन एक‌ वर्ष इंटर्नशिप करावी लागते, नंतर एक वर्ष हाऊसपोस्ट, दोन वर्षे रजिस्ट्रार आणि नंतर मास्टर्स वगैरे असा‌ बाराच मोठा पल्ला डॉक्टरांना पार करायचा असतो. पुस्तकाची सुरूवात होते हाऊसपोस्टच्या अनुभवांपासून. या क्षेत्रात नवखे असल्याने उडालेली तारांबळ, पचवलेले अनेक मानापमान आणि शेवटी हाऊसपोस्ट कंप्लिशन सर्टिफिकेट देतात मॅडमनी काढलेले उद्गार ! आपल्याला पुढचे संपूर्ण पुस्तक वाचायला भाग पाडतात. 'Medicine cannot be taught. It can only be learnt' अशी अनेक छोटी पण मनात रूंजी घालणारी वाक्ये आहेत. पुस्तकात एकूण अकरा प्रकरणं/भाग आहेत. प्रत्येक भागांची सुरुवात त्या त्या विषयाशी निगडीत सुविचाराने होते. कधी रतन टाटा, कधी पु.ल, तर कधी‌ बहिणाबाई त्या विषयात आपल्यालासोबत करतात.

 

डिग्री मिळाल्यानंतर मुंबई- पुण्यासारख्या शहरात न जाता, डॉ. अजय व सुलभा ब्रह्मनाळकर यांनी कराडसारख्या गावात प्रॅक्टिस सुरू करावी ही खरं तर आजच्या मुलांना प्रेरणा देणारी गोष्ट आहे. मुग्धा आणि अभि या दोन मुलांंना घडवताना एकीकडे आई म्हणून आणि एकीकडे डॉक्टर म्हणून साधलेला समन्वय निश्चितच वाचनीय आहे. रुग्णांच्या अनुभवांमार्फत 'सुजाण पालकत्वाचे' धडे फार सुंदररीत्या या पुस्तकात गुंफले आहेत. मुलांना खोटं सांगून इंजेक्शन देण्यापेक्षा त्यांना विश्वासात घेऊन जर काम केले, तर मुलं कुठलाही आरडाओरडा न करता शांतपणे डॉक्टरांना आपले काम करू देतात हा अनुभव त्याचेच उदाहरण आहे.

 

कराडसारखे लहान गाव, शिवाय अंधश्रद्धांना थारा देणारा काळ. यामुळे लेखिकेला अनेक गोष्टींचा सामना करावा लागला, परंतु डॉक्टरांवर आपल्या बाळाचा जीव सोपवणारे आणि डॉक्टरांवर विश्वास ठेवून, त्यांच्यावर निरपेक्ष प्रेम करणारे, त्यांच्याप्रती आदर व्यक्त करणाऱ्या रूग्णांनी डॉ. सुलभा ब्रह्मनाळकर यांचे अनुभवविश्व समृद्ध केले आहे.

 

पुस्तकात अनेक वैद्यकीय संज्ञांचा उल्लेख आहे; पण लेखिकेने थोडक्यात त्यांची माहिती देऊन तो भाग कंटाळवाणा होणार नाही याची काळजी घेतली आहे. लहान बाळांना एवढे आजार होऊ शकतात, हे वाचूनच आपण थक्क होऊन जातो. कधी निदान चुकल्यामुळे, कधी उशीर झाल्यामुळे, कधी नातेवाईकांच्या हट्टामुळे, तर कधी असाध्य रोग झाल्यामुळे रुग्ण दगावल्याची उदाहरणे वाचायला मिळतात. त्या प्रसंगांची चित्रे लेखिकेने फार संवेदनशीलपणे रेखाटली आहेत. कुठलाही संबंध नसताना लहानग्या मेघाचा ल्युकेमिया आपल्याला चटका लावून जातो.

 

'ग्रुप प्रॅक्टिसिंग' या संकल्पनेविषयी आपल्याला नव्यानेच माहिती मिळते. एकाच क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टर्स एकाच ठिकाणी काम करण्याचा अभिनव प्रयोग डॉ. अजय ब्रह्मनाळकर व अन्य फिजिशियन डॉक्टरांनी 'श्री हॉस्पिटल'द्वारे सुरू केला. त्याची यशस्वी वाटचाल पाहता, गावातील सर्व बालरोगतज्ज्ञांनी 'चैतन्य हॉस्पिटल' सुरू केले. महिन्यातून एकदा शहरातून विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ मंडळी या हॉस्पिटलला भेट देऊन जायची तसेच अद्ययावत तंत्रज्ञानामुळे रूग्णांचा गावाबाहेर जाण्याचा त्रास वाचायचा. शिवाय यामुळे डॉक्टरांच्या वैयक्तिक प्रॅक्टिस मधे कुठलाही अडथळा यायचा नाही. असे अनेक फायदे-तोटे लेखिकेने या 'ग्रुप प्रॅक्टिसिंग'विषयी लिहिले आहे.

 

होमपोस्टपासून निवृत्तीपर्यंतचा प्रवास डॉ. सुलभा ब्रह्मनाळकर यांनी शब्दबद्ध केला आहे. एका डॉक्टरचे आयुष्य जाणून घ्यायचे असेल, तर हे पुस्तक आवर्जून वाचावे!

- मृण्मयी गालफाडे