व्यक्तिमत्त्व विकास - स्वामी विवेकानंद

युवा विवेक    11-Apr-2022   
Total Views |

'व्यक्तिमत्त्व विकास' - स्वामी विवेकानंद


vyaktimatva vikas 

व्यक्तिमत्त्व विकास ! आजच्या तरुणाईच्या मनात रूंजी घालणारे दोन शब्द. अगदी लहान वयापासूनच काही सुजाण पालक त्यांच्या पाल्याच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी प्रयत्नशील असतात. कधी उन्हाळी शिबिर, तर कधी संस्कार वर्ग. पेंट, ब्रशपासून पेटीपर्यंत सगळे हत्यार आयुष्यात एकदा तरी चालवलेले असतात; पण या सगळ्या 'ऑल राऊंड डेव्हलपमेंट'च्या नादात खरंच व्यक्तिमत्त्व विकास होतो का ? हा मोठाच प्रश्न आहे; तर खऱ्या अर्थाने व्यक्तिमत्त्व विकास कसा करायचा याचे मार्गदर्शन स्वामी विवेकानंद आपल्याला करतात. वरील प्रसंगाविषयी बोलताना स्वामीजी म्हणतात की, 'सर्व शिक्षणाचा हेतू माणसाचं व्यक्तिमत्त्व घडवणं हाच असायला पाहिजे; पण त्या ऐवजी आपण बाहेरच्या बाजूलाच रंगसफेदी करण्यात गढून गेलो आहोत.' रामकृष्ण मठ, धंतोली नागपूरद्वारादहा खंडांमध्ये स्वामी विवेकानंद ग्रंथावली प्रकाशित झाली आहे. त्या दहा खंडांमधून व्यक्तिमत्त्व विकासासंदर्भातील स्वामीजींचे विचार 'व्यक्तिमत्त्व विकास' या छोट्या पुस्तिकेत संकलित केले आहेत. या पुस्तकाविषयी या लेखात माहिती घेऊ या.

 

दहावीच्या निरोप समारंभाला शाळेने आम्हाला ही पुस्तिका भेट म्हणून दिली होती. प्रस्तावनेची पानं वगळता, एकूण ६५ पानांचे छोटेसे पुस्तक आहे म्हटल्यावर 'आत्ता संपेल' म्हणत वाचायला घेतले, पण प्रथम वाचनाच्या वेळी कळून चुकलं की, स्वामीजींच्या विचारांचं शिवधनुष्य पेलणे इतके सोपे नव्हे. कारण बव्हंशी पुस्तक डोक्यावरून गेलं होतं; परंतु प्रथम वाचनात, डोक्यात असलेल्या व्यक्तिमत्त्व विकासाच्या कल्पनांना छेद देणारे आणि स्वामी विवेकानंदांच्या तर्कशुद्ध आणि उदात्त विचारांचे घडवणारे हे पुस्तक आहे याची जाणीव झाली. शेवटी ६५ + ६५ + ६५ अशी पारायणं केल्यावर स्वामीजींना नक्की काय म्हणायचे आहे ते मला अंशतः उमगलं.

 

उपोद्घाताला 'व्यक्तिमत्त्व म्हणजे काय ?', 'चरित्र म्हणजे काय?', आपल्या व्यक्तिमत्वात मनाचे कार्य कुठले अशा अनेक प्रश्नांचा उहापोह केला आहे. स्वामीजींच्या जीवनाचं उद्दिष्टच मानवाला त्यांच्या ठायी असलेल्या ईश्वरत्वाची जाणीव करून देणे हे असल्यामुळे प्रत्येक पानावर त्या दिव्यत्वाची ते आपल्याला समजतील अशा उदाहरणांमार्फत प्रचीती घडवून आणतात.

 

प्रभावी व्यक्तिमत्त्वांविषयी बोलताना स्वामीजी म्हणतात की, 'दुसऱ्यावर प्रभाव पाडण्याच्या दृष्टीने शब्द, किंबहुना विचार यांचा भाग एकतृतीयांश असतो.' हा मुद्दा पटवण्यासाठी ते इतिहासात होऊन गेलेल्या महान ग्रंथकारांचे उदाहरण देतात. ते म्हणतात, 'बहुतांशी वेळा त्यांनी प्रकट केलेले विचार हे सामान्यच असतात, तरी त्यांचा प्रभाव पडण्यामागचं कारण ते सांगतात की, 'याबाबतीत मनुष्याचं व्यक्तिमत्त्वच महत्त्वाचा घटक असते आणि दोन तृतीयांश प्रभाव त्याचा पडत असतो'. या वाक्यासाठी स्वामीजी स्वतः एक वस्तूपाठ आहेत. बघा ना, 'माझ्या अमेरिकन बंधू आणि भगिनींनो', यामधे शब्दांचा प्रभाव निश्चित आहे, विश्वबंधुत्वाचा उदात्त विचारही आहे; पण थोडा विचार केल्यास असे लक्षात येईल की हे वाक्य कोणीही उच्चारू शकते ! पण त्याला स्वामीजींना मिळाला तसा प्रतिसाद मिळेल का ? उत्तर आपणा सर्वांना ठाऊक आहे. त्या पाच शब्दांनी इतिहास घडवण्याचे कारण म्हणजे त्या शब्दांना लाभलेली स्वामीजींच्या तेजस्वी व्यक्तिमत्त्वाची जोड. तीच या विलक्षण प्रभावाला कारणीभूत ठरली आहे.

 

स्वामीजी आपल्याला सूक्ष्माचा विचार करायला भाग पाडतात. मागे म्हटल्याप्रमाणे बाहेरून रंगसफेदी करण्यात काही अर्थ नाही. मुळातुन विचार व्हायला हवा. यास्तव ते म्हणतात की, एखाद्याचं चरित्र समजून घेण्यासाठी त्याच्या मोठ्या कृतीकडे दुर्लक्ष करा आणि छोट्यातली छोटी गोष्ट तो कशी करतो याकडे लक्ष द्या. कारण खरी शक्ती ही स्थूलात नसून सुक्ष्मात असते. त्यामुळे आपण जर त्या शक्तीच्या मूळाला म्हणजेच आपल्या मनाला, विचारांना नियंत्रित करू शकलो, ताब्यात ठेवू शकलो, तर निश्चितच आपण इतरांच्याही मनाला ताब्यात ठेवू शकू आणि आपला प्रभाव त्यांच्यावर पाडू शकू असे स्वामीजी सांगतात. प्रथम स्वतःच परिवर्तन आणा हे स्वामीजी अधोरेखित करतात.'कर्म कसे करावे', 'चरित्र कसे घडवावे', इ. अनेक गोष्टी ते सविस्तर सांगतात.

 

व्यक्तिमत्त्व विकासासाठी आवश्यक असणारे गुण कोणते असा प्रश्न विचारल्यास ते म्हणतात की, 'आत्मविश्वास आणि सकारात्मक विचार' हे ते गुण आहेत. आत्मविश्वासाबद्दल ते म्हणतात की, 'उन्नत होऊ गेल्यास आधी स्वतःवर विश्वास आवश्यक आहे, ईश्वराला नंतर.' तुम्ही स्वतःविषयी जसा विचार कराल तसे व्हाल. म्हणून 'आत्म'विश्वास आवश्यक आहे.याकरिता सकारात्मक विचार करणे आवश्यक आहे आणि त्यासाठी नकारात्मक विचारांना नियंत्रित करणे गरजेचे आहे.

 

व्यक्तिमत्त्वाच्या विकासात शिक्षण ही एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे; पण हे शिक्षण ग्रहण करत असताना ते निक्षून सांगतात की अनुकरण टाळा. 'विविधता हे जिवंतपणाचे लक्षण आहे; सारखेपणा हे मृत्यूचे चिन्ह आहे', 'दुसऱ्या जवळ असलेली प्रत्येक चांगली गोष्ट शिकावी, परंतु ती आपल्या पद्धतीने ग्रहण करून आत्मसात करून घ्यावी, आपण आपले स्वातंत्र्य गमावून दुसऱ्याप्रमाणे होऊ नये', अशा शब्दांत ते आपली कान उघडणी करतात.

 

बऱ्याच ठिकाणी गीतेचा, उपनिषदांचा संदर्भ आला आहे.पुस्तकाची भाषा ही सामान्य पुस्तकांपेक्षा थोडी जड आहे. त्यामुळे स्वामीजींचे उदात्त विचार एका बैठकीत समजणे कठीण आहे, ते समजण्यासाठी शांतपणे परिशीलन करणे गरजेचे आहे. केवळ ६५ पानांचे पुस्तक आहे, पण एका वेळी अनेक गोष्टी शिकवून जाते.स्वामीजी वाचायची इच्छा असेल तर हे पुस्तक त्याचा श्रीगणेशा करण्यास अगदी उत्तम आहे, असं मी म्हणेन. आपलं व्यक्तिमत्त्व विकसित करण्यासाठी प्रत्येकाने हे पुस्तक वाचावं.

 

पुस्तकाचे नाव : व्यक्तिमत्त्व विकास

प्रकाशक : स्वामी ब्रह्मस्थानंद, अध्यक्ष, रामकृष्ण मठ

किंमत : १५ रु.

- मृण्मयी गालफाडे.