बंध नात्याचे; आपणच सांभाळायचे

युवा विवेक    15-Apr-2022   
Total Views |

बंध नात्याचे; आपणच सांभाळायचे

 
bandh natyache

कोकणची माणसं साधीभोळी, काळजात त्यांच्या भरली शहाळीअसं कोकणातल्या माणसांचं वर्णन ग.दि. माडगूळकरांनी वैशाखवणवाया सिनेमात केलं आहे. पुलंनीही 'अंतू बर्वा' या आपल्या व्यक्तिचित्रणात कोकणातल्या माणसाचं यथार्थ चित्रण केलं आहे. गरिबी असूनही माणसांप्रती असणारा आंतरिक ओलावा त्यात दिसून येतो. जेव्हाजेव्हा मी कोकणात जाते तेव्हातेव्हा माझं मन हळवं होतं. तिथल्या साध्याच पण मनापासून केलेल्या पाहूणचाराने हेलावून जातं. आजी, मामी, काकू, दूरची एखादी आजी आपल्या येण्याने हरखून जाते आणि तांदूळपाणी ओवाळूनच आपल्याला घरात घेते. आढीतला एखादा पिका आंबा किंवा पिकत आलेला फणस आपल्यासाठी राखून ठेवते. हे सारे अनमोल क्षण मला खूप मोहवतात.

 

पूर्वी परीक्षा संपली रे संपली की, आम्ही कोकणाची वाट धरत असू. असं काय वेगळं होतं तिथे? आजीच्या पदराला धरून ती नेईल तिथे जायचं एवढंच माहीत होतं. त्यामुळे साहजिकच तिच्यासोबत कोकणात जाणं व्हायचं, अगदी बालवाडीत असल्यापासून. जवळपास सगळेच नातेवाईक म्हणजे आत्ते, चुलत, मामे अशी सगळीच लहानमोठी भावंडं एकत्र जमत असू. एवढी माणसं एकत्र येऊनही मी कोकणवासी नातेवाईकांना ना कधी दुर्मुखलेलं पाहिलं किंवा ना कधी कंटाळलेलं पाहिलं. जो आमटीभात असेल तो मिळून खाऊ, सोबतीला कोकणचा मेवाही घेऊ, पाहुणचाराचं इतकं साधं-सोपं समीकरण. आम्ही कोकणात जात असू तेव्हा नेमके वाळवणाचे दिवस असायचे. वाळवणाचे पदार्थ म्हणजे पापड, कुरड्या, पापड्या, सांडग्या मिरच्या यांची बेगमी करण्याचा हा काळ. पूर्वी कोकणात पावसाळ्याचे चारही महिने तुटवड्याचे असत, त्यामुळे वर्षभराचं धान्य भरून साठवणी करण्याचादेखील हाच काळ. शहरात राहणाऱ्या आम्हाला हे सगळं पाहणं म्हणजे आनंदच आनंद. ओले पापड खाणं, पापडाच्या लाट्या पळवणं, जमेल तशी धडपडत उत्साहाने मदत करणं हे सारं हिरीरीने करायचो.

 

पुढेपुढे शाळा-कॉलेजांच्या व्यापामुळे कोकणात जाणं मागे पडत गेलं. कोकणातलं वातावरणही बदलायला लागलंय. आता कोकणातही दुकानं आली,त्यामुळे सगळं बारा महिने मिळू लागलंय. कोकणी माणूस व्यवसायाभिमुख होऊ लागलाय. अर्थात शेतीमध्ये उद्भवणारी उत्पन्नाची तूट आणि नैसर्गिक संकटांची टांगती तलवार पाहता ही काळाची गरज झाली आहे. त्यामुळे आंबा-फणस-कोकमांना, वाळवणीच्या पदार्थांना व्यावसायिक अधिष्ठान प्राप्त झालंय. त्यामुळे बाराही महिने हे पदार्थ आपल्याला शहरात घरपोच मिळू लागले आहेत. पर्यटन उद्योगानेही कोकणात चांगला जोर धरला आहे. ही व्यावसायिक अधिष्ठानं सांभाळता सांभाळता, समजून घेताघेता काही गोष्टी आपल्याला आवर्जून जपायच्या आहेत.

 

नुकताच म्हणजे १० एप्रिलला 'इंटरनॅशनल सिबलिंग डे' झाला. विभक्त कुटुंबांच्या पाश्चात्य जगात 'भावंडंदिन' साजरा केला जाणं हे साहजिक आहे. आपल्याकडेही राखीपौर्णिमा, भाऊबीज या दिवशी भावंडांच्या या हृद्य नात्याची उजळणी होते. सौहार्द जपण्याचं, रक्षण करण्याचं, आपुलकीचं वचन एकमेकांना दिलं जातं, ते पाळलंही जातं. अशा आते, मामे, मावस, चुलत भावंडांचं एकत्र येण्याचं एक मोलाचं निमित्त होतं सुट्टीतलं कोकण. या निमित्ताने केवळ सख्खेच नव्हेत, तर दूरचेही नातेवाईक भेटत असत. म्हणजे बाबांची मामे-मावस भावंडं, त्यांचीही मुलं त्याच काळात कोकणात येत. त्यामुळे लांबलांबच्या नातलगांचा परिचय होत असे. एकदा एकत्र आलो की सख्खं, लांबचं काही उरत नसे. सगळीच मोठी माणसं, सगळीच भावंडं. आपलं नाही की परकं नाही. त्यामुळे नात्यांचे बंध अधिक दृढ व्हायला मदत होते. आपले नातेवाईक कोण कोण आहेत, त्यांचं आणि आपलं नातं काय आहे, आपल्याप्रमाणेच त्यांचीही नाळ कोकणशी जोडलेली आहे, दर वर्षी आपली भेट न चुकता होणार आहे हे सारंच मानवी मनाला सुखावणारं, साद घालणारं आहे.

 

आता सर्वत्र विभक्त कुटुंबपद्धती आहे. सगळेच एकेकटे, काळाच्या प्रभावाने त्यांची पुढची पिढीही एकटीच. भावंडांनी एकत्र येणं, मजा-मस्ती करणं, काही काळ सहअस्तित्वाचा आनंद घेणं, मोठ्यांकडून लाड करून घेणं अशा अनेक अनुभवांना ही पिढी मुकते आहे. अशा वेळी स्वतःला आणि पुढच्या पिढीला आपल्या लाल मातीशी, आंब्या-फणसाशी, जीवाला जीव देणाऱ्या माणसांशी जोडून ठेवण्याची जबाबदारी आपली आहे. त्यांना गावाला घेऊन जाणं, शहरी वातावरणापासून-स्वकेंद्री जीवनापासून दूर आपल्या माणसांमध्ये नेणं, गावाकडील वातावरण अनुभवणं, घरी पिकलेल्या भाज्याफळांचा आस्वाद घेण्यास शिकवणं, कोकणच्या मेव्याचा परिचय करून देणं, वाळवणाच्या पदार्थांचा आनंद घेणं, गोवंश सांभाळणं - शेणगोठा करणं हे सारं कसं असतं याचा परिचय करून देणं अशा अनेक अनमोल गोष्टी आपण करू शकतो, केल्या पाहिजेत. यामुळे लांबची भावंडं, लांबचे नातेवाईक यांचा परिचय होईल, घरातल्या माणसांपलिकडील नातेवाईकांसोबत राहण्याची सवय होईल, गावाकडची ओढ लागेल.

 

'ओढ लावते अशी जीवाला गावाकडची माती.....

 

साद घालती पुन्हा नव्याने ही रक्ताची नाती.... असं 'मन उधाण वाऱ्याचे' या गाण्यात म्हटलंच आहे. हे सारं आपणच जपायला हवंय. नात्यांचे हे बंध, गावच्या मातीची ही ओढ हे आपल्या घरातल्या मोठ्यांनी आपल्याला दिलेलं संचित आहे. ते पुढच्या पिढीकडे सोपवणं, संक्रमित करणं ही आपलीच जबाबदारी नाही का? भारताचं 'भारतत्त्व' हे अजूनही त्याच्या खेड्यांशी, तेथील संस्कारांशी, तेथील माणसांशी जोडलेलं आहे. ते सांभाळण्याचं दायित्व आपल्यावर आहे. ही ओढ जपू या, वाढवू या, द्विगुणित करू या.

- मृदुला राजवाडे