मम आत्मा गमला !

युवा विवेक    18-Apr-2022   
Total Views |
मम आत्मा गमला !
 

mama aatma 
काही गाणी 'लोकप्रिय' म्हणण्याच्यादेखील पलीकडे गेलेली असतात. सतत स्वरांचा अभिषेक होऊन ती रसिकांच्या हृदयस्थ होतात. अनेक वेळा ऐकलं तरी त्यांची गोडी कमी होत नाही, उलट कालोपरत्वे ती अधिकच जवळची वाटू लागतात. असंच एक गाणं ज्याने संगीताच्या विस्तिर्ण नभांगणात रसिकांच्या मनावर धृव ताऱ्याप्रमाणे अढळ, अचल स्थान निर्माण केले आहे ते म्हणजे 'मम आत्मा गमला' ! 'बिहाग'च्या बिलावल स्वरांनी बहरलेले आणि 'तीनताला'च्या सोळा मात्रांचा श्रुंगार केलेले एक अजरामर गीत.
 
काकासाहेब खाडिलकर अर्थात कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांच्या लेखणीतून साकार झालेली अद्भुत नाट्यकृती म्हणजे 'संगीत स्वयंवर'. एकनाथांच्या रूक्मिणी स्वयंवरावर आधारित असलेली ही रचना.काकासाहेब खाडिलकर हे लोकमान्य टिळकांचे अनुयायी होते. त्यामुळे त्यांची जहाल वृत्ती त्यांच्या 'कृष्णात' दिसून येते. सं. सौभद्र आणि सं. स्वयंवर यांची तुलना केल्यावर ही बाब आपल्या सहज लक्षात येईल.'सौभद्र'चा कृष्ण हा खट्याळ आहे, तर 'स्वयंवरा'तला कृष्ण हा विरश्रीने परिपूर्ण आहे. खलांना मोहित करणारा आहे आणि सगळ्यांच्या मनावर आपली भूल पाडणारा आहे.ही सगळी कृष्णाची रूपं रूक्मिणीच आपल्या नजरेत आणून देते. तीच या नाटकाची मुख्य पात्र आहे. संपूर्ण नाटकात तिच्या तोंडी असणारी पदं अत्यंत सुंदर आहेत. आपल्या अत्यंत जवळची आहेत. या नाटकातील असं एक पद की जिथे रूक्मिणी तिच्या प्रेमाची कबुली देते आणि कृष्णाच्या प्रथम दर्शनाने तिच्या मनात उठणाऱ्या विचार तरंगांना प्रकट करते, ते म्हणजे 'मम आत्मा गमला' होय.
 
शब्द बघा, मम 'आत्मा' गमला ! देह नाही बरं, 'आत्मा' गमला.खरंतर कुठल्याही प्रियकर/प्रेयसीच्या मनात तिला/त्याला पाहिल्यावर याहून वेगळ्या भावना त्या काय उत्पन्न होणार? 'एक लाडकी को देखा तो ऐसा लगा', 'प्रथम तुज पाहता', अशी अनेक गाणी क्षणात आपल्या डोळ्यासमोरून तरळून जातात.पण जी व्यक्ती ही भावना व्यक्त करते आहे ती 'रूक्मिणी' आहे, आणि ज्याच्याविषयी व्यक्त करते आहे तो योगेश्वर असा श्रीकृष्ण आहे ! मनुष्यत्वाकडून देवत्वाकडचा प्रवास 'आत्मा' या एका शब्दामुळे जाणवतो आणि झटकन त्या भावनांना एक वेगळे स्वरूप प्राप्त होते..
 
गाण्याची पार्श्वभूमी थोडक्यात सांगायची म्हणजे, रूक्मिणी तिच्या मैत्रिणीला सांगते आहे की, 'इतके दिवस ज्यांची प्राण कंठाशी आणून वाट बघत होते त्यांचे दर्शन सगळ्यात आधी मलाच झाचं आणि प्रथम नजरानजरेत आम्ही एकमेकांना ओळखले'. सगळ्यात आधी पाहिल्याचा आनंद तर आहेच पण 'प्रथम भेटीतच आम्ही एकमेकांना ओळखले' हे आठवून ती अधिक हर्षोल्लासित होते आहे. तिचं हे वाक्य संपते न संपते तोच बिहागचे लडिवाळ स्वर कानावर पडतात,
 
मम आत्मा गमला हा
नकळत नवळत हृदय तळमळत
भेटाया ज्या देहा |
एकचि वेळ जरी मज भेटला
जीव कसा वश झाला, भाव दुजा मिटला
वाटे प्राणसखा आला परतुनी गेहा ||१||
 
फक्त सहा ओळींचे गाणे आहे, तरी सहा दशकांहून अधिक काळ रसिकांच्या मनावर राज्य करते आहे.याचे कारण तो 'बिहाग' आहे का ? की ही उत्कट शब्दरचना आहे ? की, भास्करबुवांची अजरामर अशी चाल आहे ? या गोष्टी तर कारणीभूत आहेतच; पण लोकप्रियतेचा गोवर्धन उचलला तो 'गंधर्व'स्वराने ! 'संगीत स्वयंवर' चे मुख्य आकर्षण म्हणजे बालगंधर्वांनी साकारलेली रूक्मिणी.मूर्तिमंत सौंदर्य; निर्मळ, लडिवाळ, स्वच्छ स्वर आणि सहज अभिनय हे त्रिगुणात्मक स्वरूप असलेले व्यक्तिमत्त्व म्हणजे साक्षात बालगंधर्व ! त्यांना रंगमंचावर रूक्मिणीच्या वेशात वावरताना पाहताना, रूक्मिणी अशीच असावी असे प्रेक्षकांना वाटे.
 
भास्करबुवा बखले हे बालगंधर्वांचे गुरू. असं म्हणतात, त्यांनी 'प्रभू लीला गमते ही' या चालीवरून 'मम आत्मा'ची चाल बांधली.पण योग बघा, आज 'प्रभूलीला गमते ही' हे गाणे जवळजवळ विस्मृतीत गेले आहे. या गाण्याची चाल कशी असेल ? असा प्रश्न मनात आल्यावर 'मम आत्मा सारखी असेल' हे उत्तर येतं. हा असा आपला 'रेफरन्स' बदलण्याचे श्रेय खाडिलकर, भास्करबुवा आणि बालगंधर्व या त्रयींना जाते.
 
बालगंधर्व देहभान हरपून गायचे.एखादी शास्त्रीय संगीताची मैफल रंगावी तसे 'वन्स मोअर' वर 'वन्स मोअर' घेत हा बिहाग रंगमंचावर रंगायचा. शास्त्रीय संगीताचा अगदी उत्तम वापर भास्करबुवांनी त्यांच्या चालींमधे केला आहे.मम आत्मा म्हणजे बिहागच. बिहागमुळे त्याला जी हेल प्राप्त झाली आहे, जो लडिवाळपणा प्राप्त झाला आहे, तो फार मनोहारी आहे. रुक्मिणीच्या मनातील भावना पोहोचवण्यासाठी बिहार अगदी 'परफेक्ट' राग आहे असं वाटते. थोडं शास्त्रात डोकवायचं झालं तर, मूळ बिलावल थाटातील या रागात तीव्र मध्यम हा विवादी स्वर लागतो.तो कधीही, कसाही गाता येत नाही. एका विशिष्ट स्वर लगावाबरोबरच तो गायला जातो. त्यामुळे रुक्मिणीच्या मनातील हूरहूर त्या तीव्र मध्यमाची वाट बघणाऱ्या श्रोत्याला 'बरोब्बर' समजते. तिला झालेला आनंद हा स्वरांच्या चढ-उतारांमधून दिसून येतो. किती आनंद झालाय हे प्रत्येक प्रेक्षक स्वरांच्या लाटेवर स्वार होऊन स्वतः अनुभवू शकतो. ही बिहागची जादू आहे.
 
या गाण्याविषयी एक हृद्य आठवण पुरूषोत्तम वालावलकर यांनी एका कार्यक्रमात सांगितली होती. पुरुषोत्तम वालावलकर हे बालगंधर्वांचे निकटवर्तीय. ते एकदा न कळवता अल्लादिया खाॅं साहेबांच्या घरी गेले होते. खॉं साहेब म्हणजे त्याकाळातील ज्येष्ठ शास्त्रीय गायक. वालावलकर घरी पोहोचताच त्यांना पेटी घेऊन बसलेले खॉंसाहेब दिसले. एरवी तंबोऱ्याचा झंकार ऐकू येणाऱ्या वास्तूमधून पेटीचे स्वर ऐकून त्यांना आश्चर्य वाटले आणि याचे कारण त्यांनी खॉं साहेबांना विचारले असता ते म्हणाले की, आदल्या दिवशी ते 'स्वयंवर'च्या प्रयोगाला गेले होते. तिथे नारायणरावांनी (म्हणजेच बालगंधर्वांनी) 'मम आत्मा गाताना बिहाग'मधून अचानक 'बिहागड्याचे' स्वर लावले असे ते म्हणाले. वास्तविक बिहाग आणि बिहागडा हे दोन भिन्न राग आहेत. 'तासंतास राग आळवून जो रागाचा प्रभाव आम्ही साध्य करतो तो नारायणाने एका क्षणात साधला. आमची मेहनत चुकीची ठरली.' हे त्या आयुष्यभर संगीत साधना केलेल्या एका महान गवयाचे वाक्य होते. अशी नारायणरावांच्या स्वरांची जादू होती. दैवी स्वर ! म्हणून मी म्हटले की, लोकप्रियतेचा गोवर्धन ज्या कंठाने समर्थपणे उचलला तो कंठ बालगंधर्वांचा होता ! त्याला पुढे अनेक गायकांच्या, वादकांच्या काठ्यांची जोड लाभली हेही इथे उद्धृत करणं गरजेचं आहे.
 
सहा ओळींचे हे गाणे वीस-पंचवीस मिनिटं गायकांना समरसून गाताना ऐकतो आपण. मुख्य म्हणजे प्रत्येक आवर्तनाला प्रत्येक ओळ वेगळी भासते. हे त्या चालीचे आणि गायकीचे वैशिष्ट्य होय. बालगंधर्व, भिमसेन जोशी, कुमार गंधर्व, मधुवंती दांडेकर, माणिक वर्मा, कीर्ती शिलेदार यांनी गायलेले 'मम आत्मा' अवश्य ऐका. गाणं तेच, रागही तोच, स्वर तेच ! पण तरी काहीतरी नवीन गवसेल याची खात्री देते. 'नित्यनूतन' असण्याचा वरदहस्त लाभला आहे या गाण्याला. स्वयंवरातील सगळीच गाणी अप्रतिम आहेत; पण हे गाणं ऐकलं की वाटतं, मम 'आत्मा' गमला !
 
- मृण्मयी गालफाडे