मुक्ततेची उभवू गुढी...

युवा विवेक    02-Apr-2022   
Total Views |

मुक्ततेची उभवू गुढी...

 
gudhipadawa

आज चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडवा. भारतीय कालगणना ही जगभरात सर्वांत शास्त्रीय व प्राचीन मानली जाते. या कालगणनेनुसार वर्षाचा पहिला दिवस. नुकतीच होळी झालेली असते. वसंतागमन झालेलं असतं. हवेत उष्मा वाढलेला असला, तरी फळाफुलांनी वृक्ष लगडलेले असल्याने सर्वत्र उत्साहाचं वातावरण असतं, शेतीची कामं आटोपल्याने कृषिवलही दगदगीतून मोकळे झालेले असतात. खरं तर भारतीय सणांना निसर्गचक्रांशी जोडणारी अशी आपली संस्कृती आहे. त्यामुळे वर्षारंभाचा हा दिवस आपल्या संस्कृतीत अत्यंत उत्साहाने आणि आनंदाने साजरा केला जातो.

 

महाराष्ट्रात वर्षप्रतिपदेच्या दिवशी घरोघरी विजयाचं प्रतीक असणारी गुढी उभारली जाते. रेशमी-भरजरी वस्त्र, चांदी वा तांब्याचा कलश आणि फुलांची माला ल्यायलेली ही गुढी घराच्या अंगणाची शोभा वाढवते. गुढीसमोर रांगोळी घातली जाते, तिचं पूजन केलं जातं. गोडाधोडाचा नैवेद्य देवाला दाखवून एकत्र बसून आनंदाने भोजन केलं जातं. वर्षाचा पहिला दिवस म्हणून मंदिरांत जाऊन देवाचं दर्शनही अनेकजण घेतात, थोरामोठ्यांचे आशीर्वाद घेतले जातात. आनंदी जीवनाची कामना केली जाते.

 

मुळातच गुढीची परंपरा महाराष्ट्रात आली कशी या परंपरेचा धांडोळा घेणं, परंपरा जपणं, त्यांचं सांस्कृतिक महत्त्व समजून घेणं आवश्यक ठरतं. कानडी भाषेत गुढी अर्थात गुडी म्हणजे ध्वज, बावटा, निशाण, तर गुढीचा दुसरा अर्थ मंदिर असाही होतो. बांबूची काठी, गडू, वस्त्र, फुलमाळांनी शृंगारलेली गुढी ही मंदिरासारखी दिसते. याच संदर्भाने मराठीत गुढीहा शब्द रुळला असावा, असा एक संदर्भ व्युत्पत्तीकोशात सापडतो. तेलगू भाषेत गुढी या शब्दाचा अर्थ लाकूड, काठी किंवा तोरण असा आहे. हिंदीतसुद्धा कुडी म्हणजे लाकूड असा अर्थ होतो. गुढी हा शब्द कानडी भाषेतून मराठीत आला असावा असं भाषातज्ज्ञांचं मत आहे. गुढीपाडवा या दिवसाचं ऐतिहासिक महत्त्वही मोठं आहे. प्रभू श्रीरामांचा राज्याभिषेक, धर्मराज युधिष्ठिरांचा राज्याभिषेक, सम्राट शालिवाहनाच्या शक कालगणनेस प्रारंभ, स्वामी दयानंद सरस्वतींच्या माध्यमातून आर्य समाजाची स्थापना आणि रा. स्व. संघाचे आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळिराम हेडगेवार यांचा जन्मदिन अशा अनेक महत्त्वपूर्ण घटना या दिवसाशी जोडलेल्या आहेत.

 

ज्ञानेश्वर माऊलींसारख्या संतांच्या साहित्यातही गुढीपाडव्याचे संदर्भ आपल्याला सापडतात. ज्ञानेश्वरीत "अधर्माचि अवधी तोडीं । दोषांचीं लिहिलीं फाडीं । सज्जनांकरवी गुढी । सुखाची उभवीं ॥";

"ऐकें संन्यासी आणि योगी । ऐसी एक्यवाक्यतेची जगीं । गुढी उभविली अनेगीं । शास्त्रांतरी ॥";

"माझी अवसरी ते फेडी । विजयाची सांगें गुढी । येरु जीवीं म्हणे सांडीं । गोठी यिया ॥ ४१० ॥" असे उल्लेख येतात. श्रीराम रावणाचा वध करून पुन्हा महाराष्ट्रात आल्यावर 'ध्वजा त्या गुढ्या तोरणे उभविली।' अशा शब्दांत महाराष्ट्रातील जनतेने गुढ्या उभारल्याअसं समर्थ रामदासस्वामींनीही एका ठिकाणी म्हटलं आहे. संत एकनाथांनीही आपल्या काव्यांतून हर्षाची उभवी गुडी, ज्ञातेपणाची, भक्तिसाम्राज्य, यशाची, रामराज्याची रोकडी, भक्तीची, स्वानंदाची, सायुज्याची, निजधर्माची इत्यादींच्या गुढ्यांची रूपकं वापरली आहेत. या सगळ्या संदर्भातून गुढीपाडव्याचं सांस्कृतिक महत्त्व तर अधोरेखित होतंच, त्याच वेळी त्याचं प्राचीनत्वही सिद्ध होतं.

 

केवळ महाराष्ट्रातच गुढीपाडवा साजरा केला जातो असं नव्हे, तर दक्षिण भारतात वर्षप्रतिपदेचा सण उगादी (युगादि) नावाने, काश्मीरमध्ये अगदू नावाने साजरा केला जातो. सिंधी समाजाचे संस्थापक भगवान झुलेलाल हे हिंदू-मुस्लीम एकतेचे प्रबळ समर्थक होते. चैत्र शुद्ध द्वितीयेला त्यांचा जन्मदिन चेटीचंड उत्सवाच्या रूपात साजरा केला जातो. नवरेहच्या स्वरूपात काश्मीरमधील हिंदू पंडित नवीन वर्षाचं स्वागत करतात.

 

पारंपरिक पद्धतीने हा सण साजरा केला जातोच. पण, त्याचबरोबरीने गेल्या पंचवीसेक वर्षांत महाराष्ट्रात नववर्ष स्वागत यात्रांची अत्यंत अभिनव आणि आनंददायी परंपरा सुरू झाली आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी भल्या पहाटे नऊवारी-पाचवारी साड्या, धोतर कुर्ता, दागदागिने अशा पारंपरिक वेशात आबालवृद्ध एकत्र जमतात, एकमेकांना शुभेच्छा देतात, देवळात जातात, तिथे देवाची पालखी नियोजित मार्गावरून फिरवतात, आरती-समूहगान गाऊन त्याची सांगता करतात. वाटेत पारंपरिक खेळ, लेझीम, दांडपट्टा, ढोल, खड्ग यांची प्रात्यक्षिके सादर केली जातात. गुढीपाडव्याची सकाळ आनंदाने साजरी होते.

 

काही ठिकाणी याच नववर्ष स्वागतयात्रेला सामाजिक उपक्रमांचीही जोड दिली जाते. सामाजिक समरसता, निसर्गरक्षण, सामाजिक उपक्रम, रक्तदान-मेडिकल कॅम्पसारखे वैद्यकीय उपक्रम, व्याख्यानमाला, वर्षभर चालणाऱ्या काही उपक्रमांचा शुभारंभ असे अनेक आयाम या स्वागतयात्रेत जोडले गेले आहेत. विशेष म्हणजे, युवा पिढी अत्यंत आनंदाने या सर्व उपक्रमांत पुढाकार घेऊन सहभागी होताना दिसते. समाजातील सर्व घटकांना या उपक्रमांत सामावून घेतलं जातंय हेही विशेष.

 

मनुष्य हा समाजशील प्राणी आहे, समुहात जगणारा आहे, हे आपण कायम शिकत आलो. आपल्या परंपरा, रीती हेच तर अधोरेखित करतात. विविध सणांच्या निमित्ताने कुटुंब, नातेवाईक, मित्रमंडळींना, आप्तांना भेटून माणूस आपलं माणूसपण जपत आला आहे. नववर्ष स्वागतयात्रेसारख्या नव्याने सुरू झालेल्या परंपरेलाही त्याने तितक्याच आनंदाने स्वीकारलं, याचं खरं कारणही तेच होतं. एकमेकांना भेटणं, आनंदाचे क्षण वाटून घेणं, मन मोकळं करून दुःखाला वाट करून देणं, स्वतःच्या कोशातून बाहेर पडून जीवनाचा आनंद घेणं-तो दुसऱ्याला देणं यातच तर जीवनाचा खरा अर्थ सामावलेला आहे. अन्यथा रोजचं रहाटगाडं ओढतच असतो आपण.

 

वर्षभरातला एक दिवस थोडा वेगळा जगून बघा, आयुष्य पाच वर्षांनी वाढेल. एक उनाड दिवसया मराठीतील गाजलेल्या चित्रपटाचं सगळं सार या एका वाक्यात सामावलेलं होतं. आपले सण, उत्सव आपल्याला एक दिवस वेगळं जगून बघण्याची संधीच तर उपलब्ध करून देत असतात. एक दिवस वेगळे कपडे, एक दिवस आप्तमित्रांच्या भेटी, एक दिवस ताणमुक्तीचा, एक दिवस समाजासाठी वेळ देण्याचा आणि एक दिवस आनंदात रंगून जाण्याचा. अशा किती तरी संधी आपल्या संस्कृतीने आपल्याला दिल्या आहेत. गुढीपाडव्याच्या निमित्ताने ही संधी पुन्हा चालून आली आहे. २०२०च्या गुढीपाडव्याच्याच दिवशी आपण एका कोशात बंदिस्त झालो आणि हा लेख लिहित असतानाच निर्बंध उठवले गेल्याची शुभवार्ता कानावर आली. त्यामुळे दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतरचा हा गुढीपाडवा अधिक आनंददायी, उत्साहपूर्ण रीतीने साजरा करायला हवा. चला तर मग, एक दिवस वेगळं जगून बघू या.

 

गुढीपाडव्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा....!

 
-मृदुला राजवाडे