कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज

युवा विवेक    25-Apr-2022   
Total Views |

कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज

 
kusumagraj

मराठी भाषेला अभिजात साहित्याची देणगी देणाऱ्या एका साहित्यिकाच्या जन्मदिनाला 'मराठी राजभाषादिनाचा' बहुमान मिळावा यामध्येच त्यांच्या 'हातून' घडलेल्या कार्याची थोरवी कळते. बरोबर, ते शब्दांचा किमयागार म्हणजे कवी श्रेष्ठ 'कुसुमाग्रज' होय ! मूळच्या गजाननाचे, वयाच्या अठराव्या वर्षी (१९३०) चुलत्याने दत्तक घेतल्यामुळे 'विष्णू' नामकरण करण्यात आले व या विष्णू अवताराने माय मराठीला आपल्या शब्दरत्नांनी श्रीमंत केले. पुढे विष्णू हे नाव वगळून 'कुसुमाग्रज' या टोपणनावाने ते कविता लिहू लागले‌. कुसुमाग्रज या अतिशय अलंकारिक नावाला त्यांच्या राहणीमानाइतकाच साधा अर्थ आहे. या शब्दाची फोड केल्यास 'कुसुम+अग्रज' म्हणजे कुसुमचा थोरला बंधू असा होतो.याच नावाने ते घराघरात पोहोचले. मराठी कवितेला लाभलेल्या सावरकर, मर्ढेकर, बोरकर, खानोलकर, पाडगावकर, माडगूळकर, अशा अनेक 'करां'पैकी शिरवाडकर एक !.त्यांचे काव्य विश्व बघता, 'एखादी कविता पुरते एखाद्या आयुष्याला' अशी भावना मनात निर्माण होते.

 

१९३३ साली जीवनलहरी हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह प्रकाशित झाला. त्यानंतर जाईचा कुंज, विशाखा, समिधा, किनारा, मेघदूत, मराठी माती, स्वगत, हिमरेषा हे एकवीस काव्यसंग्रह प्रकाशित झाले. १९३३ ते २००२ जवळ जवळ ७० वर्ष कुसुमाग्रजांच्या प्रतिभेतून जन्माला आलेली काव्यसुमने माय मराठीला सुशोभित करीत होती. कुसुमाग्रजांच्या कवितेविषयी आपण काय बोलणार? त्यांच्या कवितेला एखाद्या 'ज्ञानपीठाची'च शब्दांजली हवी ! वि.स. खांडेकरांनी 'विशाखा' या काव्यसंग्रहासाठी प्रस्तावना लिहिली आहे. प्रस्तावनेच्या सुरुवातीला त्यांनी कुसुमाग्रजांच्या कवितेचे वर्णन इतक्या सुंदर पद्धतीने केले आहे की काय सांगू ! ते म्हणतात की, "रत्नहाराचे तेजस्वी सौंदर्य कुणाला समजावून सांगावे लागत नाही. डोळ्यांना ते आपोआपच जाणवते. रातराणीच्या सुगंधाची कुणी चर्चा करीत बसत नाही.वाऱ्याच्या झुळुकेबरोबर तो आला की मन क्षणार्धात प्रसन्न होऊन जाते. लहान मुलाच्या नाजूक पाप्याची अवीट गोडी कळायला पुस्तकी पांडित्याची आवश्यकता नाही.एकाच स्पर्शात ओठांना त्या अमृताची माधुरी कळते.सुंदर आणि सजीव कवितेचे ही असेच आहे. त्याला प्रस्तावना कशाला हवी ?" या चार ओळीत वि.स. खांडेकर कुसुमाग्रजांची कविता आपल्या डोळ्यासमोर उभी करतात.

 

कुसुमाग्रजांच्या कवितेवर सावरकरांच्या कवितेचे आणि विचारांचे संस्कार जाणवतात. 'रसयात्रा'च्या प्रस्तावनेत कवी शंकर वैद्यांनी सावरकरांच्या 'आकांक्षा', 'आत्मबल' व कुसुमाग्रजांच्या 'अहि-नकुल', 'मी जिंकलो' या कवितांमधील विषयाचे आणि वृत्तीचे साधर्म्य वाचकांच्या नजरेत आणून दिले आहे. देशाच्या स्वातंत्र्याबद्दल लोकांमधे जागृती निर्माण करण्यासाठी सावरकरांप्रमाणे कुसुमग्रजांनीही कवितेचे माध्यम वापरले. 'गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार' , 'उषःकाल', 'जालियनवाला बाग', इ.अशा कवितांमधून त्यांचे देशप्रेमी विचार प्रकट होतात.

 

खांडेकरांच्या म्हणण्याप्रमाणे कुसुमाग्रज हे 'मानवतेचे' कवी होते. त्यामुळे त्या काळात त्यांच्या नजरेसमोर घडणाऱ्या घटना, माणसांचे दुःख, त्यांच्या व्यथा ते कवितेतून मांडत. 'लिलाव', 'गुलाम' या कविता त्याचीच साक्ष देतात.

 

'स्मरण', 'मौन', 'पृथ्वीचे प्रेमगीत', 'कोलंबसचे गर्वगीत', 'टिळकांच्या पुतळ्याजवळ', 'हा चंद्र','स्मृती', 'अनाम वीरा, 'मारवा', 'काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्याचे हात ', 'प्रेम कुणावर करावे', 'ओळखलंत का सर मला', 'मातीचे गायन'..... अशा अनेक अनेक कविता लोकप्रिय आहेत.

 

ज्ञानपीठ पुरस्कार, पद्मभूषण पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी ते सन्मानित आहेतच; पण १९९६ साली एका ताऱ्याचे 'कुसुमाग्रज' हे नामकरण करून त्यांना एका विलक्षण पुरस्काराने सन्मानित केले. त्यांच्या साहित्याकडे पाहिले की, अजून आपण काहीच वाचलेले नाही याची खंत वाटते व अजून बरेच साहित्य वाचायला मिळणार या विचाराने आनंदही होतो. आजही माझ्यासारख्या तरुण विद्यार्थ्यांना त्यांच्या कविता आवडतात, त्या पुनः पुन्हा वाचाव्याशा वाटतात यातच सर्व काही आले.

 

'गेल्यावरही या गगनातील

गीतांमधूनी राहीन मी'

असे ते स्वतःच लिहून गेले आहेत. त्यामुळे आकाशातील 'कुसुमाग्रज' या ताऱ्याप्रमाणे तेदेखील यावद्चंद्रदिवाकरौ चिरंजीव राहतील यात शंका नाही ! या लेखात केवळ 'कवी' शिरवाडकरांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला; पण त्यांचे काव्य विश्व बघता हे एकतृतीयांशदेखील नाही आहे याची जाणीव मला आहे. पुन्हा केव्हा, तरी हा विषय छेडू या. तोपर्यंत त्यांच्या कविता वाचत राहू या‌ !

 

संदर्भ :

१) विशाखा (काव्यसंग्रह)

२) रसयात्रा कुसुमाग्रज (संपादक : बोरकर, वैद्य) (काव्यसंग्रह)

३) अंतरजाल

 

© मृण्मयी गालफाडे