मजविण मज तु दे रे राम

युवा विवेक    04-Apr-2022   
Total Views |

मजविण मज तु दे रे राम (अंतिम भाग)

 
ramdas

'दास म्हणे मज दे रे राम' म्हणत समर्थ आपल्यासाठी हितकारक आणि जनसुखकारक असं मागणं रामाकडे मागितलं आहे. गेले दोन भाग आपण समर्थांच्या चौपदीचे चिंतन करतो आहोत. त्यांच्या शब्दांचा यथाशक्ती, यथामती अर्थ लावायचा प्रयत्न करतो आहोत. आजचा ह्या लेखमालेचा अंतिम भाग पाहू या.

 

पावन भिक्षा दे रे राम | दीनदयाळा दे रे राम |

'पावन भिक्षा' हे शब्द वाचताच मला भगवद्गीतेतील एक श्लोक आठवला.

दातव्यमिति यद्दानं दीयतेऽनुपकारिणे ।

देशे काले च पात्रे च तद्दानं सात्त्विकं स्मृतम्।। १७.२०|| 

 

सतराव्या अध्यायात कृष्णाने अर्जुनाला तीन प्रकारचे दान सांगितले आहे. अनुक्रमे सात्विक, राजसिक आणि तामसिक ! त्यातील सात्विक दानासंदर्भात वरील श्लोक आहे. समर्थांना अभिप्रेत असलेली 'पावन भिक्षा' म्हणजे कृष्णाने सांगितलेले सात्विक दान असावे असे वाटते. दान देणे हे माझे कर्तव्य आहे या हेतूने योग्य व्यक्तीला, योग्य वेळी दिलेले दान म्हणजे सात्विक दान असं कृष्ण सांगतो, तर अशी दान देण्याची माझी वृत्ती माझ्याही मनात निर्माण होऊ दे; तसेच गरज पडल्यास मलाही अशी पावन भिक्षा मिळू दे असे समर्थ म्हणत असावेत. त्यांनी या परिस्थितीला अनुरूप असे रामाला दीनदयाळ हे विशेषण वापरले आहे. संपूर्ण चौपदीत समर्थांनी रामासाठी हे एकमेव विशेषण वापरले आहे. याचं कारण म्हणजे 'रामाने त्याच्या दीनदयाळ या विशेषणाला जागून मी जे काही मागतो आहे ते पावन भिक्षेच्या स्वरूपात मला द्यावे' हे असावे असे मला वाटते. पुढे ते म्हणतात,

 

अभेद भक्ती दे रे राम |

खरंतर 'तुझी आवडी दे रे राम' असे म्हटल्यावर आपोआप आपल्याकडून 'अभेद भक्ती' घडायला हवी. मनात कुठलेही किंतु परंतु न ठेवता केवळ त्याचाच विचार असणे अपेक्षित आहे; पण तसं होत नाही. आपण भक्ती करतानाही स्पर्धा करतो.आणि त्याचेच फलस्वरूप भेदाभेद निर्माण होतात. उदा. सगुण भक्ती श्रेष्ठ की निर्गुण भक्ती श्रेष्ठ ? शिवाची उपासना श्रेष्ठ की विष्णूची उपासना श्रेष्ठ ? मग मी जर अमुक प्रकारे पूजा केली, तर देव प्रसन्न होईल का ? माझ्या मदतीला येईल का ? अशा अनेक विकल्पांमधे आपले मन गुंतून पडते आणि मूळ भक्तीचा विचार मागे पडतो. एवढ्या वेळा भक्ती हा शब्द वापरला, मग भक्ती म्हणजे नेमके काय ? असा‌ आपल्याला प्रश्न पडतो. मला वाटते भक्ती म्हणजे देवावर असलेला दृढ विश्वास, भक्ती म्हणजे समर्पण, भक्ती म्हणजे समाधान आणि भक्ती म्हणजे शांतता ! मनात जर भेदाभेद असतील, शंका असतील, अविश्वास असेल, तर तिथे देवाला जागा राहिल का ? एक तर सकारात्मकता राहिल, नाही तर नकारात्मकता ! दोन्ही एके ठिकाणी नांदू शकणार नाही. म्हणून समर्थ म्हणतात रामा कुठलाच भेद माझ्या मनात ठेवू नकोस आणि शुद्ध भक्ती माझ्याकडून घडू दे.अशी अभेद भक्ती‌ केव्हा घडेल ? तर पुढे समर्थ म्हणतात,

 

आत्मनिवेदन दे रे राम !

'ऐका निवेदनाचे लक्षण | देवासी वहावे आपण |' असं दासबोधात सांगतं. आता याच दृष्टीने 'आत्मनिवेदनाचा' विचार केल्यास स्वतःला देवाला अर्पण करणे असा याचा अर्थ होतो. देवाला एकदा सर्वस्व अर्पण केले की भेदाभेद राहणारच नाही आणि अभेद भक्ती घडेल; पण हे लिहिताना, वाचताना फार सोपे वाटते.एक विचार करा, जिथे साधा एक पेन दुसऱ्याला देताना आपण दहावेळा विचार करतो तिथे आयुष्यभर ज्या 'स्व'ला आपण कुरवाळतो ते अर्पण करणे सोपे आहे का ? नाही.सर्वात कठीण गोष्ट आहे ही ! धनश्री लेले त्यांच्या एका प्रवचनात म्हणाल्या होत्या की, 'आपण सर्वस्व देण्याच्या गोष्टी करतो. एक वेळ 'सर्व' देता येईलही पण 'स्व' देणं सगळ्यांत कठीण आहे'. हे स्वतःहून करणं निश्चितच कठीण आहे आणि म्हणूनच समर्थ रामाला ही वृत्ती देण्याची विनंती करत आहेत.

 

पुढे ते म्हणतात, 'तद्रुपता मज दे रे राम'.

तद्रुपता ! म्हणजे कुठलेही काम करताना त्यात एकरूप होऊन जाणे. गुंगून जाणे. रममाण होणे. आपण जेव्हा एखादे काम मन लावून करतो तेव्हा काम तर चांगले होतेच, पण ते काम करतानाची 'process' आपण मनापासून 'enjoy' करतो.प्रत्येक क्षणाचा, प्रत्येक गोष्टीचा आपण आनंद घेऊ शकतो.पण प्रत्येकवेळी काम करताना अशी ब्रह्मानंदी टाळी लागत नाही ना, म्हणून तद्रुपता दे असं समर्थ म्हणतात. म्हणजे प्रत्येक क्षणाचा आनंद घेता येईल आणि एकदा रामनामात तद्रुप होता आले की, आत्मनिवेदन सहज शक्य आहे. कारण आपले मन आनंदाच्या स्वाधीन व्हायला कधीही तयार असते. तद्रुपतेच्या पुढे समर्थ म्हणतात,

 

अर्थारोहण दे रे राम !

वाह ! समर्थांनी किती योग्य शब्द वापरला आहे. अर्थारोहण. समर्थ प्रॅक्टिकल आहेत. आपल्यासारखी लोकं अध्यात्माकडे केव्हा वळतील ? जेव्हा घरचे सगळे नीट असेल तेव्हा.मराठीत सांगायचे, तर सगळे 'सेटल' असेल तेव्हा. नाही तर देव देवळात आणि लक्ष खेटरात अशी अवस्था झालेली आपण बघतोच. असं होऊ नये म्हणून समर्थ स्वतःच सांगतात की 'आधी प्रपंच करावा नेटका'.आता प्रपंच करताना अर्थकारणाची गरज पडणारच ! पण त्या 'अर्था'च्या आधीन न होता त्यावर 'आरोहण' करता यावे असा समर्थांचा विचार आहे. हरप्रकारे धन, संपत्ती कमावण्याच्या लालसेपेक्षा, नैतिकदृष्ट्या, स्वकष्टाने पैसा कमावण्याची म्हणजेच अर्थारोहणाची वृत्ती व्हावी असे समर्थ मागतात. याचं कारण आपण पाहिले, की अर्थकारण नीट राहिले तर प्रपंच नीट होईल आणि प्रपंत नीट झाला की परमार्थ नीट होईल.

 

पुढे ते म्हणतात, 'सज्जनसंगती दे रे राम | अलिप्तपण मज दे रे राम |'

सज्जनसंगती ! संतमंडळीच नव्हे, तर अगदी आपली घरची मंडळीसुद्धा या बाबतीत सतत आपल्याला उपदेश करत असते. 'जरा चांगल्या संगतीत राहात जा, उगाच अमुक एका व्यक्तीशी बोलणे टाळ' अशी वाक्य घराघरांतून कानावर पडतात, तर काय होते सज्जनसंगतीत राहिल्याने ? अनेक संतांनी उदाहरणे दिली आहेत पण मला आता कबीरजींचा एक सुंदर दोहा आठवतोय.

 

'कबीरा संगत साधु की जो गंधी कीबास |

जो कुछ गंधी दे नहीं तो भी बास सुबास |'

कबीरजी म्हणतात, साधुची म्हणजे सज्जन माणसाची संगत एखाद्या अत्तर विक्री करणाऱ्या माणसासारखी आहे. आपण त्याच्या दुकानात फक्त गेलो, काहीही खरेदी केले नाही, तरीसुद्धा तिथून बाहेर पडताना तो सुगंध आपल्या बरोबर घेऊन जातो; तसेच सज्जन व्यक्तीसोबत राहिल्यास‌ त्याच्या अंगी असलेले चांगले गुण, त्यांच्या चांगल्या सवयी आपल्याही व्यक्तीमत्वात नकळत उतरतात. हेच दुर्जनालाही लागू होते. दुर्जनाकडून वाईट सवयी घेण्यापेक्षा सज्जनाकडून चांगल्या सवयी घेणे अधिक श्रेयस्कर. म्हणून सज्जनसंगती. जाताजाता संस्कृतप्रेमींसाठी एक सुभाषित उद्धृत करते. 'कीटोऽपि सुमनः संगात् आरोहति सतां शिरः'.फुलाच्या सान्निध्यात राहिल्यामुळे एखाद्या कीटकालाही देवाच्या शिरावर स्थान मिळते. तात्पर्य काय, तर सज्जनसंगतीमुळे आपली प्रगतीच होते.

 

अलिप्तपण. कदाचित समर्थ म्हणत असावेत की, अशी संगत दिली नाहीस तर अधोगती टाळण्यासाठी अलिप्तपण दे. अलिप्तपणा इतरही बाबतीत आपल्याला लाभदायक असतोच. एकांत-लोकांत, ब्रह्मासि-आत्मासि या गोष्टी एकमेकांना पूरक आहेत. या दोन्ही गोष्टींचा समन्वय साधला तर आपली प्रगती होईल. केवळ चांगल्या लोकांमध्ये मिसळल्याने काहीही होणार नाही. त्यासाठी एकांतात अलिप्तपणे चिंतन करणं आवश्यक आहे, आपल्या कृती पडताळून पाहणे आवश्यक आहे. म्हणून समर्थ सज्जनसंगती सोबत अलिप्तपणा मागतात..

 

पुढची ओळ आहे 'ब्रह्मअनुभव दे रे राम'. एव्हाना तुमच्या लक्षात आले असेल की, आपण वरच्या पायरीवर येऊन पोहोचलो आहोत. पहिल्या भागात कोमल वाचा, विद्या वैभव, प्रसंग ओळखी‌ यांसारख्या अतिशय सोप्या, आपल्या पातळीवर आपण साध्य करू शकू अशा मागण्या समर्थांनी मागितल्या. मागच्या भागात संगीत गायन, आलाप गोडी, दस्तक टाळी यासख्या थोड्या हाताबाहेरच्या गोष्टी मागितल्या आणि आज अभेद भक्ती, तद्रुपता, आत्मनिवेदन यासारख्या आपल्यासाठी जवळपास अशक्य असणाऱ्या गोष्टी समर्थ मागत आहेत. त्याच माळेतील हा मणी. 'ब्रह्म अनुभव'! हे फक्त तो परब्रह्मच देऊ शकतो. कारण तो 'स्वानुभुत्येकमनाय' असा आहे. इतर कोणीही हा अनुभव देऊ शकणार नाही आणि तो अनुभव घेतल्यास त्याचं वर्णनदेखील करू शकणार नाही. म्हणून रामाकडे ब्रह्म अनुभव मागणे अगदीच योग्य आहे; पण ब्रह्म अनुभवानंतर काय मागावे एखाद्याने? मुक्ती, सिद्धी, किंवा फारच आपल्यासारखा मनुष्य असला तर प्रसिद्धी मागेल.पण समर्थ काय मागतात, 'अनन्यसेवा दे रे राम' ! इथेच तर समर्थांचे मोठेपण आहे. ब्रह्म अनुभव मिळाल्यावर अनन्यसेवा मागण्या मागे 'आता मी तो अनुभव घेतला आहे. मला तुझे स्वरूप कळले आहे. त्यामुळेच मला पूर्वीपेक्षा अधिक उत्कटतेने तुझी भक्ती करायची आहे सेवा करायची आहे' ही भावना असावी असे वाटते.

 

अशी अनन्यसेवा मागितल्यावर या चौपदीतील सर्वोच्च मागणे समर्थ मागतात की, जे या लेखाचे शीर्षक आहे, ते म्हणजे 'मजविण मज तू दे रे राम' ! मला ही ओळ अतिशय आवडते.ज्या 'मी'ने आपले अवघे आयुष्य व्यापून टाकले आहे, जो 'मी' अनेक समस्यांना कारणीभूत ठरतो त्या 'मी'शिवाय माझं अस्तित्व दे असं समर्थ म्हणतात.का ? तर 'मी' आला म्हणजे 'अहंकार' आला ! आणि ब्रह्म अनुभव घेतलेल्या माणसाच्या मनात अहंकार शिल्लक राहिलंच कसा ? जिकडे पहावे तिकडे तू दिससी नयना अशी स्थिती होते. मग मला माझ्यातही तूच दिसतो आहेस, तर मला माझे वेगळे अस्तित्वच कशाला देतोस रामा ? असं म्हणत मी तुपणाची बोळवण होते. हा साक्षात्कार झाला की, पुढे काहीही सांगण्यासारखं, मागण्यासारखे उरत नाही म्हणूनच समर्थ इथे आपल्या वाणीला विराम देतात.

 

आता इथून उलटं पाहिलं तर ? म्हणजे 'मी' नाहीसा झाला की अनन्यसेवा घडेल, अनन्यसेवा घडली की, ब्रह्म अनुभव मिळेल, ब्रह्म अनुभव मिळाला अलिप्तपण मिळेल, अलिप्तपणे गोष्टींकडे बघण्याची दृष्टी मिळाली की, सज्जनांची पारख करता येईल इ.इ.....स्थूलाकडून सूक्ष्माकडे आणि सूक्ष्माकडून पुन्हा स्थूलाकडे जाऊ शकतो आपण. इतकं उदात्त मागणं समर्थांनी मागितले आहे.

 

'मजविण मज तू दे रे राम' याप्रमाणे आपल्याला संपूर्ण 'मी' जरी नाहीसा करता नाही आला तरी आपल्यातला 'मी'पणा थोडासा कमी करता‌ आला तर ? एक दिवस खरंच ही चौपदी जगू शकतो आपण. असो. इथेच थांबते. समर्थांनी सांगितलेल्या गोष्टी अंगिकारण्याचा प्रयत्न करू या आणि हे चिंतन आपल्या मनात असेच चालू ठेवूया.

 

जय जय रघुवीर समर्थ...!

- मृण्मयी गालफाडे.