पचन सुधारण्याचे नैसर्गिक उपाय

युवा विवेक    14-May-2022
Total Views |

 
digest

नमस्कार मित्रांनो,

मागच्या भागात आपण पाहिलं की, माणसाचं मेटबॉलिझम जर मंद झाले असेल, तर आहारात बदल करूनही मेद बनण्याचे प्रमाण कमी होत नाही. कारण अशा व्यक्तीने काहीही खाल्लं तरीही त्यातील काही भाग चरबीमध्ये रूपांतरित होतच राहतो. परिणामी खाण्यावर ताबा ठेवूनही वजन कमी होत नाही किंवा वाढतच राहते. आज आपण हे पाहणार आहोत की, अशा परिस्थितीत तुम्ही काय करू शकता... आहारात बदल करण्याआधी अशा कोणत्या गोष्टी करू शकता ज्यामुळे नैसर्गिकरित्या तुमचे पचन सुधारून मेद बनण्याचे प्रमाण कमी होईल.

 

सर्वांत महत्वाची गोष्ट मी आज तुम्हाला सांगणार आहे, ती कदाचित तुम्ही चटकन मान्य करणार नाही. मात्र मी तुम्हाला पूर्णपणे पटवून देणार आहे. आपण सर्व जण नेहमी विचार करतो की वजन कमी करायचे असेल तर खाणे कमी केले पाहिजे. दिवसातून दोनच वेळा किंवा शक्य तितक्या कमी वेळा खाल्ले पाहिजे, तर वजन कमी होईल! बरोबर ना?

 

हे पूर्णपणे चूक आहे! याउलट मी तुम्हाला हे सांगणार आहे की, जर तुम्हाला मेटबॉलिझम सुधारायचे असेल आणि वजन कमी करायचे असेल, तर आधी नीट खायला सुरुवात करा! जर तुमचं वजन अति खाण्यापिण्याने किंवा चुकीचं अन्न खाण्याने वाढलं असेल, तर नक्कीच तुम्ही त्या चुकीच्या सवयी सोडायला हव्यात, तरच तुमचे वजन नियंत्रणात राहील. मात्र, जेव्हा खाणंपिणं अगदी कमी असूनही वजन कमी होत नाही, तेव्हा ते आणखी कमी करणं हा उपाय असूच शकत नाही! मेटबॉलिझम स्लो असण्यामागे एक महत्वाचं कारण आहे. ते म्हणजे, अत्यल्प प्रमाणात खाणे!

 

काही व्यक्ती वजन कमी करण्याच्या प्रयत्नात अगदीच कमी खातात. चारपाच तास पूर्णपणे उपाशी राहतात. कधीकधी तर आठ किंवा बारा ताससुद्धा उपाशी राहतात! मात्र, परिणाम शून्य! उलटपक्षी वजन वाढतच राहते.

 

याचे कारण आपण शास्त्रीय दृष्टिकोनातून पाहू. समजा तुम्हाला सकाळी लवकर एक शेकोटी पेटवून ती रात्र होईपर्यंत पेटती ठेवायची असेल तर काय कराल? सकाळी लाकडे आणि तेल वापरून तुम्ही शेकोटी पेटवलीत. मात्र, त्यानंतर रात्र होईपर्यंत तिच्याकडे पाहिलेही नाही तर ती दिवसभर पेटत राहील का? नक्कीच नाही! कारण जेव्हा तेल आणि लाकडे संपतील तेव्हा शेकोटी आपोआप विझून जाईल. समजा संध्याकाळी तुमच्या लक्षात आलं की, शेकोटी विझली आहे आणि तुम्ही पोतं भरून लाकडं त्यात टाकली, गॅलन भर तेल ओतलं, तर ती पुन्हा जळू लागेल का? ते तर होणार नाहीच, परंतु टाकलेली सर्व लाकडे आणि तेलसुद्धा वाया जाईल.

 

आपला जठराग्नीसुद्धा या आगीसारखाच असतो. सकाळी उठल्यावर त्याची सुरुवात चांगली न्याहारी म्हणजेच ब्रेकफास्टने व्हायला हवी. मात्र, त्यानंतरही दर दोन ते तीन तासांनी त्यात इंधन टाकत राहण्याची गरज असते, तरच तो अग्नी विझून न जाता कार्यरत राहील. म्हणूनच आपण मेद कमी करण्यासाठी दर दोन ते तीन तासांच्या अवधीने काही न काही खाण्याची गरज असते. असे वेळच्यावेळी meal plans असले तर मेटबॉलिझम स्लो न होता ती दिवसभर सुरू राहते आणि पूर्ण दिवसभरात तुम्ही जे काही अन्न सेवन करता ते मेदात रूपांतरित न होता त्याचे पूर्ण पचन होते. परंतु, असे जर दर दोन किंवा तीन तासांनी काही न काही खात राहायचे असेल, तर काय खावे हा प्रश्नसुद्धा फार महत्वाचा ठरतो. कारण पदार्थ जास्त कॅलरीज असलेले असतील तर वजन कमी न होता, अतिरिक्त कॅलरीजमुळे ते वाढण्याचीच शक्यता आहे. म्हणून अशा मधल्या वेळातल्या meals मध्ये कॅलरीज कमी असणारे, नैसर्गिक आणि पचनाला हलके असणारे पदार्थ खावेत. निमगोड म्हणजेच कमी गोड असणारी फळे जसे सफरचंद, कलिंगड, मोसंबी, संत्री ही फळे मधल्या वेळच्या खाण्यासाठी उत्तम. जास्त गोड फळे जशी केळी, आंबे, सीताफळ ही फळे मात्र टाळावीत. दुसरा पर्याय म्हणजे सुका मेवा. कोणत्याही दोन किंवा तीन सुक्या मेव्याचे मिश्रण अशा पद्धतीने घ्यावे की, एकूण नग जास्तीतजास्त दहा भरतील, त्याहून जास्त नको.

 

आणखी खाण्यायोग्य पर्याय म्हणजे भाजलेले चणे शेंगदाणे, पोह्यांचा चिवडा, पॉपकॉर्न, मकाणे, इत्यादी. हे सर्वच पदार्थ मधल्या वेळी खाण्यासाठी साजेसे आहेत. अशा प्रकारे small meals but frequently हा नियम वापरून दिवसभरात किमान पाच ते सहा वेळा अन्न सेवन केल्यास मेटबॉलिझम फास्ट होण्यास नक्की मदत होते.

 

यामुळे नक्की काय होते? तर, मेंदूला संदेश मिळतो... वेळच्यावेळी अन्न मिळत आहे, काहीही साठवून ठेवण्याची गरज नाही. तुम्ही जेव्हा पाच-सहा तास काहीही खात नाही तेव्हा मेंदूला संदेश जातो की, ऊर्जा कमी पडते आहे, पुढे आणखी काही तास ऊर्जेसाठी काही मिळाले नाही तर पर्यायी व्यवस्था म्हणून अन्न साठवून ठेवावे. आपल्या शरीराकडे ऊर्जा किंवा अन्न साठवण्याचा एकमेव मार्ग आहे, तो म्हणजे अन्न किंवा ऊर्जा मेदाच्या स्वरूपात साठवणे! शरीराने स्वतःच्या बचावासाठी केलेली आपत्कालीन उपाययोजना आहे ही. ही आपत्कालीन स्थिती निर्माणच होऊ दिली नाही, तर शरीर मेदाचा अतिरिक्त संचय करतच नाही. म्हणूनच मी म्हणाले, चरबी कमी करायची असेल, तर उपाशी राहणे सोडा आणि आधी काही तरी खायला लागा.

 

मेटबॉलिझम नैसर्गिकरित्या गतिमान करण्यासाठी काही घरगुती रेसिपीज देते, जी डिटोक्स ड्रिंक्स म्हणून ओळखली जातात. यांपैकी कोणतेही एक पेय सकाळी उठल्यावर उपाशीपोटी घ्यावे आणि त्यानंतर एक तास काहीही न खाता, एका तासानंतरच ब्रेकफास्ट करावा. असे पेय पुढीलप्रमाणे आहेत.

 

1. दालचिनीचे पाणी : एक ग्लास पाण्यात दालचिनीचा एक मध्यम आकाराचा तुकडा उकळवून ते पाणी कोमट असताना प्यावे.

2. लिंबू आणि मध: एक ग्लास कोमट (गरम नव्हे) पाण्यात थोडेसे लिंबू पिळावे आणि एक चमचा मध टाकून ते प्यावे

3. जिऱ्याचे पाणी : एक ग्लास पाण्यात एक चमचा कच्चे जिरे टाकून, पाणी उकळून गाळून कोमट असताना प्यावे.

4. यापैकी काहीही मानवत नसेल, तर फक्त एक किंवा दोन ग्लास कोमट पाणी प्यावे.

 

हे सगळेच उपाय घरच्याघरी करण्यासारखे आहेत आणि त्यांनी कोणताही अपाय नाही. करून पहा...

समजा हे सर्व करूनही फरक पडत नसेल तर काय? काही मेडिकल प्रॉब्लेम असू शकतात का? की, ज्यामुळे काहीही केले तरी वजनात फरक पडत नाही? जर मेडिकल प्रॉब्लेम असतील, तर कसे ओळखावेत? कोणत्या रक्तचाचण्या कराव्यात? कोणत्या डॉक्टरकडे जावे?

 

या सर्व महत्त्वाच्या विषयांवर आपण पुढच्या भागात बोलू. तोपर्यंत Stay Healthy, Be Happy.