परि स्मरते आणिक....

युवा विवेक    16-May-2022   
Total Views |


pari smarate anik

'नवलाख तळपती दीप विजेचे येथ

उतरली तारकादळे जणू नगरात

परि स्मरते आणिक करते व्याकुळ केव्हा

त्या माजघरातील मंद दिव्याची वात !'

 

कुसुमाग्रजांची‌ ही कविता मला अतिशय प्रिय आहे. स्मृती हे मानवाला लाभलेले वरदान. त्यामुळेच एखादा प्रसंग समोर घडत असताना आपले मन नकळत भूतकाळात जाते आणि स्मृतींच्या आधारे तुलना करायला लागते. आता आपण चांगल्या स्थितीत आहोत की, वाईट स्थितीत याची जाणीव ही तुलनाच आपल्याला करून देते; पण काहीही म्हणा, काही वेळ त्या स्मृतीगंधात रममाण व्हायला फार मजा येते.

 

सध्या तळतळीत उन्हाचा मे महिना सुरू आहे. उन्हाळा म्हटला की प्रत्येकाला उन्हाळ्याच्या सुट्ट्या.... मामाचे घर हे आठवणारच. आता कितीही साधने उपलब्ध असली तरी त्यात 'ती' मजा नाही हे आपण सारेच जाणतो आणि पु.लंच्या 'चक् चक् पूर्वीचं पूणं राहिलं नाही' च्या चालीवर 'पूर्वीचा उन्हाळा राहिला नाही' हे वाक्य बोलून जातो. त्या वेळी 'परि स्मरते आणिक करते व्याकुळ' यापेक्षा दुसरे कुठलेही शब्द आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी अपूर्ण वाटतात.

 

काल एका छोट्या दोस्ताशी मस्त गप्पा झाल्या. त्याचे सुट्टीचे 'प्लॅन्स' ऐकून माझ्या बालपणीच्या स्मृती जाग्या झाल्या. आम्ही मित्र-मैत्रिणी सुट्टीची वाट 'काहीही न करण्यासाठी' पहायचो ! क्लासेस, शिबिर 'सब मोह माया'. वर्षभर काम करून करून थकलेल्या मेंदूला (आमच्या मते) ती एक विश्रांती असायची. सुरुवातीचे काही दिवस उशिरा उठणे, मग सगळी आन्हिके उरकून शक्य तितक्या लवकर आणि शक्य तितक्या उशीरापर्यंत खेळायला जाणे, हाच काय तो दिनक्रम असायचा.

 

विदर्भात बालपण गेल्यामुळे 'उन्हाचा फटका' काय असतो हे मी चांगलेच अनुभवले आहे नव्हे अनुभवते आहे. अस्सल मुंबईकराला गर्दीचे आणि अकोलेकराला गर्मीचे काहीही वाटत नाही. इकडे खूप उकाडा आहे याची तक्रार विदर्भीय वासी सोडून इतरच करत असतात. केवळ उन्हाचा फटका बसू नये म्हणून दुपारी जबरदस्तीने घरचे डांबून ठेवायचे. तो बंदिवास कसाबसा सहन करण्यासाठी पत्ते, लुडो, कॅरम हे वर्षभर दुर्लक्षित असलेले खेळ एकदम अध्यक्षपद स्विकारायचे. जबरदस्तीने खेळायला बसवलेले, लिंबू-टिंबू वाटणारे आजी-आजोबा जेव्हा सगळा डाव जिंकायचे तेव्हा आम्हा भावंडांचे चेहरे पाहण्यासारखे असायचे. एकूण काय, तर नुसती धमाल मस्ती चालायची.

 

तेव्हा घरी एसी, फ्रिज नव्हते.. त्यामुळे कुलर आणि माठ यांची गणना जीवनावश्यक वस्तूंमध्ये व्हायची. ऊसाचा रस, लिंबू सरबत, पन्हं, टरबूज, खरबूज आणि आंबे हा सगळा खजिना कुलरच्या साक्षीनेच फस्त केला जायचा. हे करताकरता बॅकग्राऊंडला आजी-आजोबा आणि आई-बाबांच्या 'हमारे जमाने में' च्या गोष्टी.त्या ऐकता ऐकता कधी झोप लागायची पत्ताच लागायचा नाही !

 

वीज गेली की खरी पंचाईत व्हायची.त्यात रात्री गेली तर, कल्याण ! कंदिल लाईट डिनर प्लस झोपेचं खोबरं ठरलेलं; पण सगळे असले की, तेही सुसह्य वाटायचे. जेवण झाल्यावर वीज येईपर्यंत गाण्याच्या भेंड्या, नाव गाव फळ फूल, कोणाची तरी नक्कल करून दाखवायची असे सांस्कृतिक कार्यक्रम चालायचे आणि पद्धतशीरपणे गच्चीवर अंथरूण घातले जायचे. छान चांदण्या मोजतामोजता भूताच्या, राजा-राणीच्या, अकबर-बीरबलाच्या गोष्टींने दिवसाची सांगता व्हायची.

 

वाढत्या वयामुळे आणि अभ्यासामुळे दरवर्षी यातले काही ना काही कमी होत गेले. आता तर काय सुट्टीच नाहीशी झाली ! तेव्हा वीज नसायची, नळाला पाणी दर पंधरा-वीस दिवसांनी यायचे, व्हिडिओ गेम्स नव्हते, नेट नव्हते....आजच्या तुलनेत बघायला गेलं, तर काहीच नव्हते पण तरी मजा यायची. कारण ती 'सुट्टीच' तशी होती ! लहानपणीच्या सगळ्या आठवणी ह्या बहुतांशी उन्हाळ्याच्या‌ सुट्टीशी निगडित असतात. कदाचित या उन्हाळ्याच्या सुट्टीमुळेच प्रत्येकाला आपले बालपण प्रिय असते, नाही का ? आजच्या कृत्रिम 'नवलाख दिव्यांची' सुखसुविधा उपलब्ध असलेल्या काळात प्रेमाची, जीवंतपणाची आणि निवांतपणाची प्रतिक असणारी ती 'माजघरातील मंद दिव्याची वात' हवीहवीशी वाटते आपल्याला.असो, हे वाचून तुमच्याही‌ बालपणीच्या स्मृती जागृत झाल्या असतीलच ना, तर थोडा वेळ छान त्या आठवणींमध्ये हरवून जा आणि तो काळ पुन्हा एकदा जगून या.

 

- मृण्मयी गालफाडे.