भारताचा सांस्कृतिक वारसा जपू या

युवा विवेक    20-May-2022   
Total Views |


museum

एखाद्या देशाची ओळख कशावरून ठरते? तेथील राज्यव्यवस्था, शासनव्यवस्था, अर्थव्यवस्था, संरक्षणव्यवस्था, क्रीडा-कलाक्षेत्रातील योगदान अशा अनेक बाबी त्या देशाची ओळख जागतिक पातळीवर निर्माण करत असतात. त्याचप्रमाणे देशाच्या वैशिष्ट्यांवरूनही त्या देशाची ओळख ठरत असते. तिथली खाद्यसंस्कृती, त्या देशाचा इतिहास याचाही प्रभाव लोकांवर पडत असतो. बघा ना, भारत म्हटला की, येथील वैविध्यपूर्ण खाद्यपदार्थ, येथील पुरातन स्थापत्यशैली, येथील हजारो वर्षांचा इतिहास, मंदिरं, लेणी, परंपरा लगेचच आपल्या डोळ्यासमोर येतात. पाश्चात्य देशातही गेली अनेक शतके भारताबद्दलचं आकर्षण कायम आहे.

 

प्राप्तकाल ही विशाल भूधर,

सुंदर लेणी तयात खोदा,

निजनामे त्यावरती नोंदा......

 

असं म्हणत आपल्या प्राचीन नागरिकांनी, कलाकारांनी कालौघात अत्यंत कौशल्यपूर्ण, लावण्यपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण अशा वस्तू, सौंदर्य प्रसाधनं, अवजारं, शस्त्रास्त्र तयार केली. तसं पाहता जगभरातील सर्वच देश आपापलं वैशिष्ट्य जपणाऱ्या पारंपरिक वस्तू तयार करतच असतात; पण मुळातच भारताइतका प्राचीन इतिहास अन्य कोणत्या देशाला लाभला असेल असं वाटत नाही. प्रत्येकच देश हे सारं सांस्कृतिक संचित जपण्याचा प्रयत्न करत असतो. नव्या पिढीकडे हा वारसा सोपवत असतो, आपला इतिहास या वारशाच्या माध्यमातून तिच्यापर्यंत पोहोचवत असतो. हे सारं आठवण्याचं कारण आहे जागतिक संग्रहालय दिन. १८ मे रोजी आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन साजरा केला जातो. बरोबर एक महिना आधी, म्हणजे १७ एप्रिल रोजी जागतिक वारसा दिन साजरा केला जातो. देशाची सांस्कृतिक ओळख जपण्यात या दोन्ही दिवसांचं मोलाचं योगदान आहे.

 

आपण लहान होतो, तेव्हा मे महिन्यात किंवा दिवाळीच्या सुट्टीत गावाला जाणं तर मस्ट असेच. त्याचसोबत मुंबईकरांसाठी मोलाचं असे ते येथील ऐतिहासिक वारसा स्थळं बघणं. गेट वे ऑफ इंडिया, घारापुरीच्या लेण्या, ऐतिहासिक वारसा असलेली छ.शि.म.टर्मिनसची इमारत, छत्रपती शिवाजी महाराज (पूर्वीचं प्रिन्स ऑफ वेल्स) वस्तू संग्रहालय, ऐतिहासिक एशियाटिक लायब्ररी, बाणगंगा जलाशय, वाळकेश्वर मंदिर, राणीहार अर्थात झगमगता क्वीन्स नेकलेस, कान्हेरी लेणी अशा अनेक ऐतिहासिक वास्तू आणि स्थळांना भेट देणं हेदेखील आपल्या वेळापत्रकाचा भाग असे. 'प्रिन्स ऑफ वेल्स' आणि भाऊ दाजी लाड पुरातन वस्तू संग्रहालय पाहणं हा एक अभ्यासाचा विषय होता, आहे. अनेक जुन्या अनमोल वस्तूंचा संग्रह इथे करण्यात आलेला आहे. त्याची व्यवस्थित काळजीदेखील संग्रहालय व्यवस्थापनाच्या वतीने घेतली जाते. अशी अगणित आणि सौंदर्यपूर्ण पुरातन स्थळं, वस्तू देशभरात आणि काही प्रमाणात देशाबाहेरही भारताची ओळख झाली आहेत. मुळातच फाळणीपूर्वी देशाचा विस्तार बराच मोठा असल्याने अनेक पौर्वात्य तसेच मध्यपूर्वेतील देशांतही भारतीय संस्कृतीची मुळं आढळतात किंवा त्या देशाच्या संस्कृतीवर भारताचा प्रभाव जाणवतो. कंबोडियातील अंगकोरवट हे सर्वांत मोठे मंदिर हे भारताच्या जगभरातील विस्ताराची ओळख करून देत दिमाखानं उभं आहे तर आजही जगभरात अनेक ठिकाणी भारतीयत्वाचा ठसा स्पष्ट करणाऱ्या वस्तू आणि वास्तू पुन्हा पुन्हा सापडत आहेत.

 

'युनेस्को'च्या वतीने दर वर्षी जगभरातील काही वास्तूंना वारसा स्थळाचा दर्जा बहाल केला जातो. भारतातील ४० स्थळांना वारसा स्थळाचा दर्जा प्राप्त झाला आहे. यात छ.शि.म. टर्मिनस, अजिंठा लेणी, सूर्यमंदिर, खजुराहो मंदिरं, हंपी येथील मंदिरं, घारापुरीच्या लेणी, सांचीचा स्तूप, नव्यानेच या यादीत जोडली गेलेली कोकणातील कातळशिल्प अशा अनेक वारसास्थळांना यात स्थान मिळालं आहे. आज या स्थळांना सुरक्षा मिळते आहे. युनेस्को आणि भारत सरकारही त्यासाठी कार्य करत आहे, हे सुखावह आहेच. जे आहे ते जपण्यासाठी आपण काय गमावलंय त्याचाही विचार केला पाहिजे.

 

पूर्वापार भारतीय संस्कृतीत जागतिक दर्जाचे ग्रंथ, वास्तू, प्राचीन विज्ञान-गणित-काव्य-शास्त्र-विनोद यांच्यावर आधारित ग्रंथसंपदा, गुरुकुलं यांचं अस्तित्व होतं. जागतिक दर्जाची विद्यापीठं येथे होती. जागतिक दर्जाच्या कलाकारांनी अद्वितीय अशा कलाकृतींचं निर्माण येथे केलं. त्यातली काही तर अविश्वसनीय आहेत. कैलास मंदिरच पहा ना! पुढे परकीय आक्रमकांनी विध्वंस करून येथील सांस्कृतिक संचित नष्ट केलं. नालंदा विद्यापीठ हे त्यातील महत्त्वाचं उदाहरण. काश्मीरातील शारदा विद्यापीठाचीही स्थिती वेगळी नव्हती. अशा किती सांस्कृतिक संचितांना आपण मुकलो आहोत. जुने जाऊ द्या मरणालागून.....म्हणण्याइतकं हे संचित किंवा हा वारसा साधासुधा नव्हता. आता गरज आहे ती उर्वरीत वारसा, प्राचीन वस्तू यांना जपण्याची. अत्यंत अभिमानाने त्यांचं प्रदर्शन जगापुढे करण्याची.

 

गेल्या सुमारे सहा ते सात वर्षांत भारताची जगभरातील प्रतिमा अतिशय उंचावली आहे. पाश्चात्य देशही आज भारतीय संस्कृतीचा अंगिकार करताना, अभिमान बाळगताना दिसत आहेत. यात भारतीय युवक म्हणून देशाच्या संस्कृतीची जपणूक आणि अभिमानास्पद मांडणी करण्याची जबाबदारी आपल्या खांद्यांवर आहे. एक आगळंवेगळं करिअर म्हणूनही याचा विचार करता येईल. भारतीय संस्कृती, स्थापत्य-शिल्प-नगरबांधणी, येथील पुरातन अवशेष याबद्दल रस वाटत असेल, तर पुरातत्त्वशास्त्रज्ञ होण्याचा एक मार्ग तुमच्यापुढे खुला आहे. त्याचसोबत संग्रहालयाच्या माध्यमातून येथील प्राचीन वस्तूंची राखण, प्रदर्शन, त्याची अतिरिक्त माहिती गोळा करून त्याचं दस्तावेजीकरण करणं, संग्रहालयाच्या माध्यमातून ते लोकांपर्यंत पोहोचवणं यासाठी 'म्युझियमोलॉजी' अर्थात संग्रहालयशास्त्र अभ्यासक्रम याचाही विचार करता येईल. या दोन्ही अभ्यासक्रमांची सविस्तर माहिती इंटरनेटवर उपलब्ध आहे. एकच लक्षात ठेवायला हवं, याचा केवळ करिअर किंवा अर्थार्जनाचं साधन म्हणून विचार न करता जबाबदारी म्हणून विचार करायला हवा.

 

डॉ. विष्णु श्रीधर उपाख्य हरिभाऊ वाकणकर यांनी आपल्या संशोधकीय वृत्तीने भोपाळजवळ भीमबेटका या सर्वात पुरातन अवशेषांचा शोध लावला, ज्याचा समावेश पुढे जागतिक वारसा स्थळांत करण्यात आला. सुमारे एक लाख वर्षांपूर्वीचे हे अवशेष असल्याचा तर्क सांगितला जातो. अलेक्झांडरच्या आधी भारताला इतिहासच नव्हता, किंबहुना भारत हे नावच अस्तित्वात नव्हतं या इंग्रजांच्या बेगडी नॅरेटिव्हला या संशोधनामुळे तीलांजली मिळाली. आपलं संपूर्ण जीवन हरिभाऊंनी भारताच्या प्राचीन संस्कृतीसाठी अर्पण केलं. विचार करा, असे अनेक हरिभाऊ भारतात उदयाला आले व अशी अनेक सत्य उघडकीस आली तर देशाचं नाव जगाच्या इतिहासात उच्चस्थानी जाईलच. त्याचवेळी या प्राचीन संचितांचं रक्षण करणारे हातही तयार होतील व त्यासाठी केवळ शासनावर अवलंबून राहावं लागणार नाही. बघा विचार करून पटतंय का ते!

-  मृदुला राजवाडे