‘शंका'सूर !

युवा विवेक    23-May-2022   
Total Views |


doubt

"ते बघ, तो पंखा असा गोल-गोल फिरतोय."

"मी आजपर्यंत तरी त्याला त्रिकोणात फिरताना पाहिले नाही, त्यामुळे गोलच फिरत असावा."

"अगं तसं नाही नीट बघ तो जिथे लटकलाय ना, तिथेच गोल गोल फिरतोय. आपल्या अंगावर पडला तर?"

बाहेर रणरणतं का काय म्हणतात ते ऊन तापत असताना, त्यामुळे घामाच्या धारा लागल्या असताना, छान दुपारी जेवण करून पंख्याखाली झोपल्यावर हा विचार कसा काय येऊ शकतो एखाद्याच्या मनात या विचारानेच माझी झोप उडाली. आपण स्वतः गादीवर ज्या वेळी 'पडलेलो' आहोत, त्या वेळी व्यवस्थित 'फिट' केलेला 'पंखा' पडला तर काय याच्याशी काय देणं घेणं आहे. गपगुमान झोपावे की नाही. पण नाही! यांना असे विचार करून स्वतःच्या व हा विचार बोलून दाखवून समोरच्याच्या देखील झोपेचं खोबरं करायचं असतं. असे 'बाल की खाल' काढणारे शंकासूर आपल्याला अनेक ठिकाणी भेटतात. सुदैवाने किंवा दुर्दैवाने मला जरा जास्तच!

 

आता परवाचीच गोष्ट घ्या. मी स्टेशनवर एका व्यक्तीला भेटायला गेले होते. वीस मिनिटे आधी पोहोचल्यामुळे मी आजूबाजूचे धावते विश्व न्याहाळू लागले. कोणी मोबाइलमध्ये माना घातल्या होत्या, तर कोणी सामानात! कोणी अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर मत ठोकत होतं, तर कोणी रेल्वेवाल्यांना शिव्या घालत होतं. कोणी सामान घेऊन पळत होतं तर कोणी जागेसाठी लढत होतं. अशातच माझ्या बाजूला एक जोडपं येऊन बसलं. पूल चढून आल्यामुळे चांगलीच धाप लागली होती त्या दोघांना. काहीवेळाने शांत झाल्यावर त्या काकूंनी (म्हणजे माझे वय ध्यानात घेता, त्या काकूच होत्या) काकांना विचारले, "आपण कुलूप नीट लावलं आहे ना हो. नाही म्हणजे मागच्या महिन्यात त्या ×××कडे चोरी झाली होती म्हणून म्हटलं. देव न करो, घरात कोणी नसताना.... कुलूप नीट ओढून बघितले ना तुम्ही?" ते काका जरा वैतागूनच बोलले, "चार वेळा! चार वेळा चेक केलं आहे. एक तर गाडी सुटायला नको म्हणून दोन तास आधीच स्टेशनवर यायला भाग पाडलंस. आता पुन्हा काय कुलूपाचं घेऊन बसलीस?"

 

दोन तास, बापरे ! कठीण आहे. आजच्या स्मार्टफोनच्या जगात जिथे प्रत्येक सेकंदाची माहिती मिळते तिथे दोन तास आधी येणे, हे ऐकून मला आश्चर्यच वाटलं. बरं हे संभाषण संपतं न संपतं तो त्यांच्याबरोबर असलेल्या लहान मुलाने प्रश्न विचारायला सुरुवात केली. म्हटलं चला निदान विषय तरी बदलला.

"बाबा हे काय?"

"याला रूळ म्हणतात. यावरून रेल्वे धावते. काल तू पाहिलीस ना काल टिव्हीवर, रेल्वे कशी धावते ती. सांग बरं" इति त्याचे पिताश्री.

एकदम ट्रॅक चेंच करून तो बोलला, "हो पाहिली. पलवा (परवा) पन पाहिली होती. बाबा, पलवा ती गाली पल्ली (पडली) होती तशी आपली पलेल का?" असं काही होणार नाही वगैरे सांगून पिताश्रींनी संवादाची इतिश्री केली.

हे ऐकून मला हसायलाच आलं. मनात म्हटलं 'हे जेनेटिक दिसतंय' मला हवी ती गाडी आली आणि काहीवेळाने मी घरी जायला निघाले. गाडीवर जाता जाता त्या काकांना रोज अशा किती वाक्बाणांचा सामना करावा लागत असेल या विचाराने त्यांच्याविषयी थोडी सहानुभूती देखील वाटली. पण असो. असतो एकेकाचा स्वभाव त्याला आपण तरी काय करणार म्हणा!

 

शंका येणं वाईट गोष्ट नाहीय. 'अबसेंट माईंडेडनेस'मुळे, अज्ञानामुळे मनात शंका निर्माण होतात. भाजीत मीठ टाकताना जर डोकं भलतीकडे असेल किंवा जे केलंय ते बरोबर आहे की नाही हे माहितीच नसेल तर डाऊट येणे सहाजिकच आहे. पण सगळं काही ठीक असताना, उगाच "असं झालं तर" अशी नको ती शंका काढून स्वतःचा आणि इतरांचा 'मूड' खराब करण्यात काय अर्थ आहे? सतत शंकाकुशंका काढत राहणे आणि नकारात्मक विचार करणे हे धोक्याचे लक्षण असू शकते. मोठ्यांचे बघून लहान मुलेही तसाच विचार करायला लागतात. त्या मुलाने अगदी निरागसपणे तो प्रश्न विचारला असला तरी सुरुवात अशीच होते ना. अशा कुशंका मनात का येतात? याचे नेमके कारण काय? याचे उत्तर एखादा मनोविकारतज्ज्ञ किंवा मानसशास्त्रज्ञच देऊ शकतो. तुमच्याही आजूबाजूला असे शंकासूर असतीलच, कदाचित तुम्हीसुद्धा असू शकता. तर आपल्या शंकांचे मूळ हे जिज्ञासा आहे की भीती यावर विचार करा. आणि जर उत्तर भीती असेल तर लवकरात लवकर त्या नकारात्मकतेचे मूळ शोधून ती भीती नाहीशी करा. छान सुखी राहा, आनंदी राहा.(आणि इतरांना देखील राहू द्या....)

- मृण्मयी गालफाडे.