सावधान राहा, सतर्क राहा

युवा विवेक    27-May-2022   
Total Views |


salvador

आपण एका अशा समाजात वाढलोय, वाढतोय जिथे खूप सुरक्षित वातावरणात मुलांचं पालनपोषण केलं जातं. चांगली शाळा, शिक्षक, शेजारी, वातावरण, चांगले संस्कार असं सगळं सुपोषण करणारं. एखादं पाखरू जसं चिमणी आपल्या पंखाखाली घेऊन सुरक्षित ठेवते, पंखात बळ मिळेपर्यंत त्याचं रक्षण करते आणि ते बळ आल्यानंतर अलगदपणे एका सुरक्षित जगात त्या पाखराला सोडून देते. अगदी असेच आपण कुमारवयापर्यंतचा आपला प्रवास करत असतो. जगात सर्वकाही चांगलं घडत आहे यावर आपला विश्वास असतो. तेच बळ वापरून आपण आपला पुढचा प्रवास करत असतो, आव्हान पेलत असतो, पुढे तेच वातावरण आपल्या पुढच्या पिढ्यांना देत असतो. अशाच सुरक्षित वातावरणात जगत असताना एके दिवशी आंतरराष्ट्रीय स्तरावरची ती भयानक बातमी आपण ऐकतो आणि अंतर्बाह्य हादरून जातो. सर्वत्र सुरळीत घटनांच्या पडद्यामागे, आपल्या नजरेआड काहीतरी भयंकर घडत असल्याची जाणीव आपल्याला भयकंपित करत जाते.

 

अमेरिकेतील टेक्सासमधील उवाल्दे इथे रॉब एलिमेंटरी स्कूलमध्ये साल्वाडोर रामोस या अठरा वर्षीय माथेफिरूने अंदाधुंद गोळीबार केला. बुधवार, २५ मे रोजी झालेल्या या भयंकर हल्ल्यात १८ लहानग्यांनी आणि तीन शिक्षकांनी आपले प्राण गमावलेत. हा हल्ला करण्यापूर्वी या हल्लेखोराने स्वतःच्या आजीलाही गोळी घालून मारले आहे. त्याच मनस्थितीत शाळेत येऊन त्याने बेछूट गोळीबार केला. त्यानंतर पोलिसांशी झालेल्या चकमकीत साल्वाडोरही मृत्युमुखी पडला. शाळेत झालेल्या अनिर्बंध गोळीबाराची ही सर्वात मोठी घटना आहे. ही घटना वाचली आणि मन विषण्णतेनं भरून गेलं. ज्या वयात गगनभरारीची स्वप्न पाहायची, पंखांचं बळ वाढवायचं, सकारात्मक कृती करायची, सकारात्मक वृत्ती बाळगायची त्या वयात मनात ठासून भरलेली नकारात्मकता, विध्वंसक वृत्ती, शस्त्रांस्त्रांचा अनिर्बंध वापर हे सारं त्या माणसाला, त्याच्या आजूबाजूच्या वातावरणाला किती ढवळून काढतं. या घटनेमध्ये समग्र समाजासह दोन वयोगटांचा विचार करणं आवश्यक आहे. १. साल्वाडोरचा वयोगट आणि २. ज्यांनी ही घटना पाहिली आहे असा सात ते १० वर्षे वयाच्या चिमुकल्यांचा गट.

 

गेल्या एक दोन दशकांत एकल पालकत्व, बिघडलेले संसार, अपरिमित व्यक्तिस्वातंत्र्य, बेदरकार वृत्ती, समजुतदारपणाचा अभाव, कुटुंबाकडून होणाऱ्या संस्कारांचा अभाव, व्यसनीपणा, सगळी सुखं वेळेआधी आणि गरजेहून अधिक अनुभवण्याची ओढ अशा अनेक कारणांचा परिणाम संपूर्ण जग भोगतंय. अमेरिकेसारख्या विभक्त कुटुंबपद्धती असणाऱ्या देशात याचा अतिरेक झाला आहे. इंडिव्हिज्युअलिझमचा अतिरेक झाला असल्याचं आपल्याला जाणवतं. सगळं काही स्वकेंद्रीत. गेल्या काही वर्षांतल्या बातम्या पाहिल्या तर मुलांच्या मानसिकतेत प्रचंड उलथापालथ होत असल्याचं आपल्याला जाणवतं. इंटरनेटवरील कंटेंटचा महापूर, थेट हाती येणारा पैसा, चंगळ करण्यासाठी उपलब्ध साधनसामग्री, वयाच्या आधी मिळणारं एक्सपोजर, सोशल मीडियाचा अतिरेक, एकल मूल असल्यामुळे होणारे लाड, मनातील आंदोलनं व्यक्त करण्यासाठी जवळचं माणूस उपलब्ध नसणं या सगळ्यामुळे तरुणाईचं(१५-२५) भावविश्व ढवळून निघालं आहे. भावनावेग नियंत्रित न होणं, शरिरातील ऊर्जेला योग्य दिशा न मिळणं, दिशाहीनाला योग्य मार्गावर आणण्यासाठी आदर्श मार्गदर्शक न मिळणं यामुळे साल्वाडोरसारख्या प्रवृत्ती बळावू लागल्या आहेत. अगदी इतकी पराकोटीची वृत्ती नसेल, पण कमी अधिक प्रमाणात असू शकेल. अमेरिकेत गन बाळगण्याचं प्रमाण अधिक असल्याने साल्वाडोरला ती उपलब्ध झाली असावी व अशाच बिघडलेल्या-अनियंत्रित मानसिकतेत त्याने हे कृत्य केलं असावं. अर्थात याची कारणमीमांसा आता फक्त उपलब्ध साक्षीपुराव्यांवर होऊ शकेल, कारण आरोपी आता मृत झाला आहे.

 

या घटनेतला दुसरा वयोगट हा अधिक भयानक परिणामांना सामोरं जाणारा आहे. शाळेतील मुलांना आपले वर्गमित्र हे कुटुंबासारखे असतात, त्यांचं संपूर्ण भावविश्व हे घराच्या आणि शाळेच्या चार भिंतीतच सामावलेलं असतं. सात ते दहा या वयोगटातील या चिमुकल्यांनी माथेफिरूला त्यांच्या मित्र-मैत्रिणींवर गोळ्या झाडल्या जाताना पाहिल्या असतील, स्वतःचा जीव वाचवण्यासाठी धावपळ करत एखादा अंधारा आडोसा शोधला असेल, डोळ्यांसमोर रक्ताचे पाट वाहताना पाहिले असतील. आपल्या एकेक मित्राचा-शिक्षकाचा मृत्यूने स्वतःच्याच अस्तित्वाचा लचका तोडला गेल्याचा भाव त्यांच्या मनी दाटला असेल, कदाचित रडून रडून त्यांचे अश्रूही सुकून गेले असतील, वाचलो म्हणून आनंद व्हावा की जे घडलंय त्याचा धक्का पेलावा असा प्रश्न जे वाचलेत त्यांना पडला असेल. ज्यांनी आपली मुलं-विद्यार्थी गमावलेत त्यांच्या दुःखावेगाला तर सीमाच नसेल, ज्यांची मुलं वाचली असतील त्यांना नेमक्या भावनाच सापडत नसतील व्यक्त होण्यासाठी. ज्यांनी पत्रकार म्हणून ही घटना कव्हर केली, त्यांनाही हे सांगताना अगतिकतेचा अनुभव येत होता, तितकाच अगतिक अनुभव होता वाचक म्हणून याचं सविस्तर वृत्त वाचण्याचा. युवकांच्या, तरुण पालकांच्या-शिक्षकांच्या वयोगटाचा विचार करता ही घटना सखोल परिणाम करणारी, तातडीने आणि दूरगामी उपायांची गरज असणारी आहे हे निश्चित. पण ज्या शेकडो चिमुकल्यांनी ही घटना आपल्या डोळ्यांनी पाहिली असेल, त्यांच्या दृष्टीने ही स्थिती अधिक भयप्रद आहे. ईश्वर अमेरिकेला या परिणामातून बाहेर पडण्याचं बळ देवो.

 

आपण भारतात राहातोय. जागतिकीकरणाचं वारं इथेही वाहात असलं तरी अजूनही बहुअंशी एकत्र आणि संस्कारक्षम कुटुंबव्यवस्थेची मुळं इथे टिकून आहेत. पण काळ मात्र बदलला आहे. फोर जी फोनप्रमाणेच फोर्थ जनरेशन वॉरफेअरचे वारे जगात वाहत आहेत. आज खोलीत एकटा एकटा राहणारा आपला मुलगा किंवा मुलगी मोबाईलवर, लॅपटॉपवर काय करत आहेत, याचा थांगपत्ता घरच्यांना लागण्याची शक्यता नसते. यात वयोगट थोडा अजून खाली, म्हणजे जवळपास १२ वर्षांपर्यंत सरकतो. कारण आज दहाव्या वर्षापासून मुलं स्मार्टफोन नीट वापरतात, त्याची फंक्शन त्यांना कळतात, लिहिलेलं नीट वाचता येतं. अशा वेळी तो/ती कशात गुंतलेला/ली आहे, त्याचं मित्रमंडळ काय आहे, त्याची वैचारिक बैठक कशी घडते आहे, मनमोकळेपणे तो आपल्याला सर्व सांगतो/ते आहे का, त्याच्या नेमक्या अडचणी काय आहे, मानसिकता कशी आहे याबाबत पालकांनी सावधान राहणं अत्यावश्यक झालं आहे. त्यांच्याशी वेळोवेळी संवाद साधणं, गरज पडल्यास योग्य शब्दात समज देणं, त्यांच्या भावविश्वाशी एकरूप होणं, त्यांना मनात कळत-नकळत विवेकनिष्ठ विचारांची पेरणी करणं, कुटुंबाशी-समाजाशी-देशाशी त्यांना भावनिकदृष्टीने जोडणं, त्यांची योग्य वैचारिक बैठक तयार करणं ही काळाची गरज आहे. सावधान राहणं, सतर्क राहणं आणि युवांना-बालांना या भस्मासूरापासून वाचवणं हेच आपल्या हातात आहे.

- मृदुला राजवाडे