बर्फी

युवा विवेक    05-May-2022   
Total Views |

बर्फी


barfi 

आला आला मतवाला बर्फी

पाँव पड़ा मोटा छाला बर्फी

रातों का है ये उजाला बर्फी

आज विचार करतांना बर्फीवर असलेले हे एक गाणे पटकन आठवले. रणबीर कपूरचा अतरंगी आणि प्रियंका चोप्राचा अप्रतिम अभिनय असलेला 'बर्फी' सिनेमा! पेढा डोळ्यासमोर आला की, एक सभ्य, सज्जन पांढरपेशी मिठाई समोर येते; पण बर्फी मात्र इंद्रधनुष्यातील जवळपास सर्व रंगांमध्ये रंगते, इतकेच नव्हे तर चवीलाही वेगळी! बर्फी हे नाव जरी पर्शियन शब्दापासून, तरी हीगोजिरवाणी मिठाई भारतातलीच आहे. दुधापासून मावा बनवण्याचे कसब भारतीयांकडे अगदी महाभारतीय काळापासून आहे असे म्हणू शकतो.

 

खवा, साखर, विलायची, केसर हे बर्फी तयार करण्याचे मुख्य पदार्थ; पण त्यात कधी कधी सुकामेवा, फळे आणि चॉकलेटही असू शकते. बेसनापासूनही बर्फी तयार करतात. आपण मराठी लोक त्याला वडीही म्हणतो. पंजाबची भरपूर सुकामेवा घातलेली डोडा बर्फी प्रसिद्ध आहे. पांढरीशुभ्र खोबऱ्याची कोकोनट बर्फी न आवडणारी व्यक्ती विरळाच. पिस्ता, काजू, बदाम, अंजीर असे सुकामेव्याचे प्रकार आहेत; पण त्या जोडीला गुलकंद बर्फी भाव खाऊन जाते. काजुकतली तर मिठायांमधली महाराणी आहे; ती आहे बर्फीच पण तिला वेगळी पदवी मिळाली आहे. वेगवेगळ्या फळांपासूनही हा पदार्थ तयार होत असला, तरी आंबा आणि नागपूरची संत्रा बर्फी सर्वांत पुढे आहेत. नागपूरच्या संत्रा बर्फीतही संत्र्याचा गर असलेली आणि खवा असलेली असे दोन प्रकार मिळतात. मिठाईच्या दुकानात गेल्यावर मिक्स मिठाईचे बॉक्स बनवले जातात त्यात या सगळ्या रंगीबेरंगी, चौकोनी आकाराच्या बर्फी शिस्तीत बसलेल्या असतात. दोन किंवा तीन वेगळ्या रंगांच्या आणि चवीच्याही बर्फी मिळतात, आंबा-गुलकंद, आंबा-कोकोनट वगैरे. बऱ्याच प्रकारात एक साधा थर आणि एक फ्लेवर्ड थर असतो.

 

बर्फी सहज कोणी घरी करत नाही, इन्स्टंट मिल्क पावडरपासून करायची रेसिपी सोडल्यास हा प्रकार वेळखाऊ आणि चवही तशी येत नाही. अशा वेळी मिठाई हलवायाकडून मागवली जाते. हल्दिरामने बरेच प्रकार मार्केटमध्ये आणले आहेत, इतरही ब्रॅण्ड्स आहेत. बर्फी काही दिवस टिकते पण ही लवकर संपवण्याची वस्तू. फ्रोझन बर्फी भारतात तरी तितकीशी परवडणार नाही; पण इतर देशात मात्र विकली जाते. बर्फी फ्लेवरचे आईस्क्रीम मी एकदा खाल्ले होते, तसे फ्युजन प्रकार अजून यायला हवेत. लहानपणी मिठाईच्या दुकानात गेल्यावर, काचेआडच्या ट्रेमध्ये छान कापून ठेवलेली मिठाई पाहायला मला फार आवडायचे. पेढे तसे लोळत पडलेले असायचे; पण बर्फी मात्र छान मेकअप करून शिस्तीत रांगेत बसलेली असायची. पावकिलो दर लिहिला असेल; तर किलोचा दर मनात कॅल्क्युलेट करायची मध्यमवर्गीय सवय अजून गेली नाहीये. कधी तरी आपणही काउंटरआड जावे, सगळ्या ट्रेमधून एक-एक बर्फी बॉक्समध्ये ठेवावी आणि मिक्स मिठाईचा बॉक्स तयार करावा असे उगाचच मनात यायचे. लहानपणी कोणाचं तरी बोट धरून, मिठाईच्या दुकान जायचे, तिथल्या लोकांनी आपला खाऊ बांधून देईपर्यंत मी त्या गोडमिट्ट, रंगीबेरंगी दुनियेला निरखण्यात रमून जायचे. मग पटकन कोणी तरी 'चला' म्हणून मला घेऊन जायचे. ती सगळी मिठाई खायची इच्छा नसायची; पण ती कलाकुसर आवडायची, तोपर्यंत केकशी इतकी ओळख झाली नव्हती. पूर्वी मुलगा झाला, तर पेढा आणि मुलगी झाली, तर बर्फी वाटायची प्रथा होती. माझ्या जन्माच्या वेळीही वाटली होती म्हणे. मी जगात आल्यानंतर मी ऐकलेली (मला काहीही समजत नसले तरी) पहिली मिठाई किंवा पक्वान्न म्हणा हवं तर, इतकी स्पेशल आहे ही बर्फी!

- सावनी