पिझ्झा

युवा विवेक    03-Jun-2022   
Total Views |


pizza

हा भारतीय पदार्थ नाही, समोस्यासारखा भारतीयच असावा इतका भारतात रुजलेलाही नाही, पण म्हणतात ना, you can hate it or love it but can’t ignore it. मिलेनियल्स आणि जेन झीसाठी हा अजिबात नवखा पदार्थ नाही; पण त्याआधीच्या पिढीने अजूनही पिझ्झ्याला मनापासून स्वीकारले नाही, आरोग्यासाठी चांगला नाही हे अजून एक कारण! एकदा एका बसस्टॉपवर एक आजी मला तावातावाने सांगत होत्या, आजच्या पिढीला नुसता पिझ्झा हवा, थालीपीठ नको. वयस्कर अनोळखी लोकांना मी एकदम घरगुती मुलगी वाटते आणि ते लोक माझ्याकडे माझ्याच पिढीच्या तक्रारी करतात, काय एकेकाची पेर्सनलिटी असते ना! तर या आजींना मी विचारल्यावर समजले की त्यांनी पिझ्झा खाल्ला तर नव्हताच पण जवळून पाहिलाही नव्हता, पण राग मात्र मनापासून होता. मी आपलं, "खरंय हो तुमचं." इतकंच बोलले. लोकांना पिझ्झाचा राग येतो कारण त्यात कॅलरीज ओसंडून वाहतात, पण तितकेच प्रेमही आहे, लव्ह-हेट रिलेशनशिपसारखंच काहीसं!

 

पिझ्झ्याचा जन्म इटलीचा आहे हे एखादे लहान बाळही सांगेल, पण त्याला जगभर प्रेमाने स्वीकारले गेले. एकट्या अमेरिकेत दर सेकंदाला ३० पिझ्झा स्लाईसेस खाल्ल्या जातात असं सर्वेक्षण आहे. १०० मध्ये नेपल्स, इटलीमध्ये विल्लम्स नावाच्या इतिहासकाराने पाहिले की, बरेच लोक पिठाच्या गोळ्यावर त्या काळी विषारी समजल्या जाणाऱ्या टोॅटोचे काप आणि चीझ टाकून स्वस्त जेवण करतात. त्यानंतर राणी मार्गारिटाच्या नावाने मार्गारिटा पिझ्झा तयार केला गेला, जो आजही प्रसिद्ध आहे. अमेरिकेत मात्र दुसऱ्या महायुद्धानंतर या पदार्थाने लोकांच्या मनात स्थान मिळवले, इतकं की, १९९ नंतर चीझच्या मागणीत ४% वाढ झाली, केवळ या एका पदार्थामुळे. या पदार्थासाठी भारतीयांच्या मनात दोनच नावे येतात, एक डॉमिनोज आणि पिझ्झा हट! डॉमिनोजच्या अनेक सुरस कहाण्या इंटरनेटवर वाचायला मिळतील, जसं की, २०१३ मध्ये पिझ्झ्याचा सुवास असणारी Dvd त्यांनी लॉन्च केली होती. गोल पिझ्झा कापला जातो, त्रिकोणी आकारात आणि पॅक केला जातो चौकोनी बॉक्समध्ये, हे बऱ्याच लोकांनी वाचले असेल, पण सुरुवातीला पिझ्याचा आकार चौकोनी/आयतकारच होता.

 

जाडसर पोळी लाटायची, सॉस पसरायची, भाज्यांचे तुकडे आणि चीझ टाकून सगळं एकत्र बेक करायचं. त्यात बेस, सॉस, चीझ विकत मिळते. आहे काय मेलं त्यात? आळशी लोकांचा पदार्थ आहे हा. कौतुकं नुसती! एक पिझ्झा केला की झालं. असं एकदा एक काकू म्हणाल्या होत्या आणि खरंच त्यांचं म्हणणं पटलं. किती कमी मेहनत आहे, नाहीतर आपण भारतीय लोक भाज्या एक-एक पराठ्यांमध्ये भरतो, मग लाटतो आणि तव्यावर भाजतो. भट्टीजवळ उभं राहून तासन्तास पिझ्झा करणाऱ्याबद्दल बोलत नाहीये मी, त्यांच्याबद्दल करुणा आहेच, जशी तंदूर रोटी करणाऱ्याबद्दल आहे! बहुदा नॉनव्हेज पिझ्झा लोक पसंत करतात, अपवाद भारतासारख्या देशांचा. भारतात डॉमिनोजला तंदुरी पनीर, आचारी दो प्याजा असे टाईप्स, इतकेच नव्हे तर आता पराठा पिझ्झाही लॉन्च करावा लागला. त्या देशानुसार, लोकांच्या पसंतीनुसार टॉपिंग्स आणि सॉस बदलतात, अशी फ्लेक्सिबल डिश आहे. माझ्या या पदार्थाच्या फार आठवणी नाहीत, पण मित्र-मैत्रिणींनी बऱ्याच आठवणी सांगितल्या आहेत. क्रिकेट मॅच पाहताना, कंटाळा आला म्हणून, मध्यरात्री गप्पांची मैफल रंगल्यावर, पार्टीसाठी, डेटवर जायचे असेल तर, अशा केव्हाही शहरी लोकांना पिझ्झा आठवतो, विशेषतः मेट्रो सिटीजमधील तरुणाईला. आता गल्लोगल्ली सगळे फास्टफूड मिळते, पण काही वर्षांपूर्वी ही फक्त शहरी लोकांची चैन होती. समाजात राहताना काही गोष्टी मनाविरुद्ध कराव्या लागतात. त्यातील एक म्हणजे माझी पिझ्झ्याशी ओळख. आजही मला फार प्रेम वाटत नाही, स्पायसी, इंडियन टेस्ट आणि थीन क्रस्ट (पिठाचे चारपाच प्रकार असतात आणि लोक त्याबद्दल फार सिलेक्टिव्ह असतात) असेल तर ठीक आहे. कदाचित काही वर्षांनी मला हा पदार्थ आवडेलही.

 

भारत आणि इंडिया असं वर्गीकरण करायचं झालं, तर एका गटाला बिर्याणीचे आकर्षण तर दुसऱ्याला पिझ्झ्याचे! अगदी दोन तट नाहीयेत हं, कारण फूड लोकांना जवळ आणते, पण एक उदाहरण दिलं. आता या आधीच हार्वर्ड युनिव्हर्सिटीतून शिकून, एमआयटीमधून पीएचडी मिळवलेल्या लोकांना आपण काय आशीर्वाद देणार? त्यांचा आदर्श भारतीय लोकांनी घेऊन, जगभर अजून आपले पदार्थ पोहोचावे असे मार्केटिंग आणि दर्जा सांभाळावा हीच देवाकडे स्वार्थी प्रार्थना आहे!

- सावनी