प्लास्टिक नको, विवेक हवा

युवा विवेक    01-Jul-2022   
Total Views |


 
plastic ban

नवा अपडेटेड व्हर्जनचा फोन, ऍलेक्सा, टॅब, नवनवी गॅजेट्स हे सगळं आपल्याला हवंसं असतंच. कधी आवड म्हणून तर गरज म्हणून तर कधी परिवर्तन म्हणून आपण ते स्वीकारतोच. काळाप्रमाणे होत जाणारे बदल, लागणारे शोध, त्याचा दैनंदिन जीवनातील उपयोग माणूस स्वीकारत जातो, असं आपल्याला दिसून येतं. कधी आनंदाने तर कधी कालाय तस्मै नमः म्हणत परिस्थितीला शरण जात ते स्वीकारावं लागतं. काही वेळा एखाद्या घटकाचा सुरुवातीला जरी चमत्कार म्हणून भरभरून प्रतिसाद मिळाला तरी, कालाच्या अवकाशात हळूहळू त्याचे दुष्परिणामही आपल्या समोर येत जातात. प्रदुषणालाही आपल्याला तोंड द्यावं लागतं. प्लास्टिक वेस्ट आणि ई कचरा नामक राक्षस आपलं अक्राळविक्राळ रूप दाखवता झाला आणि सगळ्यांचं धाबं दणाणलं. एकिकडे राज्यात रोमहर्षक राजकीय उलथापालथी सुरू असताना हे प्रदुषणाचं काय मध्येच असा प्रश्न वाचता वाचता तुम्हाला पडला असेलच ना? आजपासून म्हणजे १ जुलै २०२२पासून केंद्र सरकारच्या वतीने एकदा वापरता येणाऱ्या(सिंगल युज) प्लास्टिकवर बंदी घालण्यात आली आहे, आहे ना लक्षात?

 

काळ बदलला तसे लोखंड, तांबे पितळ असे पारंपरिक धातू मागे पडून आपण हिंडालियम अर्थात ऍल्युमिनिअम स्वीकारलं. अगदी असाच बदल आपण प्लास्टिकच्या बाबतातही स्वीकारल्या आणि मग सगळीकडेच प्लास्टिक दिसू लागलं. सकाळच्या टूथब्रश-पेस्टची ट्यूब, दुधाची पिशवी इथपासून वेगवेगळे हवाबंद डबे, न गळणाऱ्या बाटल्या, आपली वेगवेगळी गॅजेट्स, पर्सेस, साठवणीचे डबे, जेवणाची भांडी, मायक्रोवेव्ह फ्रेंडली भांडी, खेळणी, शालेय साहित्य, दैनंदिन वापराच्या वस्तू आणि सगळ्यात महत्त्वाच्या म्हणजे कॅरिबॅग. आपण दैनंदिन वापराच्या दीर्घकाल वापरता येणाऱ्या वस्तू एकवेळ समजू शकतो, पण सगळ्यात त्रासदायक प्रकार असतो तो सिंगल युज प्लास्टिकचा. विचार करा, एकदा भाजी आणायला गेलो की लगेच एक पिशवी घेऊन आपण घरी येतो. असे हजारो लोक एका ठिकाणी भाजी आणायला जात असतील. विचार करा, एका ठिकाणी शेकडो हजारो तर याचा हजारात गुणाकार झाला तर किती संख्येने प्लास्टिक पिशव्यांचा वापर केला जात असेल. अशा पिशव्यांचे ढीग आज जैवविविधता धोक्यात आणत आहे. एप्रिल २०२२मध्ये प्रकाशित झालेल्या एका वृत्तानुसार, भारतात ३५ लाख टन प्लास्टिक कचरा दर वर्षी तयार होतो. त्याचप्रमाणे दर पाच वर्षांनी दरडोई प्लास्टिक वापर जवळपास दुप्पट होतो. या प्लास्टिक कचऱ्याने भारतातील जैवविविधता, शेतीचा कस, पाण्याचे स्रोत या साऱ्यावर परिणाम करण्यास या पूर्वीच सुरुवात केली आहे. तुम्ही एखादी नदी किंवा तलाव पाहिलात, त्यात तरंगणारं प्लास्टिक पाहिलंत तर याची भीषणता लक्षात येईल. जलस्रोत, शेतीची जमीन, पिकलेले अन्नधान्य, हवा यात प्लास्टिकचे पार्टिकल सापडू लागले आहेत. ते आपल्या डोळ्यांना दिसत नसले तरी त्यांना हवा तो परिणाम ते मानवी जीवनावर व आरोग्यावर करत आहेत. सिंगल युज प्लास्टिक हा प्लास्टिक प्रदुषणातील मोठा दोषी आहे. यावर बंदी आली तर बरेच सकारात्मक बदल होऊ शकतात. यापूर्वी २०१८मध्ये व तत्पूर्वी एकदा सिंगल युज प्लास्टिकवर महाराष्ट्रात कठोर बंदी आली होती. पण पुन्हा चोरपावलांनी याचा शिरकाव झालाच.

 

गेल्या काही वर्षांत ऍल्युमिनिअम, नॉनस्टिक भांडी याबाबत थोडीफार जागरुकता निर्माण झाली असली. तर प्लास्टिकबाबत मात्र तेवढं गांभीर्य दिसून येत नाही. दैनंदिन वापराचं सिंगल युज प्लास्टिक आपण कसं टाळू शकतो, याचा सर्व लहानथोरांनी विचार केला पाहिजे. नीट विचार केल्यास कमीतकमी प्लास्टिक वापरून आपण कामं करू शकतो, असं आपल्या लक्षात येतं. आपल्याच ऑफिसच्या भरपूर कप्पे असलेल्या पर्सला एक कापडी पिशवी नक्कीच जड नाही. पाण्याची बाटली सोबत नेली, तर विकतचं पाणी घ्यायला नको. जेवणासाठी स्टिलचा डबा वापरता येतो. कितीही उत्तम दर्जाचे, लीकप्रूफ डबे विकत घेतले तरी ते वाईटच असं आहारतज्ज्ञही सांगतात. प्लास्टिकचे पार्टिकल्स आपल्या जेवणात उतरत असतात. त्यामुळे प्लास्टिकच्या डब्यांना नाहीच म्हणू या आणि स्टील किंवा काचेचे डबे वापरू या. तुम्हाला आठवत असेल तर जाड खाकी कागदाच्या पिशवीत आपल्याकडे पूर्वी वाणसामान येत होतं, साड्या आणि आयते ड्रेसही पूर्वी बॉक्समधून किंवा जाड कागदाच्या/प्लास्टिकच्या पिशवीतून येत होते. या पिशव्या आपण पुढे किती दिवस वापरायचो. इस्त्रीच्या कपड्यांसाठी प्लास्टिकची लाँड्री बॅग वापरण्यापेक्षा एक जुनी ओढणी ठेवली तरी पुरते. २०१८च्या बंदीनंतर हॉटेलचे पदार्थही कागदी खोक्यातून/पिशवीतून येतात. मांसमासे यांच्यासाठी वेगळ्या पिशव्या किंवा स्टिलचे डबे ठेवता येतात. सुटं दूध पिशवीऐवजी पातेल्यात घेता येतं. ज्यांच्याकडे पिशवीबंद दूध येतं ते पिशव्या कचऱ्यात टाकण्याऐवजी धुवून, साठवून रद्दीवाल्याकडे देऊ शकतात. चहा, ज्यूस, सरबतांसाठी कागदी पेले वापरता येतात. झाडं प्लास्टिकऐवजी मातीच्या कुंडीत लावता येतात. पाण्यासाठी घरात स्टिल किंवा तत्सम धातूच्या बादल्या वापरता येतात. हे असेच बदल आपण सार्वजनिक जीवनात घडवून आणू शकतो. कार्यालयांमध्ये कागदी फाईल्स वापरणं, डाटा स्टोअर करण्यासाठी ईकॉपीला प्राधान्य देणं. कोण पिशवी देत असेल तर त्याला थेट नाही, नकोय मला असं सांगणं. बाटलीबंद पाण्याऐवजी चांगल्या दर्जाची स्वतःची बाटली नेणं. आता तर स्टिल, काच, तांबे अशा वेगवेगळ्या बाटल्या मिळतातच. भेटवस्तू देताना ती पर्यावरणपूरक असेल असं पाहणं. अशा अनेक बदलांतून सिंगल यूज प्लास्टिकचा वापर आपण नक्कीच टाळू शकतो.

 

ज्यादिवशी माणसाने प्लास्टिकचा वापर सुरू केला, त्याच दिवशी धनुष्यातून बाण सुटला होता. त्याला आवेग घालता आला नाही आणि मग प्लास्टिक प्रदुषणाचा भस्मासूर मानवी जीवन ग्रासू लागला. प्लास्टिक बंदीची सक्ती सरकारला करावी लागणं हे खरं तर दुर्दैव आहे. प्लास्टिकमुक्तीसाठी मानवी विवेक जागृत होणं अधिक आवश्यक आहे. युवांनी हे अभियान हाती घेतलं तर त्याचा अधिक दूरगामी परिणाम होईल. त्यासाठी आधी केले, मग सांगितलेही वृत्ती अंगी बाणवणं गरजेचं आहे. काळाची गरज ओळखा, नाहीतर हा भस्मासूर एक दिवस आपला ग्रास घेतल्याशिवाय राहणार नाही. पटतंय का? बघा विचार करा आणि प्लास्टिकमुक्तीसाठी तुमचे उपाय तुम्हीच शोधून काढा. त्याची यादी तयार करा आणि तिचं पालनही करा. मग, कधी घेताय कागद पेन्सिल हातात?

- मृदुला राजवाडे