मॅनेजमेण्ट गुरू असणारी पंढरपूरची वारी

युवा विवेक    10-Jul-2022   
Total Views |


pandharpur wari

मॅनेजमेण्ट, व्यवस्थापन, प्लानिंग, समन्वय असे शब्द ऐकले की भल्याभल्यांना घाम फुटतो. अनेकदा कॉर्पोरेट जगात, सेवाभावी संस्थांच्या कार्यालयांमध्ये मोटिव्हेशनल स्पीच आयोजित केली जातात, ज्यात टीम बिल्डींग, मॅनेजमेण्ट, समन्वय, स्मार्टवर्क यांवर भर दिला जातो. त्यासाठी कार्यपद्धतीचे वेगवेगळे फॉर्म्युले शिकवले जातात. पण म्हणतात ना, काखेत कळसा नी गावाला वळसा. व्यवस्थापन आणि समन्वयाचं एक जिवंत, चैतन्यमय उदाहरण आपल्याच महाराष्ट्रात दर वर्षी दिसून येतं. पंढरपूरची आषाढी एकादशीची वारी हे व्यवस्थापनाचं आदर्श उदाहरण असल्याचं अभ्यासकांनीही मान्य केलं आहे.

 

पंढरपूरचा श्रीविठ्ठल हे संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत आणि आषाढी एकादशीची वारी हे येथील आगळंवेगळं वैशिष्ट्य. संतमंडळींच्या पालख्या घेऊन, विठ्ठलनामाचा जयघोष करीत एका वेगळ्याच ऊर्जेच्या बळावर आबालवृद्ध वारकरी तब्बल एकवीस दिवस पायी चालत जाऊन आपल्या आराध्य देवतेचं दर्शन घेतात. शतकानुशतकांची परंपरा असणारी वारी म्हणजे व्यवस्थापनाचं एक उत्तम उदाहरण आहे. देहू येथून संतश्रेष्ठ तुकाराम महाराज आणि आळंदी येथून ज्ञानसूर्य संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी निघाली की वारी सुरू होते. चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या जवळपास २०० संतांच्या दिंड्या-पालख्या पंढरपुरात येतात. वारकरी पांडुरंगाचं दर्शन घेतात. ते नाही झालं तर केवळ कळसाचं दर्शन घेऊन वारकरी मागे परततात. पण वारीला मात्र आवर्जून येतात. आषाढीच्या या वारीबद्दल प्रत्येक वारकऱ्याच्या मनात प्रचंड आदर आणि ओढ असते. संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे म्हणतात, "वारीतून या संप्रदायाची सामाजिकता आणि समाजाभिमुखता स्पष्ट होते. वारीची परंपरा सर्व संतांनी जतन केली आहे."

 

तब्बल ४५० किलोमीटरचा प्रवास वारकरी दिंड्या पताका नाचवित पायी करतात. हल्ली शहरातील अनेक लोक, तरुणाईही कुतुहलापोटी वारीला जाते. विठ्ठलनामाचा गजर करत हे लोक उत्साहाने सहभागी होतात, वारकऱ्यांची सेवाही करतात. वारीचं मॅनेजमेण्ट हे तिच्या आयोजनातूनच सुरू होतं. काही शे किलोमीटरचं अंतर कोणताही गडबड, गोंधळ न करता लाखो वारकरी शिस्तबद्ध पद्धतीने पार करतात. वारीतील शांतता, शिस्त आणि उत्साह हा वाखाणण्याजोगा असतो. पण कोणत्या गुणवैशिष्ट्यांमुळे ही वारी सुरळीत पार पडते ते पाहू या.

स्वयंशिस्त : वारकरी हे दिंडीचा, मूहाचा एक भाग होऊन पुढे पुढे सरकतात व त्यांचे गंतव्य अर्थात डेस्टिनेशन त्यांना नेमके माहीत असते, ते म्हणजे पंढरपूर. प्रत्येक वारकरी आपल्यावर वारी सुरळीत सुरू राहण्याची जबाबदारी आहे, अशा भावनेने कार्यरत असतो. त्यामुळे कोणीही ऑर्डर देण्याची वाट न पाहता वारकरी शिस्तबद्धपणे जबाबदारीपूर्वक वर्तन करत पुढे जात राहतात. जबाबदारीमुळे माणसाला साहजिकच स्वयंशिस्त येते आणि त्याचा परिणाम संपूर्ण वारीच्या शिस्तीवर दिसून येतो. या स्वयंशिस्तीमुळे ते वेगवेगळे न राहाता एकरूप होऊन चालत राहतात व पंढरपूरला पोहोचतात. वारीचा पारंपरिक मार्ग वर्षानुवर्ष तसाच आहे. विशिष्ट ठिकाणी त्यांचे थांबे असतात. त्या त्या ठिकाणी वारकरी तंबू टाकून वस्ती करतात. त्या त्या गावातील गावकऱ्यांतर्फे वारकऱ्यांच्या खानपानाची व्यवस्था केली जाते. वर्षानुवर्ष ही शिस्त पाळली जात आहे.

 

प्रेरणा : आपल्याला श्री विठ्ठलाच्या चरणांचं दर्शन घ्यायचं आहे, या प्रेरणेमुळे लाखो वारकरी दर वर्षी एकत्र येतात. पदभ्रमण करत पंढरपूरला पोहोचतात आणि विठ्ठलाच्या दर्शनाने तृप्त होतात. एखाद्या कार्यामागे प्रेरणाशक्ती असेल तर ते करायला माणसाला निश्चितच उत्साह येतो. सातत्याने कार्यरत राहण्याची ऊर्जा मिळते. बरं, ही प्रेरणा कोणा एका वारकऱ्याची नाही तर वारीला चाललेल्या संपूर्ण समूहाची असते. निश्चितच याचा एकत्रित परिणाम वारीच्या उत्साहात, अभंग-भजनात, टाळ मृदुंगाच्या गजरात, वारकऱ्यांच्या पारंपरिक खेळावर दिसून येतो. वारीत जात-पातीचे भेदाभेद नाहीत, लहान-मोठं, स्त्री पुरुष असे कोणतेच भेद राहत नाहीत. असतो तो उत्साह, विठ्ठलदर्शनाची आस, गळा तुळशीमाळ आणि हातामध्ये टाळ. या सगळ्याच्या मागे असते, ती विठ्ठलदर्शनाच्या ओढीची उच्च सात्त्विक प्रेरणा.

 

टीमवर्क : कोणत्याही ऑफिसमध्ये महत्त्वाचं असतं ते टीमवर्क. वारीत टीमवर्कचा उत्तम अनुभव घेता येतो. कधी एकेकटे तर कधी जोडीने आलेले वारकरी येतात आणि समूहाचे होऊन जातात. शेकडो किलोमीटरचा प्रवास एकत्र करताना एकमेकांची दुःख वाटून घेतली जातात, मदत केली जाते, प्रवासात सोबत केली जाते, एकमेकांच्या आहाराकडे-तब्येतीकडे लक्ष ठेवलं जातं, एकमेकांच्या मदतीने प्रवासात स्वयंपाक, आवराआवर अशी कामं केली जातात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वय,लिंग,जात भेद विसरून एकत्र खेळ खेळले जातात. आपण टेलिव्हिजनवर अनेकदा या खेळांचं प्रात्यक्षिक पाहिलं आहे. व्यक्तिगत विचार न करता टीम किंवा समूह म्हणून या काळात सर्व वारकरी वावरतात, सहअस्तित्वाचा अनुभव घेतात. एवढ्या दिवसांचा एकत्र प्रवास म्हणजे विश्वासही हवा. वारकऱ्यांचा एकमेकांवर विश्वासही असतो आणि एकमेकांबद्दल आदरही. अगदी अपवादात्मक घटना सोडल्या तर पंढरपूरची वारी ही अतिशय निर्धोकपणे व चोरीमारी झाल्याशिवाय पार पडते ती या विश्वासामुळेच.

 

एकतेतील विविधता : गेल्या काही वर्षात आयटी प्रोफेशनल्स, कॉर्पोरेट अधिकारी, कलाकार, शिक्षक, इंजिनिअर्स असे शहरी वर्गांचं प्रतिनिधित्व करणारे लोकही वारकऱ्यांचा वेश परिधान करून, कपाळी टिळा-गळा माळ अशा रूपात वारकऱ्यांतीलच एक होऊन जातात. अनेक ठिकाणी वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिलेल्या असतात, सुरक्षिततेसाठी पोलीस वर्ग ही तैनात असतो. हे सगळेच विठूमाऊलीचे नाव घेत वारीचा भाग कधी होऊन जातात हे त्यांनाही कळत नाही. समाजाच्या वेगवेगळ्या स्तरातील, व्यामिश्र आर्थिक गटातील, वेगवेगळ्या कार्यक्षेत्रातील लाखो लोक वारीत सहज एकरूप होतात. यामागे एकमेव अशी विठ्ठलदर्शनाची आस असते.

 

टीम मॅनेजमेण्ट किंवा समूह व्यवस्थापन किंवा कार्यालयीन समन्वयन यापेक्षा काय वेगळं असतं मित्रांनो. वारकऱ्यांना जशी विठ्ठलभक्तीची आस तसंच आपलं ध्येयही निश्चित हवं. स्वयंशिस्त हवी. वेगवेगळी व्यक्तिमत्त्व असूनही वारकऱ्यांची एकमेकांना सामावून आणि समजावून घेण्याची, भेदाभेद दूर सारण्याची वृत्ती हवी. पंढरपूरची वारी हे व्यवस्थापनाचं विद्यापीठ आहे. अशिक्षित, अल्पशिक्षित असे वारकरी त्यांच्याही नकळत व्यवस्थापनाचा एक वेगळाच वस्तुपाठ घालून देतात. आपण त्यातून काय शिकतो हे जास्त महत्त्वाचं आहे. विठ्ठल विठ्ठ, जय हरी विठ्ठल.

- मृदुला राजवाडे