हांडवो

युवा विवेक    28-Jul-2022   
Total Views |


handavo

थ्री इडियट्समध्ये एका सीनमध्ये करीना म्हणते, "तुम गुजराती लोग इतने क्युट होते हो पर तुम्हारा खाना इतना खतरनाक क्यू होता है? ठेपला, ढोकला, हांडवा। लगता है कोई मिसाईल्स है। आज बुशने इराकपे दो ढोकले गिरा दिये, चारसो लोग मारे गये दोसौ लोग घायल।" करीना दारूच्या नशेत हे बोलते पण खरंच आहे ना. हांडवो/हांडवा नावच किती भयानक वाटते. गुगलवर सर्च केल्यास या पदार्थाचे वर्णन "savory vegetable cake originated from Gujarat" असे येते. भाज्यांचा नमकीन केक, ऐकायला वेगळे वाटते आणि हसूही येते. तरीही हा पदार्थ एकदातरी नक्की खावा इतका छान आहे.

 

तांदूळ आणि वेगवेगळ्या डाळी धुवून, पाण्यात भिजवून वाटल्या जातात. त्यात दही मिसळून सगळे मिश्रण फर्मेंट केले जाते. गाजर, भोपळा, मटार, कोबी अशा आवडीनुसार भाज्या अगदी बारीक चिरून किंवा किसून मिक्स केल्या जातात. पॅनकेकसारखे हांडव्याचे मिश्रण तव्यावर किंवा याचे स्पेशल कुकर मिळते त्यात वाफवले जाते. जिरं, मोहरी, तीळ, कढीपत्ता, मिरच्या आणि हिंग यांची छान फोडणी दिली जाते. हांडवो तुकड्यांच्या रूपात सर्व्ह केला जातो किंवा लहानश्या गोल पॅनकेच्या रूपात. तव्यावर हांडवो परततांना सगळे कसब पणास लागते कारण तो छान फ्लफी झालेला असतो, तुकडे पडू न देता बाजू बदलण्याचे एक तंत्र आहे. युट्युबवर सर्च केल्यास कळेल. याची कृती मला इडलीसारखीच वाटते. तांदूळ आणि डाळीचे फरमेंटेड मिश्रण वाफवायचे पण चव अतिशय वेगळी. यात चवीनुसार मसालेही असतात शिवाय डाळीचे प्रकार आणि प्रमाण आवडीनुसार बदलते.

 

इतर गुजराती पदार्थांप्रमाणे हा पदार्थ चविष्ट तर आहेच पण पौष्टिकही आहे. तांदूळातुन कार्ब्ज, डाळीतून प्रोटीन मिळते. दह्यातून प्रोबायोटिक आणि मिश्रण फरमेंटेड असतेच त्यामुळे पचायला सोपे. हे कमी म्हणून त्यात भरपूर भाज्या असतात! वन मिल डिश याहून पौष्टिक काय असणार? त्यात थोडे पनीर टाकले तर प्रोटीन अजून मिळेल कारण डाळीमध्ये तसे कमी प्रोटीन असते. लहान मुलांसाठी अतिशय छान नाश्ता होऊ शकतो. तेलाचा वापर मर्यादित केल्यास डायटमध्येही हि डिश सहज सामावून जाऊ शकते. ढोकळा सर्वांनी खाल्ला आहे, खाकरा आजकाल सगळीकडे मिळतो, उंधियोचं नाव माहित असतं किंवा तत्सम भाजी बऱ्याच राज्यांमध्ये बनते पण हांडवो मात्र यात कुठे नसतो. या पदार्थाला खरोखर अजून हवी तितकी प्रसिद्धी मिळाली नाहीये, पौष्टिक पदार्थांच्या नशिबी स्ट्रगलच असतो! घरोघरी ढोकळा बनतो पण हांडवा नाही, बुरा लगता है तो इसी बात का!

 

आता मार्केटमध्ये गिट्स, मिष्टी सत्यम या आणि अजून बऱ्याच ब्रँडचे इन्स्टंट पीठ मिळते, ते पीठ घरी आणून त्यात भाज्या टाकून हांडवो बनवायला काहीच हरकत नसावी. हांडवो लोणचे, चटणीसोबत खातात. मी टोमॅटो केचअप सोबत खाल्ला आणि आवडला. मोठ्या गोलाकार हांडवोचे पिझ्झासारखे त्रिकोणी स्लाईसेस केले तर सॉस/केचअप सोबत नक्की खाऊ शकतो. या पदार्थाचे फ्युजन फूड मिळते कि नाही याची कल्पना नाही पण स्कोप आहे हे मी सांगू शकते. भाज्यांचे प्रकार, प्रमाण कमी/जास्त करता येईल. पनीर/टोफू/चिकन घालून प्रोटीन वाढवता येईल. चीझचा परिसस्पर्श झाल्यास नवीन पिढी याकडे आकर्षित होईल. इतके असले तरी पारंपरिक पाककृती कमी ठरणार नाहीच, हे सगळे मार्केटिंगसाठी! इतकं वाचल्यावर फ्लफी तरीही कुरकुरीत असा हांडवो खाण्याची तुमची इच्छा झाली नाही तरच नवल. अतिशय पौष्टिक आणि वेगळा पदार्थ तुमच्या आवडीच्या पदार्थांच्या लिस्टमध्ये दाखल होईल याची मी गॅरंटी घेत नाही पण आशा करते!

- सावनी