छोटे सरकार..! भाग २

युवा विवेक    03-Aug-2022   
Total Views |


chhote sarkar

दुपारच्या वेळी लक्ष्मी आयच्या देवळात एक झोपेची डुलकी घेतली अन् सलम्या, हनम्या अन् मी बकऱ्या घेऊन रानातून वाट हुस्कीत-हुस्कीत रानातल्या खडकाळ रस्त्यांच्या पांदीने चालत असतो.

ओ छोटे सरकार..!

आजच्याला नदी थडीला मासे पकडू, काय म्हणतोस्सा!

नदीला धरणाचं वाहतं पाणी आलं हायसा, मग धरणातला डोग मासा, गप्पी मासा वाहून आला असा नाय का पाण्यात छोटे सरकार?

सलम्या बोलत होता...

तितक्यात हनम्या म्हंटला, छोटे सरकार कालच्याला म्या नदीच्या काठाला खेकड्याची बिळं पायली हायसा त्यात खेकुड हाय. मग म्या पहाटच्याला खिशात मायची नजर चुकून चुलीवर ठेवलेली आगपेटी घेऊन आलो हायसा.

छोटे सरकार हनम्या अन् सलम्याचे बोलणे ऐकत नदीवरल्या खड्कावर बसून बकऱ्यांना शीळ फुंकीत सावरत होता.

म्या नसता येत बाबा पाण्यात, म्या बकऱ्या सांभाळतो तू अन् सलम्या नदी थडीला जाऊन मासे अन् बिळातून खेकडे नि आस! म्या जाळ लावतू तुवर अन् बकऱ्या पण सांभाळीत अस्तूया.

सलम्या, हंनम्या मान हलीतच नदीच्या थडीला गेली अन् उथळ पाण्यात शेवळ्यात माशा शोधू लागले, मासे पळून नको जायला म्हणून नदीतली गुळगुळीत दगडं त्यांनी नदीतल्या खडकात चहूकडून रचून लावली अन् चड्डीला कर्दोड्यात काडीने आवळत सावरू लागली...

सलम्या ओरडू लागला, गावली दोन मासोळी.

हनम्याने ती पट दिशी उचलून नदी तिरावर फेकली. दोघेही पुन्हा मासे शोधू लागली, अजून बरीचशी मासे शोधून हनम्या त्याचा मोर्चा घेऊन खेकड्याच्या बिळात काडी घालून खेकुड हुंडकू लागला... काही छोटी छोटी मासे अन् काही खेकडे नदीच्या किनाऱ्यावर सलम्या अन् हनम्या घेऊन आले दुरूनच ते छोटे सरकारला आनंदात ओरडू लागले होते.

ऊ.. छोटे सरकार माशे आणले हायसा!

खेकुड बी आणले हायसा!

बहुत सगळा!

छोटे सरकार,आज आपली मज्जा आस्ता!

छोटे सरकार लाकडाला जाळ लावत बसला होता हनम्या अन् सलम्याने ती माशी दगडाने ठेचून, धुवून आगीवर भाजायला ठेवली खेकड्यांची नांगी तोडून ती पण भाजायला ठेऊन दिले.

जाळाच्या चहूकडे उखड बसून, तिघेही ते भाजण्याची वाट बघत होते, बकऱ्या चरत होत्या!

छोटे सरकार भूक लागली हायसा हनम्या बोलता झाला, तितक्यात सलम्या बोलला दम की लका भाजू दे की मासं, खेकडं ऐकून सर्वांच्या तोंडाला पाणी सुटले होते.

मासे भाजली, त्यांची डोळं निघून वर आली हुती. हनम्याने ती वाटून दिली मग ते ती खात बसली, सगळेच एकमेकांकडे बघून हसू लागले. खेकुडची वरची टरफले काढून ती बी फस्त केली, बकऱ्या घेऊन तिघेही पुढं निघाली.

मोडकळीस आलेल्या जुन्या महादेव मंदिराचा कळस दुरून दिसत हुता. बेलाची झाडं आसपास दिसाया लागली होती, नदी किनारी हिरवी बेसरमाची झाडी निळसर, आकाशी फुलाने बहरलेली होती.

तितक्यात छोटे सरकारला गावातला रखमाजी दिसला, दारूच्या नशेत चालेला रखमाजी मोठ्याने अमिताभ बच्चनच्या जमान्यातले गाणे म्हणत चालला होता. त्याला अमिताभ खूप आवडायचा म्हणत्यात गावातले लोकं, अजूनही त्यो तसाच भांग पाडतो अन् त्याची एक एक डायलॉग बोलतो.

सलम्याने रखमाजीला आवाज दिला.

ये मामु कहा घुमरेला रे..!

कित्ता पियेला, मर जायगाना साले!

त्यावर रखमाजी पिलेल्या अवस्थेत काहीतरी बरतळत होता सोबत अमिताभचे दोन-तीन डायलॉग मारून भाषण देऊ लागला.

छोटे सरकार पढाई करो.

ये बकऱ्या एक दिन गुजर जाएगी,

तेरा काय जिंदगी बहोत लंबी है तेरी..!

तेरा बाप बहुत जी लगाता था ते कुं..

गुजर गया बेचारा कमिना दोस्त था मेरा..!

दील का बडा आदमी था साला, पर चला गया...!

साले तू तो अच्छा निकल,क्या बकऱ्या संभालरा है, पढाई कर....

अन् गाणे म्हणत रखमाजी निघून गेला. सलम्या, हनम्या हसत बकऱ्या चरू लागले होते

मी मात्र रखमाजीच्या बोलण्यावर विचार करू लागलो होतो...

बकर्या-शिक्षण-बकऱ्या..

रखमाजीचा बोलण्याच्या विचारात मोडकळीस आलेलं महादेवाचं देऊळ केव्हा जवळ आले समजलेच नाही. देऊळाच्या आवारात असलेल्या कवटीच्या झाडाखाली आम्ही पाठ लांब करून दिली. बकऱ्या रवंथ करत बसल्या होत्या.

देऊळामध्ये तेथील म्हातारे साधूबाबा जे देऊळाप्रमाणे म्हातारे झाले होते, ते झाडझुड करत होते. श्रावण असल्याने सर्वत्र देवळात बेलाची पानं, जास्वंदीची फुले भक्तांनी महादेवाला वाहिलेली होती. अगरबत्तीचा सुगंध चहूकडे पसरलेला होता बाजूलाच असलेल्या शनी देवाच्या देवळातून तेलकट वाहिलेल्या तेलाची एक छोटीशी नळी देवळाच्याबाहेर आलेली होती अन् तिच्यातून थेंब-थेंब शनिदेवाला वाहिलेले तेल गळत होते.

सभोवताली परिसरात चहुकडे माकडे, खारुताई, बकऱ्या खेळत, चरत होती. आम्ही दुपारच्या जेवणाला बसलो, साधूबाबा आमच्याजवळ येऊन काठी टेकवत बसले अन् त्यांनी उपासासाठी केलेला शाबुदाना हनम्याला बाबांच्या झोपडीतून आणायला लावला. बाबांनी आमच्या बरोबर फराळ केला. खूब साऱ्या देऊळाच्या जुन्या गोष्टी निघाल्या खूप वेळ आम्हीही त्या ऐकत बसलो होतो.

तितक्यात सलम्या बोलता झाला.

छोटे सरकार.

चलो चार बज गये,अभी बकऱ्या को चारा भी लेना है रात केलीये.

सलम्याचे बोलणे ऐकत, आम्ही जेवणाचे डब्बा म्हणून असलेले उपरणे गळ्यात घातले. बाबाला म्हंटले येतुय्या बाबा उद्याच्याला, बाबांनी मान हलवली अन् आम्ही बकऱ्या घेऊन निघालो आम्ही पुढे दूरवर आलो बाबा आमच्याकडेच बघत बसले होते.

पुढे डोहाच्या शेजारी असलेल्या झाडाचा किती मोठा पाला तिघांनी तोडला, सोबतीच डोईवर घेतला. आम्ही घरच्या मार्गाला लागलो होतो, आता ढळता सूर्य दिसू लागला होता तशी घरच्या ओढीने तिघेही झपाझप पावले टाकत बकर्याला हुस्कीत होतो...

हनम्या म्हणत होता, छोटं सरकार आज बहुत मज्जा केला हायना आपून.

मर्यादित मान हालवत गपगुमान चालत होतो, उदयाच्याला पहाटं-पहाटं बकऱ्या घेऊन आले की मोहाच्या झाडांवरल महुळ हुळूय्या अन् मध खात बसुयात सरकार चालत यक्का.

म्या उगाच मान हलविली अन् हुम... म्हणत चालू लागलो होतो,माझ्या डोस्क्यात अजूनही रखमाजीचे बोलणे घोळत होते, सांज होत आली होती गावाच्या देऊळातून सांजच्या वेळी होणाऱ्या हरिपाठचा आवाज कानी पडत होता.

गावातली धनी घरची पोरं आमच्याकडे डोईवर असलेला पाला पाहून आम्हाला हसत होती, आम्ही लाजेने मान खाली घालून तरातरा चालत होतो. बायका लोकांच्या वावरातून काम करून घरला जात होती. शामा दुधाची केटली घेऊन डेरीत दूध द्यायला चालला होता. आम्ही गावाच्या वेशीत घुसलो, बकऱ्या सावरत हनम्या मला म्हंटला

छोटे सरकार...

चलत्तुय्या उद्या पहाटं लवकर बकऱ्या घेऊन येईसा..

सलम्यासुद्धा त्याच्या बकऱ्या घेऊन घराकडे निघाला होता.

म्या माझ्या बकऱ्या घेऊन घरला आलो, त्यांना दावणीला बांधून पाला टाकून दिला, डाल्यात डावलुन असलेली पिलं मायचं दूध प्यायला सोडून दिली.

मी मायना चुलीवर ठेवलेलं डेगीमधलं गरम पाणी घेऊन हातपाय धुवत परसदारच्या अंगाला बसलो होतो. तितक्यात मायनं चहा ठेवला होता म्या पळत पळत सखा आबाच्या टपरीमध्ये गेलो दोन बटर आणली चहासोबत गिल्लासात टाकुन बटर गिळत बसलो. अंधार पडला होता घरात आज पुन्हा एकदा चिमणी मिणमिणत होती. मायचा चुलीवर भाकरी करण्याचा आवाज कानी पडतोय, खाटेवर बसून मी आकाशात बघत बसलो होतो,चांदण्या अन् स्वच्छ काळसर आकाश व चंद्रदर्शन घडत होते अन् सोबतीला पुन्हा एकदा कानी पडत होते रखमाजीचे तेच-तेच बोल पुन्हा पुन्हा...

रखमजीने माझा दिवस आज पूर्ण विचारात घातला होता, आता रात्र पण विचारात सरणार होती की काय असे झाले होते... तेव्हा सलम्या अन् हनम्या सोबत होता आता माय अन् मिणमिणती चिमणी होती, काळाकुट्ट अंधार होता बस्स...

तितक्यात मायचा आवाज आला

छोटे सरकार..!

भाकर खायाची नाय का? चल की लक्का...

मी चहाचा गिलास घेऊन माय जवळ येऊन बसलो, माय भाकर थापित होती...

मी चुलीतल्या लालभडक जाळाकडे एकटक बघत होतो, मिणमिणारी चिमणी घासलेट कमी असल्यामुळे विझु बघत होती.

लेखक:भारत लक्ष्मण सोनवणे.

औरंगाबाद.

संपर्क:९३०७९१८३९३.