बॉलीवूड कात टाकणार का?

युवा विवेक    12-Sep-2022
Total Views |

Bollywood kaat takanaar ka? 
 
 
बॉलीवूड कात टाकणार का?
 
 
भारतासारख्या सिनेप्रेमी लोकांच्या देशात "बॉलीवूड वाचवा" लिहिण्याची वेळ येईल असं कधीही वाटलं नव्हतं, पण दुदैवानं ती वेळ आली आहे.
 
 
लालसिंग चड्डा, पृथ्वीराज, धाकड, रक्षाबंधन वैगेरे बरेच चित्रपट तिकीट खिडकीवर सलग आपटले आहेत. एकीकडे हे चित्रपट फ्लॉप होत असताना पुष्पा, RRR, KGF सारखे दाक्षिणात्य डब सिनेमे मात्र भरपूर कमाई करीत आहेत. एकंदरच सोशल मीडियावरचा चालू ट्रेण्ड पाहता, हे प्रकरण सहजासहजी संपेल असे वाटत नाही. असं होण्यामागे बरीच राजकीय किंवा धार्मिक कारणे आहेत आणि त्यात बऱ्यापैकी तथ्यदेखील आहे. पण माझं मत थोडं वेगळं आहे. हिंदी सिनेसृष्टीला अशीच मरगळ ८० च्या दशकाच्या उत्तरार्धात आली होती. राजकीय हस्तक्षेपांमुळे २ महिने पूर्ण इंडस्ट्री संपावर गेली होती. बॉलिवूड खरच मरणासन्न झाले होते. राजेश खन्ना - अमिताभ - धर्मेंद्र अशा अनेकांची कारकीर्द उतरणीला लागली होती. कुमार गौरव, कुणाल कपूर, राजीव कपूर सारखे अनेक स्टारसन यश मिळवण्यासाठी चाचपडत होते. गिरणी कामगारांच्या संपानंतर आणि अंडरवर्ल्डच्या उदयाने मुंबईचे जनजीवन विस्कळित झाले होते. आशियाई खेळानंतर कलर टिव्ही तसेच हमलोग, बुनियाद, रामायण, महाभारत आदींच्या लोकप्रियतेमुळे लोक टिव्ही या मनोरंजनाच्या नव्या माध्यमाकडे वळू लागले होते. व्हिडिओ पायरसीचा फटका बसत होता. मिथुन सारखे आघाडीचे अभिनेते अंडरवर्ल्डच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे मुंबईबाहेर स्थायिक झाले होते. अशा वातावरणात कमल हसन, रजनीकांत सारख्या दाक्षिणात्य अभिनेत्यांनी उत्तरेत आपले पाय रोवण्याचा प्रयत्न केला होता, तर जितेंद्रने साउथचे सिनेमे पद्मालयच्या बॅनरखाली हिंदीत रिमेक करण्याचा यशस्वी प्रयत्न केला होता.
 
 
हा घटनाक्रम पाहताना इतिहासाची पुनरावृत्ती झाल्यासारखं वाटत आहे. आजही आघाडीची खान मंडळी वयोमानानुसार मुख्य भूमिकेतून निवृत्तीकडे झुकली आहेत. प्रभास, एन टी आर, रामचरन उत्तरेत पाय रोवत आहेत. टिव्हीचे नसले तरी आता OTT चे आव्हान आहे. कोरोनामुळे आर्थिक घडी विस्कटली आहे.
 
 
साउथचे रिमेक वाढत आहेत. प्रत्येक व्यवसायात काही काळाने एक saturation point येतो तो हिंदी सिनेमात आला आहे. आजही जे आघाडीचे अभिनेते म्हणवले जातात, त्यातले जवळपास सगळेच ९० मध्ये पदार्पण केलेले आहेत. अर्जुन कपूर, इम्रान खान सारखे घराणेशाहितून पुढे आलेले स्टार्स यश मिळवण्यासाठी अद्याप धडपडत आहेत. तर दुसरीकडे राजकुमार राव, प्रतिक गांधी, जितेंद्र कुमार वैगेरे मंडळी OTT आणि इतर माध्यमांतून फॅनबेस मिळवत आहेत.
 
 
गेल्या २० वर्षात किती नविन संगीतकार / गायक प्रस्थापित झाले हा पण संशोधनाचा मुद्दा आहे. रिऍलिटी शोच्या प्रत्येक सीझनला नविन स्टार बघायची सवय झालेल्या लोकांना आता "लंबी रेसक्या घोड्यांवर' पैसे लावण्यात पण स्वारस्य राहिलेले नाही. दुसरीकडे दोन दशकांपूर्वी मोबाईल/इंटरनेट सर्वदूर पसरू लागल्यानंतर दाक्षिणात्य सिनेमाला उत्तरेत चांगल मार्केट खुणावू लागलं होतं. आर्या, बोमरील्लू, हॅपी डेज ' सारखे चित्रपट सीमाप्रांतात चांगले चालले होते. आपल्याकडच्या गॅदरिंग अथवा लग्नसोहळ्यात 'आपडी पोडं पोडं ' किंवा "आ आंटे" सारखी गाणी कळत नसली तरी लोकप्रिय होत होती. छोट्या पडद्यावर पण हळूहळू डब केलेले दक्षिणात्य सिनेमे वाढत असल्याचे दिसत होते. ह्याच काळात बॉलीवूडला मात्र आंतरराष्ट्रीय मार्केटचे वेध लागले होते. 'लगान'च्या ऑस्करवारी नंतर किंवा "स्लमडॉग मिलेनियर' सारख्या सिनेमामुळे बॉलीवूडने ग्लोबल होण्याचा ध्यास घेतला. आखाती राष्ट्रात आपल्याला चांगलं मार्केट मिळत आहे, हे पाहून शाहरुखने चक दे इंडिया, रईस, माय नेम इज खान सारखे मुस्लिम नायकप्रधान चित्रपट करत तिथे मुसंडी मारत हॉलिवूडलाच पर्याय तयार करण्याची तयारी चालवली होती. दुसरीकडे सलमानचा 'बजरंगी भाईजान' किंवा आमिरचा ' दंगल ' पण सीमेपलीकडे चांगले व्यवसाय करत होते. अक्षयकुमारचा ' चांदणी चौक टू चायना ' तर खुद्द Warner Brothers ने पुढाकार घेत निर्माण केला होता..
 
 
आयफाच्या पुरस्कार सोहळ्यात हे जागतिकीकरण ठळक दिसत होतं, पण इथेच कुठेतरी गफलत होत होती. एका आयफा सोहळ्यात मामुटीचा उल्लेख दाक्षिणात्य अभिनेता असा केल्याने त्याने नाराजी दर्शवत "भारताबाहेर आपली ओळख भारतीय हीच असली पाहिजे" असे ठणकावून सांगितले. हिंदी सिनेमा म्हणजेच भारतीय सिनेमा ह्या समिकरणाला बदलण्याची वेळ आली होती.
 
 
जागतिकीकरणाची स्वप्न पाहणारी हिंदी फिल्म इंडस्ट्री आपल्याच मुळापासून दूर जाऊ लागल्याचं जाणवू लागलं होतं. देशातल्या धार्मिक ध्रुवीकरणाच्या काळात मुख्य अभिनेत्यांनी उधळलेली मुक्ताफळं, अभिनेत्यांचे झालेलं राजकीयीकरण, नेपोटिझम, सुशांत सिंग राजपूत प्रकरण, ड्रग्स प्रकरण .. इत्यादी अनेक कारणांमुळे प्रेक्षक हळूहळू बॉलिवूडपासून दूर जाऊ लागले. 'पिके किंवा ओ माय गॉड 'सारखे सिनेमे चांगले असूनही प्रेक्षकांना त्यात धार्मिक सुधारणेपेक्षा धार्मिक भावनेची खिल्ली उडवने जास्त बोचले.
 
 
खानत्रयी आता मुख्य भूमिकेतून निवृत्त होण्याच्या मार्गावर हे जाणवत होत. सैफ अली , बॉबी देओल तर वेबसिरीजकडे वळले देखील ! शाहरुखचे झिरो, फॅन, हॅरी मेट सेजल फारसे चालले नाहीत. ह्याचा फायदा दाक्षिणात्य सिनेमाने घेतला. बाहुबली मधील माहिष्मतीच संस्कृत राष्ट्रगीत किंवा RRR मधील रामचरणमध्ये होणारा रामाचा भास, अशा छोट्या मोठ्या प्रसंगातून दक्षिणात्य सिनेमे जास्त जवळचे भासू लागले.
 
 
आज नाही म्हणायला एंटरटेनमेंट इंडस्ट्रीची उलाढाल कोट्यवधींच्या घरात होत असते. चित्रपटातील अभिनेतेच नाही, तर स्पॉटबॉय पासून कॅमेरामन त्याचे असिस्टंट, मेकअपमन, रेकॉर्डिंग स्टुडिओ, शुटिंग लोकेशन, आजूबाजूचे हॉटेल्स, थिएटर्स अशी फार मोठी अर्थव्यवस्था एकात एक गुंतलेली असते. इतक्या मोठ्या इंडस्ट्रीचा डोलारा कोसळणे कोणत्याही दृष्टीने योग्य नाही. इतर राज्यातील मुख्यमंत्री बॉलिवूडला स्थलांतरित करण्यासाठी पायघड्या पसरवून बसले आहेत. असाच प्रकार ९० च्या दशकाच्या सुरुवातीला झाला होता आणि हैदराबादमध्ये शिफ्ट होण्याची मानसिकता झाली होती. परत त्याची पुनरावृत्ती होऊ नये हे रसिकांच्या जेवढ्या हातात आहे तेवढंच लालसिंग चढ्ढाच्या फ्लॉप होण्यापासून बोध घेणाऱ्या बॉलिवूडची पण आहे.
हा एकंदर सगळा कालखंड बॉलिवूडकरांना जास्त विचार करायला लावणारा आहे. त्याहून अधिक म्हणजे उत्तरेतील प्रादेशिक सिनेमांना जास्त भेडसावणारा आहे. कारण एकाच वेळी इंग्रजी, हिंदी पाठोपाठ हा तिसरा दाक्षिणात्य सिनेमाचा पर्याय तयार होणे धोक्याची घंटा आहे.
 
 
मराठी, गुजराती, पंजाबी, भोजपुरी सिनेमाने यांच्याप्रमाणे भव्यदिव्य व्हायचं, मसालापट बनवायचे की, आशयघन चित्रपट करत उत्पन्नाची आशा सोडायची हे येणारा काळच ठरवेल.
सध्या तरी बॉलीवूडला गंगा - जमुना तहजिबच्या चौकटीपल्याड विचार करत गंगा - कावेरी, गंगा - तुंगभद्रा संस्कृतीचे स्वागत करावे लागेल असेच दिसत आहे.
 
- सौरभ रत्नपारखी