ऑल अबाउट नथ!

युवा विवेक    13-Sep-2022
Total Views |
 
all about nath!
 
 
ऑल अबाउट नथ!!
' नखरेल पोरी तुझी नथ गं कशी'
नथ नुसता दागिना आहे का?
छे छे तो दागिनाच नाही
ती निशाणी आहे !
तिच्यातल्या अपार सोशीकतेची... 
नव्हे त्याही पेक्षा तिच्या कर्तृत्वाची
नथ बाईच्या करारी पणाची
नथ तिच्यातल्या असीमित धैर्याची
नथ आभाळ उंचीच्या मानाची
नथ अधिकाराची
नथ बावनकशी गुणांची
नथ तिच्यातल्या कर्तृत्वाची
नथ पाणीदार आणि करारी अस्तित्वाची..!
नथ तिच्यातल्या हुकमी तोऱ्याची
नथ मुरक्याची
नथ बाईच्या ठसक्याची
नथ बाईच्या अस्खलित बाईपणाची
जान असते ती तिच्या सौंदर्याची.... !
 
स्वातीत जन्मलेला एकेक मोती तोलायला आणि नथीचा नखरा करायलाही बाईच व्हावं लागतं!
कारण घेतला दागिना, घातला, मिरवला इतकं सोप्प नसतं ते.
 
 
तिचा प्रवास खूप वेगवेगळ्या भावभावनांच्या सोपस्कारातून गेलेला असतो. मन आणि शरीर दोहोंचा हळवा प्रवास असतो तो.
नाक किती नाजूक असतं; साधा हात लागला तरी शिंका याव्यात, अशा नाकाला कोवळ्या वयात छिद्र पाडून घेणं इतकं साधं सरळ नसतंच मुळी! नाक टोचून आठवडाभर तरी नाकपुडी सुजलेलीच. त्यात नुसतेच छिद्र पाडले की झाले असेही नाही, तर तांबे किंवा सोन्या चांदीची तार घालून ती बंद केली जाते. त्यामुळे तो ठणका वेगळाच. मग रात्री झोपण्यापासून उठेपर्यंत किती जपावे त्या हळव्या नाकाला आणि दुष्ट तारेला, प्राण कंठाशी येतात काही अडकले की मग झालेच, ती ओढ, ती ठसठस, ती चिडचिड, ते खोबरेल तेल गरम करून कापसाच्या बोळ्याने नाक शेकणं, जरा बरं वाटतंय असं वाटतानाच खेळता खेळता एखाद्या सखीचा फटकारा लागणं, त्यानंतर रडताना आपलाच धसमुसळा हात पुन्हा लागणं, मग पुन्हा कळवळणं, रडू संपल्यावर डोळे पुसायला आलेल्या ताईची ओढणी हटकून त्यात अडकण आई गं! काही काही विचारू नये. सात आठ दिवस परिसीमा नसते त्या वेदनेला. त्या इवल्या नाकचं बाळंतपण करता करता आई, बाबा, आजी, आजोबा, ताई, दादा अगदी सगळ्या घरादाराच्या नाके नऊ आलेलं असतं. भविष्यात घडणाऱ्या प्रसंगांची ती रंगीत तालीम असावी कदाचित. त्या वेदना ज्याने सोसल्यात तिला माहीत असते नथीची किंमत, तिचा तोरा आणि ठसकाही. बाईपणाच्या परिपूर्णतेत या वेदना खूप मोठी भूमिका वठवत असतात. तिचं व्यक्तिमत्व तिचा कणखरपणा अगदी कसल्याही प्रसंगाला खमकेपणान सामोरं जाण्याचे बाळकडू या वेदनेतूनच नकळतपणे तिला मिळालेले असते.
 
 
'नथीशिवाय बाईचा शृंगार पूर्ण होत नाही' म्हणजे काय हो....!
तर नथ म्हणजे ' बाणा'आणि तिचा गुण म्हणजे 'करारीपणा' असे मला तरी वाटते.
प्रत्येक दागिन्यांचा स्वतःचा आपला असा वेगळा डौल असतो.
प्रत्येक दागिन्यांला स्वतःचा एक सुंदर गुण आणि अर्थ असतो.
त्यामुळे 'नथ 'हे भूषण आहे माझ्यासाठी तरी आणि कदाचित प्रत्येक बाणेदार बाईसाठीही. जसं पुरुषाचं तसंच स्त्रीचंही हजारो चांगल्या वाईट प्रसंगाने भरलेलं आयुष्य असतं. इथे कोणताही फेमिनिझम नाहीये, पण ढोबळमानाने पाहिले तर स्त्री आणि पुरुषाच्या शरीराची जडणघडणही निसर्गानेच भिन्न केली आहे. त्यात निसर्गाने काय विचार करून हे केलं असेल ते असोच, पण शरीराने अंगकाठीने स्त्रीला पुरुषांपेक्षा नाजूक केलेलं असूनही काटक केलंय हे विशेष. बाई हळवी असते खरंय, पण जी जितकी हळवी असते ,ती तितकीच काटक किंवा काय म्हणूया त्याला अं...असंही म्हणू शकतो आपण की, तिच्यावर आलाच प्रसंग तर दहा हत्तीचं बळ ती तिच्या फक्त इच्छाशक्तीवर एकवटू शकते. ह्या फक्त बोलायच्या किंवा फक्त लिहायच्या गोष्टी नाहीत. आपल्या डोळ्यासमोर अश्या एक ना हजार स्त्रियांची उदाहरणे असतील. ती आणि तिच्यातली अपार ऊर्जा. यांचं प्रतीक मला नथ वाटते. नथ ही प्रतिनिधित्व करते स्त्रीत्वाचं किंवा त्याच्यातल्या कणखर तरीही नाजूक देखणपणाचं, तिच्यातल्या मांगल्याचं, तिच्यातल्या मोत्यांइतक्याच निर्मळ पावित्र्याचं, नथ महाराष्ट्रीयन स्त्रियांचा जीव की प्राण.
आधीच नाक माननीय, त्यात नथ अजून सन्माननीय!
 
 
ज्याच्या लेण्याशिवाय महाराष्ट्रीयन सौंदर्याला पूर्णत्व येत नाही.. आजी पणजीच्या काळच्या नौवार ते.. आई..आत्याच्या पिढीतल्या रेडिमेड पेशवाई नौवर ते.. आजच्या माझ्या तुमच्या पिढीतल्या खण साडी ते खण कुर्ता ते ...खण गाऊन ते..अगदी खण जॅकेट, स्कर्ट ,वनपीस घालून मॉडर्न सोहळ्या पर्यंतच्या पोरींचा शृंगार नथीशिवाय अक्षरशः पानी कम चाय....! अशी काहीशी असते नथ.. अशी ही नथ जीवस्य असते स्त्रीसाठी...
अमिता पेठे पैठणकर