छोटे सरकार

युवा विवेक    14-Sep-2022
Total Views |

chhote sarkar
 
 
छोटे सरकार..! भाग - ५
बकऱ्या धरणपाळच्या दिशेनं हुस्कीत-हुस्कीत आम्ही खालच्या दिशेनं दोघेही बकऱ्याना घेऊन आलो. धरणपाळेवरून धरणातील पाण्याला बघत,धरणात सांजप्रहरी दिसणारे सूर्याचे प्रतिबिंब बघत आम्ही तिघेही बाभळीच्या रानाकडे चालते झालो होतो...
दूरवर शेतकरी त्यांच्या वावरात काम करतांना आता दिसू लागली होती. शेतात एकमेकांना दिलेली लांबची विशिष्ट आरोळी आमच्यापर्यंत येत होती. ती आम्हाला नसली तरी आम्ही प्रतीउत्तर देत शेतकऱ्यांना गोंधळून टाकत होतो. अधून मधून सोबत असलेल्या बांबूच्या काडीने उंच-उंच झाडावरचे डगळे, पाला पिलांसाठी तोडून त्याचे गट्टर करून डोक्यावर घेऊन चालू लागलो होतो.
 
धरणपाळेपासून आता आम्ही खूप दूरवर परतीच्या वाटेवर निघालो होतो. खोकल्या आईचे देऊळही आता दिसेनासे झाले होते. सलम्याच्या अन् हनम्याच्या उद्या पहाटे-पहाटे महुळ हुळायच्या गोष्टी कल्पनेत रंगल्या होत्या. मी पण त्यांना हो ला हावजी करत झाडावर चढवत होतो.
 
रस्त्याने चालतांना बकऱ्यांना हुस्कत-हुस्कत शीळ फुंकीत चालताना रस्त्याने चालणारी सारी लोकं आमच्याकडे बघत असायची. आमचा दररोजचा हा धंदा लोकांच्या नजरेला ओळखीचा होता, म्हणून सारे आम्हाला बोलायचे. कुणाची बकरी राखनीला ठेवायची असेल तर तेही सांगायचे. कुणाला घरात कुणाचं काही दुखत असले की, बकरीचे दूध आणून दे लका छोटे सरकार.. म्हणूनही गावातली लोकं हक्काने सांगत असायची.
 
कामाशी काम असलेली आमची तिघांची जोडी गावातल्या कष्ट करणाऱ्या मायबाप लोकांना खूप आवडत. गावभरच्या पोरांना आम्ही तिघे कसे बकऱ्यावळून आई वडीलांच्या हलाखीच्या परिस्थितीला सांभाळत आहोत,असे गावातले लोकं त्यांच्या मुलांना उदाहरने देत असायचे.
हे कौतुक आम्हालाही छान वाटायचे.
 
माझ्या बाबतीत हे सर्व मला गौण होतं. मला याचे कुठलेही सोयरसुतक नव्हतं की, मला काही वाटायचे नाही. कारण मी फक्त माझे काम करत होतो. भविष्यात असलेला आयुष्यातील अंधार मला रोज गडद होतांना दिसत असायचा, पण नियतीने जे समोर मांडले होते त्याला सोडून जाण्या इतपत अजुन तरी मी मोठा नव्हतो.
मग रोजचा येणारा दिवस, रोजचा जाणारा दिवस मला सारखा असायचा. वयापरत्वे येणारं शहाणपण फक्त वयाच्या खूप लवकर मला आलं होतं इतकेच.
 
गावच्या वेशीजवळ येता येता सूर्य अस्ताला गेलेला असायचा. तांबड्या सूर्यप्रकाशात बकऱ्यांच्या खुरांनी रस्त्यालगतची माती, धुरड उडतांना गुलालप्रमाणे भासत असायची. चहूकडे दिसणारी धूळ आणि बकऱ्यांच्या घोळक्यात येणारा इसाडा वास आला की, लोकं दुरूनच रस्ता बदलत असायची अन् आम्ही हसत रहायचो.
 
सलम्याचे घर आले अन् सलम्याने आवाज देत छोटे सरकार उद्याले पहाट असा हाताने इश्यारा केला अन् तो चालता झाला. हनम्या त्याचा रेडू सावरत मला म्हंटला सांच्याला जेवण झालं का पारावर बसाया भेटूया, मी ही मान हलवत बकऱ्या घेऊन पुढे निघालो.
गावातली लोकं आमच्या पाच-सहा बकऱ्या पाहून मोकळी वाट करून देत असायची.
 
घराजवळ येऊस्तुवर अंधार पडला होता. माय केव्हाच आली होती. परसदारच्या चुल्हीवर पाणी तापत तापत ईस्नाला आलं होतं. मी पटकन बकऱ्या दावणीला बांधल्या, पिलं प्यायला सोडली अन् हातपाय धुवायला पाणी घेऊन दगडावर येऊन बसलो.
 
मायने घरात चुलीवर कोरा चहा करायला ठेवला, त्याचा सुगंध अंगणापर्यंत दरवळत होता. कधी एकदा कोऱ्या चहावर ताव मारतो असे झाले होते. हातपाय धुवून झाले अन् मी ती टावेलने डोकं पुसत आरश्यात बघू लागलो होतो.
मायना पुढ्यात चहा आणून ठेवला होता. चहाचा कप घेऊन मी चौकटीवर पित बसलो होतो. सांच्याला दरवाज्यात बसू नये असे लोकं म्हणतात, पण मला याची फिकीर नव्हती मी निवांत होतो.
 
सांच्यावेळेला मी घराच्या उंबऱ्यावर कोऱ्या चहाचा गिल्लास घेऊन चहा पित बसलो होतो. सांज केव्हाच ढळून गेली होती. शेतातून येणारी बाया-बापडे दुधाच्या क्याना हातात घेऊन येत होते.
कोणी एखादी वगार,गाय असेल तर तीपण घरला घेऊन येत होते.
 
घरोघरी चुली पेटल्या होत्या. दूरवरून काळ्या मसाल्याचा तव्यावर भाजण्याचा सुवास येत होता. बरेच दिवस झाले असे निवांत बसलो नव्हतो. खूप वेळ बसत ये-जा करणारी लोकं, आबाच्या टपरीवर रिकाम्या चापलुस्या करणारी लोकं, कट्टयावर बसलेली गावातली नवखी तरुण पोरांची पिढी, अंगणात खेळत बसलेली माझी सर्व सवंगडी बघत होतो.
 
जसजसा काळोख पडू लागला होता तसतसा वाराही वाढू लागला होता. अंगात थरकं भरून येऊ लागले होते, काहीवेळाने नकळत साऱ्या अंगावरून काटा येऊन गेला. एकदमच हुडहुडी भरून आल्यासारखे झाले. आता मी स्वत:ला सावरतच कसे तरी आत येऊन बसलो.
माय चुलीवर भाकरी ठोकत बसली होती. काहीवेळ अंगावर रग घेऊन झोपल्यावर मायना जेवणासाठी आवाज दिला.
मी उठलो सारच अंग आता जड पडले होते. आपलं दुःख कोणाला सांगावं असं कोणी नव्हतं. आईला सांगावं तर आईच्या चेहऱ्यावर चिंतेच्या आड्या बघितल्या जात नाही.
ताडकन उठलो अंथरूण सावरत चुल्हीजवळ येऊन बसलो. चुल्हीवर दूध तापून-तापून पिवळसर झालं होतं. मायना तांब्याच्या परातीत एक भाकर पुढ्यात केली, आईला मला बघून अंदाज आलाच असावा पण खायच्या वख्ताला मी उगाच नाटकं करेल खाणार नाही म्हणून आई काहीही बोलली नाही.
 
मायला कळू नये म्हणून मीही एक भाकर मोडून चुरून घेतली. दूध ओतून साखर घेऊन काला मोडून खाऊ लागलो होतो. सोबत चवीला म्हणून मायना तव्यावर हिरव्या मिरचीचं बेसन केलं होत ते ही खात होतो. पण तापीने तोंड आल्यामुळे तिखट लागत होतं.  कसेतरी पोटाला आड्या देत मी एक भाकर खाल्ली अन् गपगुमान अंथरुणावर येऊन पांघरूण घेऊन झोपून राहीलो.
 
मायने भांडे घासून सारा राडा आवरून माझ्या डोक्याला हात लावला. ताप वाढला होता. मायने छातीला, डोक्याला झेंडू बाम लाऊन दिला अन् डोक्याला थोपटत मला झोपी घातले. थोपटत असतांना मायने विचारपूस केली कुठे बकऱ्या चरायला घेऊन गेला होता..?
कुठे, कसा, काय मी सांगत सांगत झोपी गेलो. मायना दरवाज्याची साखळी अटकवली आणि मायपण झोपी गेली.
 
 
पहाटं मायना लवकर उठून तिचं अंघोळ पाणी आवरून मी आत्ताच येते छोटे सरकार अशी हाक दिली..!
मी अंथरुणात असल्यामुळे मी अंदाजे होकार दिला..!
काही वेळाने माय आली. पाठोपाठच काहीवेळाने गावातले डाक्टर आण्णा त्यांच्या पांढऱ्या जिबडीत घरला आले.
 
एरवी मी झोपलेलोच होतो. आण्णाने आवाज दिला,
 
ओ छोटे सरकार.
कसे वाटतंया आत्ता..?
मी अण्णाला बघून स्वतःला सावरत उठलो. बाजीवर बसून राहिलो.
काय झाले? कसे झाले? सांगितल्यावर आण्णांनी झोपायला सांगितले.
मी झोपलो आण्णांनी तपासणी केली, डोळ्यांना बघितले.
आण्णांनी त्यांच्या सुटकेटीमधून काही गोळ्या काढून दिल्या. उकळत्या पाण्यात सुई धुवून एक इंजेक्शन दिले.
आण्णांनी मला काही खाऊन गोळ्या घेऊन झोपून रहायला सांगितले, मी झोपून राहिलो.
 
(आण्णांनी मायला सांगितले होते.)
छोटे सरकारला काविळ झाला हायसा. पाच सहा दिवस त्याले बकऱ्या घेऊन चाराया पाठवु नगा.
आण्णा बोलते झाले की, दोन दिसाला घरच्या दावखाण्यात येऊन गोळ्या घेऊन जा अन् आण्णा निघून गेले.
 
मायना चहा बिस्कुट आणून दिले. ते खाऊन मी गोळ्या घेऊन झोपी गेलो होतो.
तितक्यात सलम्या, हनम्या घरला आले अन् मायला ईचारू लागले छोटे सरकार कुठं हायसा?
मायना कावीळ झाल्याचे सांगितले अन् सलम्या, हनम्या माझ्याजवळ येऊन बसले. मला बोलते झाले की, बकऱ्यांची चिंता करू नको.
मग त्यांनी अंगणातील बकऱ्या सोडल्या अन् माझ्या बकऱ्या ते त्यांच्या बकऱ्यांसोबत चराया घेऊन गेले.
 
मी, माय अंगणातून दोघांना बघत होतो. पुढे बकऱ्या मागे सलम्या, हनम्या मला हात दाखवित चालली होती. मायच्या डोळ्याला आमची दोस्ती बघून पाणी आले होते.
मायना डोक्यावर हात फिरवत मला आत घरात नेले.
झोपाया सांगितले. मी झोपलो होतो माय माझ्याजवळ बसून माझे पाय चेपत होती.
काही दिवस बकऱ्या चारण्याचा माझा प्रवास थांबला होता.
समाप्त..!
भारत लक्ष्मण सोनवणे.