तुम्ही आहात का FOMOची शिकार?

युवा विवेक    16-Sep-2022
Total Views |

tumhi aahat ka fomochi shikar?
 
 
तुम्ही आहात का FOMOची शिकार?
गेम ऑफ थ्रोन्सचा सीझन, बाहुबली, लीटल थिंग्स सगळ्यांनी पाहिले, पण मी नाही. किती मनोरंजनाचे क्षण गमावले असतील मी? गेल्या दोन तासात मी फोन पाहिला नाही, काही सुटलं असेल का? मोबाईल बंद पडला म्हणून आयुष्यात खूप काही गमावल्याची भावना मनात येतेय का? एखादा ऑनलाईन इव्हेण्ट चुकवल्याचा पश्चात्ताप होतोय का? एखादी बातमी लोकमाध्यमातून आपल्याला उशीरा समजली तर रुखरुख लागतेय का? फेसबुकवरची एखादी चर्चा आपल्या नजरेतून सुटल्याचं वाईट वाटतंय का? एखाद्या कार्यक्रमात गेलो नाही तर चुकल्यासारखं वाटतंय का? सगळे आनंदात आहेत, त्यांचं आयुष्य सुखात चाललंय आणि मी मात्र दुःखात, नैराश्यात आहे असं वाटतं. एरियातच एखादं नवीन रेस्टॉरंट सुरू झालंय, सगळे जाऊन आले पण मला नेमकं माहीत नाही याचं दुःख होतं. हे सगळं किंवा यासारखं काही होत असल्याचा अनुभव तुम्हाला येत असेल तर FOMO(फोमो) अर्थात फिअर ऑफ मिसिंग आऊटची सवय तुम्हाला लागली असल्याची शक्यता नाकारता येत नाही.
 
आहे तरी काय हे फोमो? फोमो ही खरं तर एक मानसिक स्थिती आहे. एखादा संस्मरणीय कार्यक्रम, एखादा अनुभव, एखादी मेजवानी, एखादी चर्चा, एखादा आनंदाचा क्षण, एखादा निर्णयाचा क्षण सुटल्याची, चुकवल्याची भावना मनाला सतावणं. त्यामुळे पश्चात्ताप होणं. सुरुवातीच्या काळात या क्षणासंबंधी मर्यादित असलेली ही अपराधी मानसिकतेची म्हणजे फोमोची भावना. लोकमाध्यमं अस्तित्वात आल्यावर तिचं स्वरुप आणि परिणाम दोन्ही बदललं. त्याला चोवीस तास शरिराला चिकटून असलेल्या एका यंत्राची मदत होती. एखादी गोष्ट चुकवल्याचा/चुकल्याचा अपराधगंड आबालवृद्धांच्या(विशेषतः तरुणाई) मनाला ग्रासू लागलाय. लोकमाध्यमावरील उपस्थिती, मनोरंजन, सततचे अपडेट्स इथपर्यंत मर्यादित असणारा हा फोमो मार्केटिंग, व्हिडिओ गेम्स, इन्व्हेस्टमेण्टचे, शेअरमार्केटचे अपडेट्स यामुळेही रुजू लागलाय. फोमोमुळे केवळ अपराधगंड मनाला ग्रासतो एवढ्यापुरती याची व्याप्ती सीमित नाही. यामुळे मानवी मनाला ताण किंवा स्ट्रेसचा सामना करावा लागत आहे. सेल्फ एस्टिम किंवा स्वतःविषयीचा असलेला मान यावर परिणाम होताना दिसून येतो.
 
फोमो अर्थात फिअर ऑफ मिसिंग आऊट या शब्दाचा सर्वप्रथम वापर केला १९९६मध्ये मार्केट स्ट्रॅटेजिस्ट डॉ. डॅन हर्मन यांनी. त्यानंतर लेखक पॅट्रिक मॅकगिनिज यांनी आपल्या फोमो ही संकल्पना विशेष लोकप्रिय केली. २००४साली हार्वर्ड विद्यापीठाचे नियतकालिक हर्बसमध्ये २००४-०५ साली ही संकल्पना त्यांनी प्रखरपणे मांडली. २०१३मध्ये फोमो हा शब्द आणि संकल्पना ऑक्सफर्ड डिक्शनरीमध्ये समाविष्ट करण्यात आली. फोमो म्हणजे केवळ तुमच्या उत्कर्षासाठी आवश्यक असलेली एखादी गोष्ट सुटून जाणं किंवा चुकणं नव्हे. तर जे तुमच्या हातून सुटलंय त्याचा अन्य व्यक्तींना लाभ होत असल्याची खदखद जाणवणं म्हणजेदेखील फोमोच. एखादी गोष्ट न अनुभवणं किंवा ती सुटणं ही गोष्ट अनेकदा आपल्यासाठी नॉर्मल असते. काही वेळा आपण स्वतःही ती सोडून देत असतो. मात्र फोमोमध्ये अशी परिस्थिती आपल्यात काहीतरी कमतरता आहे याची जाणीव करून देते. आत्मविश्वासाचा अभाव निर्माण करते.
 
फोमोमुळ मानसिक स्थिती बिघडण्याचीही शक्यता असते. चिंता, नैराश्य, स्वाभिमानाचा अभाव, धोकादायक वर्तणूक अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मानसिक स्थिती फोमोच्या प्रभावाने तयार होऊ शकतात. या विषयावर आजवर प्रकाशित झालेल्या संशोधनपर निबंधातील निष्कर्षानुसार फोमोची स्थिती कोणत्याही वयाच्या किंवा लिंगाच्या व्यक्तींबाबत उद्भवू शकते. मुलांच्या व तरुणांच्या बाबतीत पिअर प्रेशरचा प्रभाव अधिक असण्याची शक्यता असते. फोमोमुळे मुलींमध्ये नैराश्य तर मुलांमध्ये ताण असे परिणाम सर्वसाधारणपणे दिसून येतात. जे आपल्याकडे नाही किंवा आपल्याला मिळू शकत नाही, त्याचा आनंद दुसऱ्याला घेता येतो आहे अशी भावना मनावर परिणाम करणं या वयात सहज शक्य असतं.
फोमोतून बाहेर कसं येणार?
सर्वप्रथम आपण फोमोच्या चक्रात अडकलो आहोत याची जाणीव होणं महत्त्वाचं आहे. प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्टीला हो म्हणणं किंवा ती झालीच पाहिजे असं म्हणणं हे शक्य नसतं. प्रत्येक गोष्ट मिळणं, प्रत्येक आनंदी अनुभव घेणं, प्रत्येक ठिकाणी आपण उपस्थित असणं हे ही अवघड असतं. प्रत्येक वेळी समाजमाध्यमावर स्वतःचा वावर असणं, प्रत्येक गोष्टीची माहिती असणं कठीण असतं. त्याला अनेक कारणंही असू शकतात. त्यामुळे वाईट वाटणं हे समजू शकतो, पण ही भावना वारंवार आणि अनेक बाबतीत जाणवत असेल तर मात्र पुनर्विचाराची गरज आहे हे समजून जायला हवं. फोमोवर मात करण्यासाठी छोटी छोटी पण महत्त्वपूर्ण पावलं आपण नक्कीच उचलू शकतो. फोमोच्या भीतीपायी कळत नकळत अनेकदा अनेक गोष्टींमागे आपण उगीचच धावत असतो. अशा वेळी स्वतःचा वेग ठरवून कमी करणं आवश्यक असतं. जेवणं, झोपणं, धावणं, वाचणं अशा क्रिया आपण शांतपणे करू शकतो. त्या तशा करायला हव्यात. प्रत्येक गोष्टीकडे विवेकी दृष्टीने पाहण्याची सवय लावून घ्यायला हवी. म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला मिळाली नसेल वा आपण ती नाकारली असेल तर त्याची कारणमीमांसा समजून घेऊन, परिस्थितीचा विचार करून आयुष्याला इट्स ओके म्हणायला हवं. आपल्या अपेक्षा अमर्याद असतात, पण गरजा मर्यादित असतात त्यामुळे सगळ्याच गोष्टी मिळायला हव्यात, समजायला हव्यात, अपडेटेड असायलाच हवं असं असण्याची गरज नाही, ही खूणगाठ मनाशी पक्की बांधायला हवी. एकावेळी एकच गोष्ट हे धोरणही महत्त्वाचं आहे. लोकमाध्यमात, समाजात, कुटुंबात, शैक्षणिक परिसरात एकाच वेळी वेळ देणं, त्याचा अनुभव एकाच वेळी घेणं हे अशक्य आहे. त्यामुळे एकावेळी एकच यावर ठाम रहा आणि समाधानीही रहा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सोशल मीडियाचा अतिरेकी वापर टाळा. सध्याच्या काळात लोकमाध्यम किंवा सोशल मिडीया हे फोमोचं महत्त्वाचं कारण असल्याचं दिसून येतं. आपल्या वेळेनुसार, उपलब्धतेनुसार लोकमाध्यमाच्या वापरावर मर्यादा घाला, प्राधान्यक्रम ठरवा.
 
फोमोचा प्रश्न जटील नाही, पण तो सोडवणं आवश्यक आहे हे मात्र खरं. आपल्याला फोमो आहे की नाही हे तुम्हाला समजून घ्यायचंय का? मग लेखाचा पहिला परिच्छेच पुन्हा एकदा वाचा बरं. यातल्या कोणत्या गोष्टी तुम्हाला त्रास देतायत का? मग वेळेवर उपाययोजना करा. बारीकसारीक प्रश्नाने वेढून टाकावं इतकं आपलं आयुष्य स्वस्त नाहीये. पटतंय ना?
मृदुला राजवाडे