वेळी अवेळी माझे असे झाड होते..

युवा विवेक    20-Sep-2022
Total Views |

maze zaad hote
 
 
वेळी अवेळी माझे असे झाड होते..
माणुसपणा पेक्षा
झाडपण जास्त गोड
झाडाचा जन्म यावा..
मी झाड ..
झाडपणात जगताना..
उगाच आभाळ भरून येते
उगाच पाऊस कोसळत ऱ्हातो
उगाच जीवाची घालमेल होते
उगाच गहिवर ओला होतो
पुन्हा पुन्हा तेच ते घडत ऱ्हाते
अंधारून आलेल्या दिशा,
हवा हवासा तरी नकोसा तोच तो गार वारा
नको असता सरसरून येतो उगा शहारा
झिडकारले तरी डोकावत ऱ्हातो वेडा पसारा
उगा पुन्हा तेच ते... कित्ती काळ लोटला तरी
पुन्हा पुन्हा तेच ते घडत ऱ्हाते
वळणावरचा वेडा चाफा ....
अजूनही भिजत असतो पावसात
झेलत असतो प्रत्येक सर अंगावर
थेंबांना टपोऱ्या खेळवत असतो अंगभर
उगाच पुन्हा तो ही कोंभारून येतो
उगाच पुन्हा कळ्यांनी वेडा भरून जातो
उगाच पुन्हा त्याचाही दरवळ होतो
उगाच पुन्हा तेच ते घडत ऱ्हाते
तुझी आठवण येते अन....
माझे असे झाड होते
कित्ती काळ लोटला तरी अजुनही..
मी निश्चल तिथेच त्याचं वळणावर
झाड होऊन जगत असते
फुलत असते ,फळत असते
गहिवर सारे दडवून आत
गंध मनाचा उधळत असते.....
रीती होऊ पाहते ..
बहर सारा ओघळवून खाली
ओघळ काही सरत नाही ...
वसंत यायचा रहात नाही
कित्ती काळ लोटला तरी
माणूसपण सरते आहे झाडपणात
जगताना
झाडपण आवडते आहे...
चाफा ,प्राजक्त, कुंपणातली बाभूळ अथवा
बांधावरला पळस सुद्धा होईन म्हणते !
सौंदर्याचे वर्गीकरण उगा मनाला हवे कशाला...
हिरव्या फांद्यात जन्म सारा पेलीन म्हणते
झाडपण आवडते आहे झाडपणात जगेन म्हणते
पानगळी नंतर पुन्हा नव्याने फुलेन म्हणते ..
झाड होणं सोप्प नसलं तरी..
अशक्य मात्र नक्कीच नाही!
अमिता पेठे पैठणकर