मिनिमलिस्टिक जीवनशैली - काळाची गरज

युवा विवेक    23-Sep-2022
Total Views |

minimalistic life style
 
 
मिनिमलिस्टिक जीवनशैली - काळाची गरज
मला खांद्यावर सॅक अडकावून आठ-आठ दिवसांसाठी ट्रेकिंगला जाणारे, एकाच झोळीत आवश्यक तेवढे कपडे घेऊन नर्मदा परिक्रमा करणारे लोक यांच्याबद्दल विशेष कुतूहल वाटतं. कसं मावत असेल एका छोट्याशा बॅगेत दैनंदिन गरजेचं सामान, असा प्रश्न नेहमी पडतो आणि त्याक्षणी डोळ्यासमोर येते ती सामान भरून ओसंडून वाहणारी ऑफिसला नेण्याची भलीथोरली पर्स. माझं मन नकळतपणे अंतर्मुख व्हायला लागतं. गरजेपुरतं तेवढंच सामान कॅरी करण्याचा आणि त्यादृष्टीने सॉर्टेड असणारा त्यांचा दृष्टीकोन मला थक्क करतो.
 
ठेविले अनंते तैसेची रहावे। चित्ती असू द्यावे समाधान असं संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगात म्हटलेलंच आहे. मन समाधानी ठेवणं हे आपल्याच हातात आहे ना? पण आपण काय करतो? मित्राने नव्या व्हर्जनचा फोन घेतला; मला पण हवा, बाबांच्या मित्राने नवीन घर बुक केलं; आम्हीपण लगेच केलं, बाजारात नव्या फॅशनचे कपडे आलेत; कपाटभर कपडे असून पण मी ते लगेच घेतले, कार लोन घेऊन लगेच गाडीपण घेतली, ऑनलाईन फेस्टिव्हल सीझनमध्ये स्वयंपाकघरातील उपकरणांची नवी रेंज बाजारात आलीये; लगेच घेऊन टाकलं. सण जवळ आलाय म्हणून नवीन खरेदी केली. वाढदिवस म्हणून मित्रांना मोठ्या हॉटेलात पार्टी दिली. खरेदीचा आणि खर्चाचा हा वाढता वसा काही संपत नाही. यापैकी खरी गरज कशाची आणि त्यातलं आपण काय व किती वापरतो, त्याची उपयुक्तता आहे का? हा खरा विचार करण्यासारखा मुद्दा आहे. ही मानसिकता बदलायची असेल तर गरज आहे मिनिमलिस्टिक जीवनशैली अंगिकारण्याची.
 
आहे तरी काय हा मिनिमलिझम?
कमीत कमी संसाधनांचा अधिकाधिक वापर आणि त्यातून मिळणारा आनंद अशी मिनिमलिझमची ढोबळ व्याख्या करता येईल. निरर्थक किंवा अनावश्यक गोष्टींचा त्याग करून, ती जागा उपयुक्त आणि आवश्यक गोष्टींसाठी उपलब्ध करून देणं म्हणजे मिनिमलिझम. मिनिमलिझम ही एक विचारधारा आहे, जीवनाकडे बघण्याचा व अनुसरण्याचा एक मार्ग आहे. कमीतकमी वस्तूंचा वापर करून जगणारी ही एक जीवनशैली आहे.
 
मिनिमलिझम म्हणजे पैशाच्या बाबतीतला चिकटपणा, कंजुषपणा नाही, तर आवश्यक तिथेच खर्च करणं, केलेला खर्च उपयुक्त असेल असं पाहणं. कमीत कमी आणि आवश्यक तेवढ्या संसाधनांसह, वस्तूंसह आपलं आयुष्य जगणं म्हणजे मिनिमलिझम. मुळातच चंगळवाद ही भारताची संस्कृती नाही. आपल्या आजोबांच्या पिढीपर्यंत जुने कपडे फाटल्यावरच नवे घेण्याची पद्धत होती. त्यामुळे घरात दररोज वापरण्याचे दोन जोड, पावसाळ्यात-थंडीत हवा म्हणून अजून तिसरा आणि एखादा कार्यक्रमाला जाण्याचासाठीचा खास कपड्यांचा जोड. अशीच व्यवस्था घरातल्या सगळ्यांची असायची. कधीकाळी घरातल्या सगळ्यांचे कपडे एका लोखंडी कपाटात मावत. आज माझ्या स्वतःच्या घरात माणशी एक कपाट पुरत नाहीये. पूर्वी घरात एकच टीव्ही, फोन असे. आज अनेक घरांत प्रत्येक खोलीत एक टीव्ही, माणशी एक मोबाईल असतो. घरोघरी गरज नसतानाही अनेक उपकरणं विकत घेतली जातात. हे सारं गरजेच्या आणि हौशीच्या अशा सगळ्याच गोष्टींना लागू होतं. मिनिमलिझम शैली आकारणारी व्यक्ती ही एखादी गोष्ट घेताना त्याची गरज आहे का याचा विचार आधी करते आणि #Money_ Saving_Is_Money_Gaining हे सूत्र बचतीसाठी उपयुक्त ठरतं. ऑनलाईन खरेदीचे पॉपअप्स येत असतील तर तुम्ही चक्क स्क्रोल करून पुढे जाऊ लागता. जाहिरातींकडे कानाडोळा करता.
 
मिनिमलिझममधील आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे अनावश्यक गोष्टी बाद करणं. आपल्या घरातल्या अनेक गोष्टींशी आपण मनाने फार जोडलेले असतो. यात नॉस्टॅल्जिया किंवा आठवणींचा भाग मोठा असतो. लग्नातली साडी, बालपणीचा एखादा फ्रॉक, नवऱ्याने सरप्राईज गिफ्ट केलेला मोबाईल, आईने दिलेली भांडी, मैत्रिणीने दिलेली आणि फ्रिजमध्ये पडून राहिलेली कॉस्मॅटिक्स, माझ्या पहिल्या पगारातून घेतलेली साडी, ही यादी फार लांबत जाते. काही गोष्टी तर आपण खराब झाल्या नाहीत म्हणूनही उगीचच जपत राहातो. नवीन खरेदी झाली की, जुन्या वस्तू मनाला फार न गोंजारता बाद करणं, गरजवंताला देणं हे करणं आवश्यक असतं. मुळात वस्तू विकत घेणं, जपणं किंवा तिचा मोह पडणं वाईट नाही. पण योग्य वेळी ती बाद करत नसू तर मात्र कपाटं भरभरून वाहात राहतात. घरातली अडगळ वाढत राहाते.
 
हीच स्थिती अन्नपदार्थांची वा जिन्नसाच्या खरेदीची. गरजेपेक्षा अधिक अन्न शिजवणं, हॉटेलात गेल्यावर आवश्यकतेपेक्षा अधिक किंवा माणसागणिक अन्नपदार्थ मागवणं, थोडं उरलं म्हणजे सगळ्यांना पुरलं ही मानसिकता यामुळे अनेकदा आपण अन्न टाकून देतो. गरजेइतकं मागवणं, त्यासाठी गरजेइतकाच खर्च करणं, अन्न उरलंच तर वेळीच ते वाटून टाकणं हे मिनिमलिस्ट धोरण आहे. याचप्रमाणे आपल्या दैनंदिन गरजांच्या वस्तूंचा विचारही मिनिमलिझममध्ये करणं शक्य आहे. सौंदर्य प्रसाधनं, चप्पल, चामड्याच्या वस्तू, परफ्युम्स, गॅजेट्स, सीडीज, पेनड्राईव्हज आदी डिव्हाईसेस, या सगळ्यांचा उपयुक्ततेनुसार खरेदी, विक्री आणि योग्य वेळेस त्याग करणं हे जागाही वाचवतं आणि सॉर्टेड राहणंही जमतं. ई-कचरा देखील पुनर्चक्रीकरणासाठी म्हणजे रिसायकलिंगसाठी देणं, पुनर्वापरायोग्य प्लास्टिक वापरणं आणि ते रिसायकलिंगसाठी पाठवणं हे ही आवश्यक. यामुळे निसर्गाचा ऱ्हास तर कमी होतोच, त्याचबरोबर त्याची काळजी घेण्याचा वेळही वाचतो.
 
मिनिमलिझम ही संकल्पना तसं पाहिलं तर भारतासाठी नवीन नाही. येथील ऋषिमुनी कमीत कमी संसाधनांचा वापर करून राहातच होते. पुढे आपल्या मध्यमवर्गीत मानसिकतेत अंथरूण पाहून पाय पसरावेत किंवा जुनी वस्तू खराब झाली वा बंद पडली की नवीन घ्यावी अशी पद्धत होती. अनेक कुटुंबात ती आजही आहे. हातावरचं पोट असणारे वरचेवर इकडे तिकडे स्थलांतरित होत असतात. असे अनेक जण कमीत कमी संसाधनांचा वापर करतात व संसाराचा पसारा आटोपता ठेवतात. मिनिमलिस्ट होण्यासाठी आपल्या सोयीनुसार ठराविक दिवस ठरवून घरातल्या खोल्यांची (केवळ स्वच्छता नाही) आवराआवर करून आवश्यक-अनावश्यक वस्तूंची विभागणी करणं, नको ते बाद करणं हे वेळोवेळी करणं खरोखर गरजेचं असतं.
 
हाच मिनिमलिझम आपल्या विचारांच्या बाबतीतही आवश्यक असतो. आपण आपल्या एवढ्याश्या मेंदूत काय काय साठवत असतो, प्रत्येक बाबतीत त्याला किती काम करायला लावतो. त्यापेक्षा आयुष्याच्या बाबतीत सॉर्टेड राहून थोडं मिनिमलिस्ट होता येईल का याचाही विचार केला पाहिजे. आता मला कोणत्या गोष्टींना प्राधान्य देणं आवश्यक आहे हे ठरवण्याची सवय तेव्हाच लागेल जेव्हा आपण तसा विचार करण्यास सुरुवात करू. आपल्या जीवनशैलीत काही धोरणात्मक बदल केले आणि मुख्य म्हणजे त्यात सातत्य राखलं तर हे नक्की शक्य आहे. ही मिनिमलिस्टिक जीवनशैली कदाचित आपल्या संपूर्ण आयुष्याचाच मूलमंत्र होऊ शकेल आणि तरुणांच्या भाषेत बोलायचं तर लाईफ सॉर्टेड असेल.
 
मृदुला राजवाडे