प्रसन्न सकाळ...

युवा विवेक    27-Sep-2022
Total Views |

prasanna sakal
 
 
 
प्रसन्न सकाळ... 
 
सकाळी धुक्याची जाड, गडद चादर पसरली होती. धुकं इतकं दाट होतं की, हात फिरवला तर तोही ओला होत होता. बरोबर गारठा ही प्रचंड होता. तरीही टेरेसवरच्या बागेत इतक्या धुक्यातही फिरून यावसं वाटलं. अंगावर शाल घेतली नि अंधुकशा प्रकाशात बागेत गेले. बघितलं तर लाजळूचं छोटसं रोपटं धुक्याला, थंडीला घाबरून त्यानं स्वतःला घट्ट मिटून घेतलं होतं. गुलाबी, पांढरी, पिवळी शेवन्ती मात्र धुकं, गारवा यांना न जुमानता फुललेल्या ताटव्यासह गोड स्मित करत उभ्या होत्या.
काळसर, निळसर, राखाडी आसमंतात आता केशरी आभा उमटली होती. धुक्याला छेदून आरपार किरणं माझ्या पर्यंत पोचत होती. वितळत जाणारं धुकं मात्र त्याच्या पाऊल खुणा दवबिंदूंच्या रूपान मागे सोडत निघालं होतं. जसं धुकं कमी होऊ लागलं तसा मोत्यांचा सडाच जणू सगळ्या बागेत पडला होता ,एकेक मोती अगदी तेजस्वी, सूर्याच्या किरणात अगदी लखलखून गेले. केवढं हे सौंदर्याचं ऐश्वर्य या पहाटेने मला दिलं, दाखवलं..
सगळं वातावरण कसं शांत निवांत होतं, ते अचानक पाखरांच्या किलबिलाटाने जाणवलं. धुक्याची चादर जाऊन केशरी उन्हाची उबदार सोनेरी चादर अंथरण्याचं काम चालू आहे सगळीकडे. सकाळी सकाळी पाखरांचा आवाज कानी पडणं आणि इतक्या गोड आवाजाने आपल्या दिवसाची सुरुवात होणं दुर्मिळ. वाढत्या शहरीकरणामुळे नि प्रदूषण, वृक्षतोडीमुळे. पण या बाबतीत मी खूप नशीबवान आहे कारण अजूनही आमची रोजची सकाळ या निरागस पक्षांच्या चिवचिवाटाने नि किलबिलाटाने होते. खूप प्रसन्न आणि ऊर्जा देणारी सकाळ माझ्या वाट्याला रोज येते.
रोज नवा पाहुणा आमच्या गॅलरीतल्या खिडकीत असतो सकाळच्या गरव्यामुळे खिडक्या बंद असतात. त्याचा एक फायदा असा होतो की काचेच्या बाहेरून पक्षी, पिल्लं येऊन बसतात, काचेत त्यांना त्यांचंच प्रतिबिंब दिसतं. न जाणो त्यांना काय वाटतं स्वतःलाच पाहून ते टक् टक् करत चोच आपटत असतात. मग असा टक् टक् आवाज आला की, आमच्याकडे अगदी धांदल उडते. बच्चे कंपनी हातातले काम असेल नसेल ते टाकून धाव घेतात नि अलगद आवाज न करता काचेच्या आतून त्या पक्षांना न्यहाळत असतात. कधी राखाडी, कधी पारवे, कधी मोरपंखी, कधी काळे नजाणो कित्ती कित्ती रंगाचे नि जातीचे वेगवेगळे पक्षी आमच्या खिडकीच्या आरशात स्वतःला न्यहाळत असतात. बच्चे कंपनी अगदी आवाज न करता त्यांच्या अनेक लकबी झटक्यात मान वेळवणे त्यांची ती डोळ्यांची चंचल हालचाल, त्यातून जोडपे असेल तर बघायलाच नको जलद पणे पंख फडफडवणे एकमेकांकडे माना वाकवून वाकवून पाहणे, चोचीत चोच घालणे, कधी मायलेकरे असतील तर वेगवेगळे आवाज काढून पिलाला काहीतरी शिकवणे अथवा पंखांची फडफड करून जणू ती बाळाला जगण्याचे धडेच देते आहे असे वाटते. काचेच्या आतून अलवार म्हणजे अगदी आपल्या श्वासांच्या आवाजानेही ते उडून जातील अशी भीती वाटून सावकाशीने श्वास घेणं म्हणजे आ हा हा! बाळाहुन बाळ व्हायला होतं. ओळीनं हिरव्या रंगाचे रानातले पोपट आपण नेहमी पाहतो तसे नाही त्यापेक्षा बरेच लहान अगदी बारकुल्या शरीराचे जेवणाच्या पंगती प्रमाणे ही मैफिल आमच्या खिडकीत ऊन खायला हिवाळ्यात हमखास हजर असते. त्यांचं निमुळतं वळणदार शरीर, लाल पातळशी चोच काळसर भुरकट डोळे कित्ती कित्ती सुख असतं म्हणून सांगू यात ही अशी गोड सकाळ रोज माझ्या वाट्याला येते नि दिवसभराच्या धकाधकीसाठी बळ देऊन जाते.....
अमिता पेठे पैठणकर