हिंदुस्थानच्या तेजशलाका

युवा विवेक    30-Sep-2022
Total Views |

hindustancya tejashalaaka
 
 
 
हिंदुस्थानच्या तेजशलाका
नवरात्रीच्या निमित्ताने दरवर्षी देवीच्या विविध रुपांची आणि त्यामागील कथांची उजळणी होते. स्त्री कधी मातारूप पार्वतीचं रूप घेते तर कधी ती विद्यादायिनी सरस्वतीचं रूप घेते, कधी संतती-संपत्ती बहाल करणाऱ्या महालक्ष्मीचं रूप घेते. पण जेव्हा कधी तिच्या भक्तांवर संकटं ओढावतात, परचक्र येतं तेव्हा तेव्हा ती दुर्गेचं, शक्तीचं, महाकालीचं, भवानीचं रूप घेते. देवीचं हे असूरमर्दिनीरूप केवळ पुराणांतील, आख्यायिकांतील, केवळ रूपककथांतील नाही. आक्रमकांनी भारताला जेव्हा जेव्हा पारतंत्र्यात ढकललं तेव्हा तेव्हा देव, देश आणि धर्म रक्षणासाठी तिने हा अवतार धारण केला. मुस्लिम आक्रमणापासून सुरू झालेला हा लढा भारताच्या आधुनिक स्वातंत्र्यसंग्रामापर्यंत सुरूच होता. दुर्दैवाने काही इतिहासकारांना या रणरागिणींचा इतिहास फारसा पुढे येऊ दिलाच नाही. या लेखात आपण या राण्यांचा परिचय करून घेऊन.
 
नायकीदेवी – महाराजा पृथ्वीराज चौहान यांना वारंवार धोका देऊन पराभूत करणाऱ्या आक्रमक महंमद घोरी याला नपुंसक करणारी राणी म्हणजे गुजरातमधील चालुक्य वंशातील नायकीदेवी सोळंकी. ११७८मध्ये गुजरात काबीज करायला विशाल सैन्यासह आलेल्या महंमद घोरीला तिने सळो की पळो करून सोडले. नायकीदेवीने आपल्या राज्यातील सर्व स्त्रियांना सुरक्षित स्थळी हलवून त्यांच्या शीलाचे रक्षण केले. चाल करून आलेल्या महंमद घोरीच्या गुप्तांगावर वार करून त्याला इतके जबर घायाळ केले की, नपुंसक झालेल्या घोरीने पुढील तेरा वर्षे भारताकडे डोळे वर करून पाहण्याची हिंमत केली नाही.
 
राणी दुर्गावती – तीनही मुस्लिम शासकांना जेरीस आणणारी गोंडवानाची राणी दुर्गावती. गोंडवानाचे महाराज दलपतसिंह यांच्याशी विवाह झाल्यानंतर अवघ्या चार वर्षांत दुर्गावतीला वैधव्य आलं. रडतकुढत न बसता राणीने स्वतः राज्यकारभार हाती घेतला. तिच्या पराक्रमामुळे पराजित मुस्लिम शासकांनी गोंडवानाकडे डोळे वर करून पाहणंही सोडून दिलं. या तीनही मुस्लीम राज्यांची सगळी संपत्ती दुर्गावतीने विजय मिळवून हस्तगत केली. १६ वर्षांच्या आपल्या राज्यकारभारात राणीने अनेक मठ-मंदिरे-धर्मशाळा बांधल्या. मुघल शासक अकबराच्या छळापुढे कच खाण्यास ठाम नकार दिला व युद्धभूमीवर त्याला लढत देऊन राणीने हसत हसत मृत्यूला कवटाळलं.
 
राणी अब्बक्का चौटा – चौटा या मातृसत्ताक वंशाच्या घराण्यात अब्बक्काचा जन्म झाला. १५२५मध्ये पोर्तुगाल आक्रमकांनी द. कर्नाटकच्या किनाऱ्यावर हल्ला करून मंगळुरू बंदर उध्वस्त केले. परंतु अब्बकाशासित उल्लालवर ते हल्ला करू शकले नाहीत. तिच्या रणनीतीमुळे हैराण पोर्तुगीजांनी १५५५मध्ये अब्बक्काविरोधात युद्ध छेडले, पण या युद्धात त्यांना सपशेल हार पत्करावी लागली. पोर्तुगीज वारंवार मंगळुरूवर हल्ला करत राहिले व अब्बक्का त्यांना हरवत राहिली. कालिकतच्या राजाला सोबत घेऊन अब्बक्काने मंगळुरूमधील पोर्तुगीजांचा किल्ला उध्वस्त केला. पण प्रत्यक्ष पतीच पोर्तुगीजांना फितूर झाल्याने अब्बक्का पकडली गेली. कैदेतही तिने आपला संघर्ष सुरूच ठेवला व तिथेच अखेरचा श्वास घेतला. अब्बक्काला पहिली महिला स्वातंत्र्यसेनानी म्हटलं जातं.
 
महाराणी जिजाबाई भोसले – आदिलशाही, निजामशाहीत होरपळून निघालेल्या, गाढवाचा नांगर फिरवलेल्या पुण्यात सोन्याचा नांगर फिरवून भावी हिंदवी स्वराज्याचं सूतोवाच करणाऱ्या जिजाबाई भोसले या निष्णात युद्धपटू होत्या. बालपणीच तलवारबाजी, युद्धनीतीचं शिक्षण घेतलेल्या जिजाबाईंनी महाराष्ट्राला मुस्लीम अधिपत्यातून बाहेर काढण्यासाठी आपल्या मुलाला, शिवाजीला हाताशी घेतलं. त्याच्यावर सर्व संस्कार केले, देव-देश आणि धर्माप्रती त्याला जागृत केले, कुशल राजकारणाचे धडे दिले. हिंदवी स्वराज्याची स्थापना झाल्यानंतर अनेक प्रसंगांत छत्रपती शिवाजी महाराजांना मार्गदर्शन केलं. वेळप्रसंगी स्वतः तलवार हाती घेतली. महाराजांच्या अनुपस्थितीत राज्यकारभार पाहिला. हिंदवी स्वराज्याची पार्श्वभूमी तयार करण्याचं महत्त्वपूर्ण कार्य करणाऱ्या जिजाबाई प्रातःस्मरणीय आहेत.
 
राजमाता अहिल्यादेवी होळकर –  स्त्री युद्धभूमीत जितके अतुलनीय शौर्य दाखवू शकते, तितकाच कुशलपणे ती राज्यकारभार चालवू शकते याचा वस्तुपाठ घालून देणाऱ्या राजमाता अहिल्यादेवी होळकर. वैधव्य आल्यानंतर रडतकुढत न बसता राज्यकारभार हाती घेतला. लोककल्याणकारी कामं केली, देशभरातील देवस्थानांचा जीर्णोद्धार केला, वर्षासनं सुरू केली, धर्मशाळा-पाणपोया बांधल्या, नदीकिनारी घाट बांधले, माहेश्वरी विणकरांना व्यावसायिकतेचं अधिष्ठान मिळवून दिलं. स्त्रियांना सैनिकी शिक्षणाची व्यवस्था, पहिली स्त्रियांची सैनिकी तुकडी, विधवा पुनर्विवाह, विधवांना दत्तक विधानाचा अधिकार अशा विविध उपक्रमांचं श्रेय अहिल्यादेवींना जातं. मध्यप्रदेशातील नागरिकांच्या मनात अहिल्यादेवी होळकरांसाठी एक खास स्थान आहे.
 
राणी वेलू नचियार – तामिळनाडूच्या शिवगंगई येथे जन्मलेली व इंग्रजांना युद्धात हरवणारी राणी वेलू नचियार. १७७२मध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या इंग्रज सेनेने शिवगंगईवर आक्रमण केले. या युद्धात तिचा पती, मुलं आणि अनेक सैनिक मारले गेले. वेलू आणि तिची मुलगी मात्र बचावली. १७८०मध्ये वेलू नचियार आणि इंग्रजांमध्ये मोठा संघर्ष झाला. इतिहासातील पहिला आत्मघातकी स्फोट घडवून आणण्याचा निर्णय राणीने घेतला. सेनापती(काहीजण हिला राणीची मानसकन्या मानतात) कुईली हिने स्वतःच्या शरिरावर तूप ओतून आग लावली व इंग्रजांच्या दारूगोळ्याच्या साठ्यावर उडी मारली. राणीच्या युद्धचातुर्यामुळे इंग्रजांना शिवगंगई सोडून पळून जावे लागले. १७९६मध्ये वेलू नचियारचे निधन झालं. आपल्या कर्तृत्वाने तिने तामिळी जनतेच्या मनात स्वातंत्र्याची ठिणगी चेतवण्याचे कार्य केलं होतं.
 
राणी चेन्नम्मा – १८२४मध्ये कर्नाटकमधील कित्तूरची महाराणी चेन्नम्माने सत्ता हडपणाऱ्या इंग्रजांविरोधात तीव्र संघर्ष केला होता. बालपणापासून तलवारबाजी, घोडेस्वारीत तरबेज असणाऱ्या राणी चेन्नम्माचा विवाह कित्तूरच्या राजघराण्यात झाला. आपल्या मुलाच्या मृत्यूनंतर तिने शिवलिंगप्पा यास उत्तराधिकारी केले. दत्तकपुत्रास राज्य चालवण्याचा अधिकार नाही असे सांगत इंग्रजांनी कित्तूर आपल्या अधिपत्याखाली घेण्याचा प्रयत्न केला. चिडलेल्या चेन्नम्माने इंग्रजांशी युद्ध छेडले व अतुलनीय शौर्य दाखवले. युद्धात यश आले नसले तरी चेन्नम्माचे नाव इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले गेले आहे.
 
राणी लक्ष्मीबाई – १८५७च्या स्वातंत्र्यलढ्यात झाशीच्या राणी लक्ष्माबाई यांचं नाव कौतुकाने घेतलं जातं. लक्ष्मीबाईंच्या कार्याने केवळ इतिहासच रचला नाही, तर भारतीय स्त्रियांच्या मनात स्वातंत्र्य चळवळीबाबत ऊर्जा निर्माण केली. बालपणापासून कुस्ती, मल्लखांब, तलवारबाजी यात पारंगत असणाऱ्या लक्ष्मीबाईंनी वैधव्य आल्यानंतर राज्यकारभार आपल्या हातात घेतला. ब्रिटिशांनी झाशीचे राज्य आपल्या प्रशासनात जोडून घेण्याचा अनेक प्रकारे प्रयत्न केला. परंतु, लक्ष्मीबाईंनी माझी झाशी देणार नाही अशी गर्जना करीत इंग्रजांविरोधात तीव्र संघर्ष केला. तात्या टोपे यांच्या नेतृत्वात सुमारे २०००० सैनिकांशी लढा दिला. निकराच्या या लढाईत लक्ष्मीबाईंना वीरमरण आले.
 
झलकारी बाई – लक्ष्मीबाईंची सावली असं जिला म्हटलं जातं ती पराक्रमी झलकारीबाई. राणी लक्ष्मीबाईंनी इंग्रजांविरोधात युद्ध पुकारल्यानंतर त्यांना झलकारीबाईला आपल्या सैन्यात सामावून घेतलं. आपल्या चेहऱ्याशी तिचे असलेले साम्य आणि झलकारीबाईचे सैनिकी घराणे व प्रशिक्षण याचा उपयोग आव्हानात्मक वेळी होऊ शकतो याची लक्ष्मीबाईंना कल्पना होती. त्यांनी तिला तोफ चालवणे, हत्यारं चालवणे याचं विशेष प्रशिक्षणही दिलं. फुटीर सरदारामुळे लक्ष्मीबाईना एकदा मैदान सोडून जावे लागले, तेव्हा इंग्रजांना लक्ष्मीबाई असल्याचे भासवत झुलवत ठेवण्याचं काम झलकारीबाईने केलं. आपण लक्ष्मीबाई असल्याचं सांगत इंग्रजांपुढे आत्मसमर्पण केलं. इंग्रजांना सत्य कळेपर्यंत राणी लक्ष्मीबाई सुरक्षित स्थळी पोहोचल्या होत्या.
 
या सर्व रणरागिणींप्रमाणेच मोहम्मद बिन कासीमला तोंड देणाऱ्या सातव्या शतकातील राजा दाहीरच्या मुली सूर्यादेवी-प्रेमलादेवी, शीलरक्षणासाठी जोहर करणाऱ्या चितोडची राणी पद्मावती/पद्मिनी, मराठा घराण्याचा पराक्रमाचा वारसा पुढे नेणारी छ. शिवाजी महाराजांची सून ताराराणी भोसले, रामगडची अवंतीबाई यादेखील पराक्रमी राण्या होत्या. स्त्री सबलीकरण, स्त्रीवाद, स्वसंरक्षण या सगळ्या संदर्भात या पराक्रमी महिलांचा इतिहास डोळ्यासमोर ठेवण्याचं आणि हा वारसा पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याची आवश्यकता आहे.
 
- मृदाला राजवाडे