हरियाना खाद्ययात्रा

युवा विवेक    08-Sep-2022
Total Views |

hariyana khadyayatra
 
हरियाणा खाद्ययात्रा - २
आज आपण हरियाणात रोटीसोबत कोणत्या भाज्या, रायते किंवा चटण्या खातात ते पाहू या. पराठा असेल तर लोणी, तूप, चटणी असं काहीही सोबत चालते पण साधी रोटी असेल तर भाजी हवीच. हरियाणात मुख्य व्यवसाय शेती आहे. सकाळी-सकाळी शेतकरी शेतावर कामासाठी जातात, तिकडे थंडीही खूप असते. शेतातील कामे आणि थंडी यासाठी ऊर्जा खूप लागते म्हणून तिकडच्या जेवणात तूप, लोणी, दूध, पनीर यांचा वापर खूप असतो. महाभारताचे युद्धही तिथल्या कुरुक्षेत्रावर झाले. हाय कॅलरी जेवणाला जुनी परंपरा याचमुळे असावी. पण आपण उगाच तसे प्रयोग आपल्या साध्या लाइफस्टाइलमध्ये करू नयेत!
कचरी की चटणी हा एक वेगळा पदार्थ आहे. माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्रात कचरीला शेरनी किंवा शेंदडया म्हणतात आणि इंग्लिशमध्ये bitter cucumber. या कचरीला शिजवून त्यात लाल तिखट, लसूण, मीठ टाकून बारीक वाटले जाते. ही चटणी पराठ्यांसोबत खाल्ली जाते. याची भाजीही करतात. रोजच्या जेवणातही टिंडी घी म्हणून पांढरे लोणी खातात. ब्रेकफास्टपासून ते डिनरपर्यंत दुधाचा एक पदार्थ तरी जवळपास प्रत्येकाच्या जेवणात असतो. हे सगळे हेवी जेवण पचवण्यासाठी तिकडचे लोक कुस्ती खेळतात की कुस्ती खेळतात म्हणून इतके हेवी जेवतात हा एक प्रश्नच आहे. गवारीच्या शेंगांची भाजी आवडीने खाल्ली जाते. ही  भाजी आणि बाजरीची भाकरी आपल्या मराठी गावातही आवडीचे जेवण आहे. सरसोका साग आणि मक्केकी रोटी जितकी पंजाबची आहे तितकीच हरियाणाचीही. हरियाणा आधी पंजाबचाच भाग होते ना. सरसोका साग पाहिले ना की मला आपल्या पातळभाजीची आणि वऱ्हाडात करतात त्या मिरचीच्या भाजीची आठवण येते. सरसोका साग आपल्याला थोडे उग्र वाटू शकते पण हरियानाच्या लोकांचा (बॉलिवूडच्या लोकांचाही) जीव की प्राण.
बाथुआ म्हणजेच चाकवत भाजीही इथे आवडीने खातात. बथुआचे पराठे, रायता आणि भाजीही करतात. रायता बनवण्यासाठी पाने गरम पाण्यात अर्धा मिनिट बुडवून थंड पाण्यात ठेवावी, ब्लांच करावी. ही पाने, दही, जिरे, थोडे तिखट, मिरेपूड आणि मीठ मिक्सरमध्ये बारीक करावे की रायते तयार! आपण असेच रायते बाकी पालेभाज्यांचे करून पाहायला हरकत नाही. गाजर आणि मेथीची कोरडी भाजीही बनवली जाते. मिक्स दाल म्हणजे आपण मिसळीचे वरण करतो तसं. भाज्या सगळ्या सारख्याच पण आपल्याला मोहरीच्या तेलाची फोडणी असल्याने एकदम वेगळ्या चवीच्या वाटू शकतात. हो तीच ती दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे सिनेमातील मोहरीची पिवळी शेती! गोड पदार्थांमध्ये चुरमा, खीर, मालपुवा, रबडी हे पदार्थ असतात. लस्सी तर हवीच! तिकडे भात, बुरा साखर आणि तूप एकत्र करून खातात, हेही एक वेगळे. मिश्री आणि लोणी एकत्र करून रोटीसोबत किंवा नुसते खातात. खरं सांगू, याव्यतिरिक्त हरियाणामधील खाद्यपदार्थांविषयी जास्त माहिती मिळाली नाही. तिकडे प्रत्यक्ष गेल्यावर समजू शकते.
महाभारताचे युद्ध याच हरियाणवी भूमीवर घडले. इथल्याच कुरुक्षेत्रावर श्रीकृष्णाने भगवदगीता सांगितली. इतकेच नव्हे तर अगदी अलीकडच्या काळात तिथल्या पानिपतमध्ये लढाया झाल्या. ही हरियाणवी भूमी आणि तिथली माणसे प्रचंड कणखर आहेत त्याचसोबत वेळप्रसंगी मनमिळाऊ आहेत. बहुतांश हरियाणा शांतपणे जगणारा आहे. मुलींच्या बाबतीत असलेला द्वेष आणि साक्षरता हे दोन मोठे प्रॉब्लेम्स कमी झाले तर हा हे राज्य नावाप्रमाणेच हरी (देव), आयन (घर), हरियाणा म्हणून अभिमानाने ओळखले जाईल!