काय सांगता, रात्रभर डोळ्याला डोळा लागत नाही?

युवा विवेक    09-Sep-2022
Total Views |

ratri dolyala dola lagat nahi?
 
काय सांगता, रात्रभर डोळ्याला डोळा नाही?
 
 
रात्रभर डोळ्याला डोळा नाही गं बाई, हा असा डायलॉग तुम्ही तुमच्या आजीकडून कधीतरी ऐकला असेल. वयामुळे झोप कमी होणं साहजिक आहे. पण त्यांच्यासारखं तुमचंही होतंय का? डोळ्याला डोळा लागत नाही का? सांगा बरं, तुम्ही रील्स पाहात रात्री जागताय का? मित्रांशी चॅटिंग करताय का? रात्रभर वेबसीरीज बिंजवॉच करताय का? स्क्रीन पाहात पाहातच डोळे मिटताय का? गेले काही दिवस रोजची वेळ उलटून गेली तरी डोळ्याला डोळा लागत नाहीये असं वाटतंय का? हे जर घडत असेल तर सावधान! वेळीच सावध व्हा.
 
 
गेल्या काही वर्षांत, विशेषतः मोबाईलमध्ये इंटरनेटचा शिरकाव झाल्यापासून आपली रात्रीची झोप डिस्टर्ब झाली आहे. रात्रभर मेसेजिंग, चॅटिंग करणं, ओटीटीवर सिनेमे पाहणं, वेबसीरीज बिंज वॉच करणं, रात्रभर जागून मॅचेस पाहणं, सोशल मिडियावरील बारीकसारीक घडामोडी पाहात राहणं हे असले प्रकार प्रचंड वाढले आहेत. पण या सगळ्यामुळे झोपेच्या नैसर्गिक वेळापत्रकाचे पार तीन तेरा वाजले असून त्यांचा सगळा परिणाम आपल्या एकूणच दिनचर्येवर, ऊर्जेवर, उत्साहावर झालेला दिसून येतो. यात किशोरवयीन मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सगळ्यांचाच समावेश असतो. पण सर्वाधिक प्रमाण तरुणांचं असल्याचं दिसून येतं. रात्री दोन दोन वाजेपर्यंत जागत राहणं अक्षरशः अनेकांचं रूटीन झालं आहे.
 
 
झोपेचं आपल्या आयुष्यात महत्त्वाचं स्थान आहे. आहार निद्रा या माणसाच्याच नव्हे तर प्राण्याच्याही बेसिक गरजा आहेत. साधारणतः दिवसाला सहा ते आठ तास झोप अत्यावश्यक असते. हे प्रमाण व्यक्तीप्रमाणे बदलू शकतं, पण साधारण सात तास झोप ही मिळणं गरजेचं असतं. ज्याप्रमाणे योग्य आहार आणि व्यायाम याची शरिराला आवश्यकता असते तशीच ती झोपेचीही असते. पुरेशा प्रमाणात झोप मिळाल्याने शरिराला अनेक फायदे होतात. मुळात रात्रीची झोप झालेली असली की दिवसाची सुरुवात अत्यंत प्रसन्न आणि उत्साहपूर्ण होते. दिवसभर काम करण्याचा उत्साह टिकून राहातो. ओव्हरऑल दिवस चांगला जातो
 असं म्हणा ना!
 
 
पण झोपेचं हे आख्यान एवढ्या फायद्यांवर संपत नाही हं. झोपेमुळे होणारे फायदे विज्ञानानेही मान्य केले आहेत. आयुर्वेदानेही हजारो वर्षांपूर्वी त्यावर प्रकाश टाकला आहे. योग्य झोपेमुळे मेंदूचं कार्य व्यवस्थित सुरू राहातं, त्याची कार्यक्षमता वाढते. आपल्या मेंदूतून अनेक प्रकारची संप्रेरकं स्रवत असतात. झोप अपुरी असेल तर या संप्रेरकं स्रवण्यावर आणि त्यांच्या जैविक उपयोगांवर परिणाम होतो. आपली भूक, हृदयाचं नियमन, किडनी-लिव्हरचं नियमन, मानसिक स्वास्थ्य या साऱ्याचा थेट संबंध झोपेशी आहे. आपली शारिरीक ऊर्जा वाचवण्याचं किंवा शरिराला आराम देण्याचं कार्यही झोपेमार्फत होतं. पचन क्रिया, पेशींची दुरुस्ती, स्नायूंची वाढ अशी विविध कार्य झोपेच्या काळात होत असतात. मानवाच्या मानसिक अस्वस्थतेला आराम देण्याचं, मेंदूला चार्ज करण्याचं कार्यही झोपेतच होत असतं. बघा ना, एखादा छोटासा चुटका काढला तरी आपल्याला किती टवटवीत वाटतं. अभ्यासात, कामात लक्ष लागतं. पुढचा सगळा दिवस छान जातो.
 
 
झोपेवर परिणाम झाला तर शारिरीक तक्रारींना तोंड द्यावं लागतं. छातीत जळजळ होणं, पित्त होणं, अन्नपचन नीट न होणं, त्यामुळे वरचेवर पोट बिघडणं, शौचाची भावना नीट न होणं, डोळ्यावर दिवसभर पेंग येणं, कामाचा कंटाळा येणं, वेळेवर भूक न लागणं, संप्रेरके डिस्टर्ब झाल्याने शारिरीक कुरबुरी सतावणं, मानसिक स्वास्थ्यावर परिणाम होणं, नैराश्य येणं, अकाली प्रौढ दिसू लागणं, केस-त्वचा-डोळे यावर परिणाम होणं असे प्रकार सुरू होतात. यामुळे दीर्घकालीन मानसिक तसंच शारिरीक विकार उद्भवू शकतात. सुरुवातीला केवळ झोपेची वेळ बदलल्याचं दिसत असलं, तरी याची परिणिती निद्रानाशाच्या विकारामध्ये होऊ शकते.
 
 
योग्य आणि सकस अन्न घेणं, तेलकट मसालेदार पदार्थ वरचेवर खाणं टाळणं, कामाच्या वेळा पाळणं, मानसिक स्वास्थ्य सांभाळणं, सकारात्मक विचार करणं, किमान अर्धा ते पाऊण तास कोणताही व्यायाम करणं, कुटुंबियांशी सुसंवाद साधणं, वाद उकरून न काढणं, दिवसभरातील ताण-वाद झोपण्यापूर्वी विसरून जाण्याचा किंवा बाजूला ठेवण्याचा प्रयत्न करणं, मेंदूवर आवश्यकतेपेक्षा अधिक ताण न देणं, रोजच्या ठरलेल्या वेळी बिछान्यावर आडवे होणं, झोपेची वेळ न बदलणं, झोपण्यापूर्वी एक तास कोणतीही स्क्रीन न पाहाणं, तसंच शक्यतो हिंसात्मक व मानवी मनावर परिणाम करणारा कंटेंट पाहणं टाळणं, सकारात्मक विचार देतील असा कंटेंट वाचणं, झोप येत नसल्यास दीर्घश्वसन-प्राणायाम करणं हे सारं चांगल्या झोपेसाठी आवश्यक असतं. झोप अधेमधे तुटत असेल किंवा शांत झोप येत नसेल, झोपेत जीव घाबराघुबरा होत असेल तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणंही आवश्यक आहे. स्वप्न पडत असतील, भास होत असतील तर त्यासाठीही वेळीच उपाययोजना करणं आवश्यक आहे.
आजच्या घडीला झोपेतील सर्वात मोठा अडथळा आहे तो म्हणजे मोबाईल. चॅटिंग, बिंज वॉचिंग, इन्स्टा स्टेटस अपडेट करण्यापेक्षा आपली हक्काची झोप अधिक महत्त्वाची आहे. तिच्यावर परिणाम होऊ देऊ नका. नैराश्य हा आगामी काळात एक मोठा प्रश्न म्हणून जगासमोर उद्भवण्याची शक्यता आहे, त्याची चाहूल लागलेलीच आहे. त्यातला मोठा फॅक्टर आहे अपुरी झोप, पोषणविरहित अन्न आणि ताण. हीच वेळ आहे जागृत होण्याची. झोपेला टाळण्याऐवजी तिचं महत्त्व समजून घेऊया. काय म्हणता?
- मृदुला राजवाडे