भैरवी

युवा विवेक    17-Jan-2023
Total Views |

भैरवी
कातरवेळ एकीकडे जीव पोखरत असताना, मनाची नाव प्रचंड हेलकावे घेत असताना, स्वप्न वास्तवाच्या काठावर बसून तोल सावरत आसताना.. अस्ताला जाता जाता दिनमणी सांजेवर जांभळी माया पांघरवत असताना... बऱ्याचशा द्विधा मनस्थितीत मी चालत राहते चिंचोळी पाऊलवाट..
पाऊल वाटेवर पानगळ आपले अस्तित्व दाखवू पाहत होती. पायाखाली येणारी पिवळट, मातकट जराशी ओल अजूनही अंगी बाळगून असलेली पिवळ्या देठांची पानं येत होती.. किती चुकवू पाहत होते माझे पाय त्यांना पण नई... त्यांनाही जणू माझेच पाय हवे आहेत चिरडून घेण्यासाठी असं वाटून जातं ; त्यानंतर मनाने जडत्वाची शाल हलकेच अंगावर घेऊन शरीर मात्र हलकंफुलकं केलेलं.. नजाणो कुठली मनो अवस्था
तारुण्याची संध्याकाळ जाणवावी.. की भ्रम असेल हा एल - पैल पार केल्याचा
आयुष्य जणू भैरवी होऊ पाहतंय..
भैरवीचा पूर्वार्ध नई का करुणा किंवा शोकरसाचं प्रतिनिधित्व करतं.. पण पूर्वार्ध नि उत्तरार्ध एकत्र आल्यावर उल्हासाचा जन्म होतो
भैरवितल्या ' रे, ग ध,नी ' ने, जी कमाल केलीय ती कोमलता
अगदी तशीच काहीशी फेज मन अनुभवत असताना ..
मी नि माझ्यातल्या एकानेक वादळानी स्वतःला कधीच तुझ्या हवाली केलेलं आणि नेमकी तू गायला घेतलेली असते भैरवी, तेव्हा माझ्यातल्या कणाकणाला स्थैर्य, शांतता नि संपूर्णता बहाल करत जातात की अस्वस्थता वाढवत नेतात, तुझे भैरवीचे स्वर... कुणास ठाऊक!
हिरवा गर्द मनाचा कोपरा क्रमाक्रमाने करडा, तपकिरी, निळसर नि जांभळा सुद्धा होऊन क्षणाक्षणाला रंग बदलत जातो.. तेव्हा अगदी तेव्हाच मन मागणं मागत असतं.. या अफाट निसर्गाकडे
जगण्याचे पसायदान व्हावे...
"आता विश्वातमके देवें.. येणे वाग्यज्ञे तोषावे "
"तोषोनि मज द्यावे.. पसायदान हे"
माझ्यात हल्ली भैरवी निनादत असते हे मात्र पक्के समजले आहे मला!
- अमिता पेठे-पैठणकर