क्रिटिकल थिंकिंग – जडणघडणीतील महत्त्वाचा पैलू

युवा विवेक    20-Jan-2023
Total Views |

क्रिटिकल थिंकिंग – जडणघडणीतील महत्त्वाचा पैलू
कसला विचार करतोयस रामय्या? तुमच्यापैकी कोणाकोणाला आकाशवाणीवरची ही जाहिरात आठवते? ८०-९०च्या दशकातील लोकांना तर नक्कीच आठवत असेल. किती वेळा ही विचार करण्याची कृती आपण करत असतो. कधी वरवरचा विचार तर कधी अगदी सखोल विचार करतो आपण. त्या त्या विषयावर, गरजेवर आणि वेळावर ते अवलंबून असतं. सध्या क्रिटिकल थिंकिंग किंवा चिकित्सक विचारप्रणाली याला फार महत्त्व आलं आहे. आपल्या अनेक स्कील्सपैकी हे एक महत्त्वाचं स्कील किंवा कौशल्य मानलं जातं.
सध्याचा जमाना स्मार्ट वर्कचा आहे. तुम्ही किती वेळ काम करता, किती मेहनतीने करता यापेक्षा ते किती स्मार्टली करता यावर हल्ली तुमच्या कामाचं मूल्यमापन केलं जातं. त्यातच तुमची विचार करण्याची पद्धतही कशी आहे याचाही विचार केला जातो. केवळ कार्यालयात काम करतानाच नव्हे तर विद्यार्थीजीवनात अभ्यास करताना किंवा विविध गोष्टीचं व्यवस्थापन करतानाही तुम्हाला क्रिटिकल थिंकिंगचा उपयोग होऊ शकतो. पण हे क्रिटिकल थिंकिंग किंवा चिकित्सक विचारप्रणाली आहे तरी काय ते आधी पाहू या.
आपल्यापैकी प्रत्येकाला वाटत असतं, की आपण एखाद्या बाबीचा किंवा विषयाचा सखोल विचार करतो आहोत. पण खरं तर अनेकदा आपण सखोल वा चिकित्सक नव्हे तर आपल्या उपलब्ध वेळेनुसार, आपल्या सोयीचा ठरेल असा आणि तातडीने उत्तर मिळवून देणारा विचार करत असतो. अभ्यासासाठी वापरली जाणारी पद्धत दैनंदिन आयुष्यातील गोष्टींसाठी वापरणं तितकसं योग्य नाही. त्यासाठी क्रिटिकल थिंकिंगचा आधार घ्यावा लागतो. मग त्या कामातील समस्या असोत वा कार्यालयीन आव्हानं असोत. कम्प्लिट प्रेझेन्स ऑफ माईंड किंवा मेंदूच्या पूर्ण क्षमतेचा वापर करून तर्काचा आधार घेत, लॉजिकल पद्धतीने विचार केला जातो. घाईघाईने निष्कर्ष काढण्याऐवजी थोडं थांबून तार्किकपणे विचार करून निर्णय घेतला जातो.
अनेकदा कंपन्यांमध्ये अपेक्षित असणाऱ्या क्रिएटिव्हिटीला मूर्त रूप देण्यात क्रिटिकल थिंकिंगचा मोठा वाटा असतो. आज कल्पकतेने विषय मांडण्याला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. त्यात क्रिटिकल थिंकिंगला महत्त्वाचं स्थान आहे. क्रिटिकल थिंकिंग किंवा चिकित्सकपण विचार करण्याच्या वृत्तीमुळे प्रॉब्लेम सॉल्विंग किंवा समस्यांचं निराकरण आणि निर्णय घेण्याची वृत्ती यात गुणवत्ता दिसून येते. एखाद्या निर्णयाचा काय परिणाम होईल याचा विचार करून त्या निर्णयाप्रत माणूस येऊ शकतो.
विद्यार्थीजीवनात क्रिटिकल थिंकिंगला विशेष महत्त्व आहे. विद्यार्थीदशेतच विचारांचा परिणाम आपल्या व्यक्तिमत्त्वावर दिसून येतो. योग्य सल्ल्याने ठराविक व आवश्यक पुस्तकाचं वाचन, स्वतःची अभ्यासाची पद्धत डिझाईन करणं, पेपर लिहिण्याची स्वतःची पद्धत तयार करणं या सगळ्याचा परिणाम तुमच्या निकालांवर नक्कीच दिसून येईल. आज शिक्षणात ऑनलाईन पद्धतीचाही अवलंब केला जातो. त्यातही क्रिएटीव्हीटीचा अंतर्भाव करणं, आपले प्रकल्प स्वतःहून कल्पकतेने तयार करणं, ते मुद्देसूदपणे मांडण्याचं कौशल्य विकसित करणं यासाठी आपल्याला याच चिकित्सक विचारप्रणालीची मदत होते. अर्थातच या सगळ्याचा प्रभाव नोकरीच्या ठिकाणी मुलाखतींमध्ये निवड होण्यावर, नव्या माणसांसोबत आत्मविश्वासाने चर्चा करण्यावर, व्यक्तिमत्त्वाला योग्य आकार येण्यावर, प्रेझेंटेशन उठावदार होण्यावर दिसून येतो. या क्रिटिकल थिंकिंगसाठी आपल्याकडे काही गुण असणं अत्यावश्यक आहे. त्यातला पहिला गुण म्हणजे मुक्त विचार करण्याची क्षमता. एखाद्या विषयावर सांगोपांग विचार करायचा असेल तर तो मुक्तपणे करणं आवश्यक असतं. त्या विषयाची दुसरी बाजू समजून घेणंही तितकंच गरजेचं. त्याबाबतीत स्वतःला लवचिक ठेवावं लागतं. एकाच भूमिकेत अडकून चालत नाही. शंका घेण्याची वृत्ती एरवी त्रासाची असली तरी क्रिटिकल थिंकिंगमध्ये शंका घेण्यामुळेच दुसरी बाजू समोर येत असते. विचारांची स्पष्टता आणि नेमकेपणा हे देखील मुद्दे तितकेच महत्त्वाचे आहेत. योग्य मुद्द्यांवर नेमक्या पद्धतीने वाद घालण्याची क्षमतादेखील क्रिटिकल थिंकर्सकडे असते.
क्रिटिकल थिंकिंगने काय साध्य होतं? दोन ओळींच्या मधल्या जागेतील छुप्या अर्थाचं आकलन, कल्पनाआणि वादविवादातील विचारांची मांडणी यांचं आकलन, प्रश्न सोडवण्याची कला साधते, स्वतःचे मुद्दे-मूल्य-आकलन स्पष्टपणे मांडण्याची सवय लागते, मुद्दा किती महत्त्वाचा आहे याची ओळख पटकन होते, एखाद्या विषयातील गुंतागुंत पटकन लक्षात येते, ज्याला सॉफ्ट स्किल्स म्हटलं जातं अशा कौशल्यांतील पहिल्या पाचात क्रिटिकल थिंकिंगचा समावेश होतो. काही कार्यक्षेत्रांमध्ये क्रिटिकल थिंकिंग किंवा चिकित्सक विचारप्रणालीची आवश्यकता आवर्जून असते. राजकारणी, न्यायाधीश, वकिल, वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर, संशोधक, वैद्यकीय संशोधक, क्लिनिकल काऊन्सेलर, पुरातत्त्वशास्त्रज्ञ, पॅरामेडिकल, लेखक, संपादक, पत्रकार, फॉरेन्सिक शास्त्रज्ञ..... खरं तर ही यादी फार मोठी आहे. पण जवळपास सर्वच सर्वांगीण विचारांची आवश्यकता असणाऱ्या कार्यक्षेत्रांत क्रिटिकल थिंकिंग या सॉफ्ट स्किलची आवश्यकता असते. सध्याच्या काळात मार्केटिंग आणि एचआर क्षेत्रातही या कौशल्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
मित्रांनो, कोणतंही कौशल्य कधीच वाया जात नाही. क्रिटिकल थिंकिंग हे तुम्ही शालेय किंवा महाविद्यालयीन काळात आत्मसात करायला सुरुवात केलीत तर त्याचा उपयोग नक्कीच तुम्हाला नोकरीच्या ठिकाणी, सार्वजनिक जीवनात होईल. तुमच्याकडे त्यासाठी अनेक संधीही उपलब्ध आहेत. वादविवाद स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, स्फुटलेखन स्पर्धा अशा विविध स्पर्धांच्या निमित्ताने तुम्ही हे कौशल्य आत्मसात करू शकता. दररोज एक मराठी व एक इंग्रजी वर्तमानपत्र वाचल्यानेही घटनेचे वेगवेगळे पैलू, त्याच्या फॉलोअप स्टोरीज याच्या अभ्यासाने, घटनेचे पडसाद सोशल मीडियात कसे उमटतात याच्या आकलनाचाही याला आधार मिळू शकतो. फक्त त्यावर पूर्ण अवलंबून राहाता येणार नाही. काय मग, करणार ना सुरुवात? रामय्यासारखा नुसता विचार नको, चिकित्सक विचार करूया.
 मृदुला राजवाडे