अदमास

युवा विवेक    24-Jan-2023
Total Views |


आदमास
खिडकीतून डोकावू पाहणारे सोनकेशरी अंधार कवडसे..
तिथूनच वरती चढलेली सायलीची वेल ..
नि दिवसभराच्या सोसल्या उन्हाने मलूल होत जाणारी तिची इवली फुलं..
गळणार की तिथेच देठांशी जोडले राहून सुकणार..
या द्वंद्वात अडकलेली असताना..
माझ्या मात्र हातात ...
वाफाळत्या कॉफीचा मग..
दृष्टी शून्यात स्थिरावलेली ,
आणि,
तू असूनही नसल्या सारखा किंवा नसूनही असल्यासारखा
कॉफीच्या घोटाबरोबर...
मला आठवायचे आसतात,
तुझ्यामाझ्यातले ते सारे मौन संवाद
किंवा चिमटीत पकडायचे असतात मला ते सारे क्षण..
ती सारी ठिकाणं
जिथे आपण भेटायचो,
बोलायचो,
हसायचो,
टाळ्याही द्यायचो कित्येकदा
घालायचो कितीतरी वाद - प्रतिवाद..
एवढीशी चिमट नि माझा मात्र त्यात साऱ्या जगाला पकडण्याचा हट्ट..
हातातला मग एव्हाना गार होऊन
माझी मात्र तंद्री लागलेली असते..
कॉफी वर जमा झालेल्या सायीवर..
साय तरंगत असते कॉफीवर..
माझ्या अधांतर जगण्यासारखी..
सुरकुतल्या सारखीही होते
मी फुंकरेने तिला बाजूला सारून पहिला सिप घेते..
तो घेताना डोळे मात्र आपसूक मिटले जातात..
तुझ्या-माझ्या मौनाचा मलमली प्रवास झर्रकन सरकून जातो पुढ्यातून..
आणि मी मात्र घोट घेत राहते कॉफीसोबत आठवांचे..
घोट घशाखाली उतरतात न उतरतात तोच
बॅग्राउंडला साहिरची..
'हर तरह के जज़्बात का एलान है आँखे '
अदमास असतो का तो.. मी घेतलेला ?
तुझ्या चाहूलीचा ?
तुझ्या माझ्यातल्या असल्या नसल्या ओढीचा ?
की बेदरकारपणे क्षणभरात संपवलेल्या आपल्यातल्या संवादाचा ?
होय आदमासच असतो तो
पण नेमका कशाचा ?
अमिता पेठे पैठणकर