बॉलीवूडची लगीनघाई.... !

युवा विवेक    30-Jan-2023
Total Views |

बॉलीवूडची लगीनघाई.... !
आजकाल लग्नसोहळ्यांचा हंगाम सुरू झाला की फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप सगळीकडे रिल्स, स्टेटस्, स्टोरीज, पोस्ट्स मधून त्याचे प्रतिबिंब दिसत राहते.
आधुनिक काळात सोशल मीडिया विस्तारल्यामुळे निमंत्रण पत्रिका सुध्दा छापील न राहता फिल्मी गाण्यांच्या सह साग्रसंगीत इनबॉक्समध्ये येऊन धडकते.
भारतीयांचं सिनेमाप्रेम सर्वश्रुत आहे. त्याहूनही अफाट प्रेम कशावर असेल तर ती म्हणजे सिनेमातली गाणी !
एरवी लोकलला लटकून दररोज नोकरीला जाणाऱ्या चाकरमान्याला किंवा दिवसभर आपल्या दुकानाच्या गल्ल्यावर बसुन घर चालवणाऱ्या व्यापाऱ्याला सुद्धा आयुष्यात एकदा तरी हिरो बनायचा स्वप्न पडलेलं असत.
त्यांच्या सुदैवाने म्हणा अथवा दुर्दैवाने ही संधी मिळते ती केवळ स्वतःच्या लग्नातच !
एरव्ही पाच - पन्नास जण आपल्याकडे वळून पाहत आहेत किंवा कोणी खास आपल्यासाठी म्हणून कॅमेरा धरून शूटिंग करतोय असे प्रसंग आपल्या आयुष्यात तसे कमीच येतात. त्यामुळे हिरो बनण्याची ही कमतरता भरून निघते लग्नाच्या व्हिडीओमध्ये.!!!
गेल्या काही वर्षात प्री वेडिंग शुट ही संकल्पना लहान शहरातदेखील लोकप्रिय होत आहे. लग्नाआधीच एखाद्या नयनरम्य ठिकाणी गाजलेली हिंदी - मराठी गाणी किंवा मराठी टिव्ही मालिकांच्या शीर्षक गीतांवर आधारित विवाहेच्छुक वधू - वरांचा व्हिडिओ शुट करून यु ट्यूबवर किंवा मंडपातच मोठ्या स्क्रीनवर तो वऱ्हाडी मंडळींसमोर प्रदर्शित करणे हा ट्रेंड सुध्दा लोकप्रिय होत आहे.
लग्नसोहळ्यातली आणि व्हिडिओमधील फिल्मी गाणी हा स्वतंत्र संशोधनाचा विषय आहे.
वधू-वर मंडपात आल्यानंतर 'बहारो फुल बरसाओ' हे गाणं बँडवाले आदिम काळापासून वाजवत आले आहेत. अद्याप त्या तोडीची रिप्लेसमेंट मिळालेली नाही. काहीजण ते इतक्या भेसूर चालीत वाजवतात की सगळा मंडप उभा राहून श्रद्धांजली देईल अस वाटत.
एकाच्या लग्नात 'अझीमोशान शहनशाह" वाजल होत (अकबराच्या बऱ्याचशा बेगमांची नावे आठवल्याने नेमकं नवरदेवाला काय सुचवायचं होत हा प्रश्न पडला.)
मध्यंतरी 'मेरा सैय्या सुपरस्टार' गाण्यावर वधूने नाचत नियोजित विवाहस्थळी यायचा ट्रेंड तयार झाल्याच ऐकण्यात आलंय.
वरातीत नाचणाऱ्यांकरिता 'आज मेरे यारकी शादी है" हे आजही 'मस्त आणि मस्ट' बजाव गाणं आहे. बाकी नंतर 'नागीण, कोंबडी, पोपट, चिमणी...' कोणत्याही प्राण्याचं गाणं लावलं तरी वऱ्हाडी केवळ नागीण डान्समध्येच सर्व प्राणी बसवतात हा आजवरचा अनुभव आहे.
'लग्न' ह्या प्रकाराची सिनेमाशी मोठ्या प्रमाणावर सांगड घालण्याच श्रेय सूरज बडजात्या ह्या महाशयांना जात. त्यांनी एकदा तर सिनेमाच्या नावाखाली 'हम आपके है कौन' ही लग्नाची व्हिडिओ कॅसेट प्रदर्शित केली होती. नवरदेवाचे बूट पळवण्याची आणि त्याबदल्यात पैसे घेण्याची महाराष्ट्रात कधिही न ऐकलेली परंपरा त्यांनी इथे सुरू करून अनेक मराठी नवरदेवांच्या झालेल्या आर्थिक नुकसानीचा तळतळाट घेतला. ('प्रेमरतन धन पायो' आपटण्यामागे हेच कारण असावे)
बाजीराव - मस्तानी सुपरहिट झाल्यानंतर उत्तर भारतीयांच्या लग्नात पण उखाणे घेण्याची प्रथा मुळ धरू लागली होती.
"छोटे छोटे भाईयो के बडे भैय्या" किंवा "हमारी शादीमे अभि बाकी है हफ्ते चार" वैगेरे गाणी अनेकांच्या व्हिडीओ कॅसेटमध्ये ठाण मांडून आहेत. (स्वतःला सलमान/ शाहिद समझुन लग्नाच्या भानगडीत पडलेले अनेक सिंगुले नंतर ती कॅसेट रिव्हाइण्ड करून पाहत पश्चाताप करतात असाही अनुभव आहे.)
लग्नाच्या संगीत वैगेरे कार्यक्रमात म्हाताऱ्याकोताऱ्यांसाठी "ए मेरी जोहरजबी" वर नाचण्याचा ट्रेंड करण्याच श्रेय स्वर्गीय यश चोप्राना जात. रिप्लेसमेंट न गवसलेल्या गाण्यापैकी हे एक...!!
'दुल्हनकी बिदाई' नावाचा जो दर्दभरा प्रकार आहे त्यासाठी इतकी वर्षे "बाबूलकी दुवाए लेती जा' हे राखीव गाणं होत पण गेल्या काही वर्षात त्याजागी "दुल्हेका सहरा" ऐकू येतंय.
व्हिडीओ बनवणारा फारच रसिक असेल तर "पापा मै छोटी थी बडी हो गई क्यू" किंवा "हाथ सिताका रामको दिया, जनकराजा देंगे और क्या" सारखी गाणी फ्लॉप सिनेमांच्या ढिगाऱ्यातून पण गवसून काढतो.
अस हे विवाहपुराण फार मोठं आहे. व्हिडिओत विहिणबाईंना उद्देशून "गाने बैठे गाना सामने समधन है' ह्या गाण्याच्या ऐवजी "मै तेरी दुष्मन" गाणं चुकून टाकलं गेलं तर झालेली लग्न मोडायच्या मार्गावर येतात असही काही सूत्रांनी सांगितले आहे.
ह्यातला गंमतीचा भाग वगळला तरी एकंदरच लग्न समारंभाला येत असलेल्या फिल्मी स्वरूपाला नाके मुरडणारी पारंपरिक विचारांची मंडळी पण आहेत. विवाह हा एक धार्मिक संस्कार असून त्याचे गांभीर्य आणि पावित्र्य लक्षात घेऊन थिल्लरपणा करू नये असे मानणारा एक मोठ्ठा वर्ग आहे. प्रि वेडिंग शूटच्या नादात अनेक अपघात सुद्धा झाले आहे. दोन कुटुंब लग्नाच्या माध्यमातून एकत्र येत असल्याने त्या निमित्ताने दोन वेगळ्या आचार विचारांची माणसे सुद्धा जमतात त्यामुळे त्यांचे मानापमान सांभाळत विवाह सोहळा पार पाडणे ही वेगळ्या अर्थाने तारेवरची कसरत झाली आहे.
एकंदर ही बॉलिवूडची गाणी म्हणजे खऱ्या अर्थाने "शादीके लड्डूच" आहेत.
- सौरभ रत्नपारखी