भावना की संप्रेरकं ?

युवा विवेक    31-Jan-2023
Total Views |


भावना की संप्रेरकं ?
आर्थिक स्थैर्य,गुणवत्ता, बुद्धिमत्ता आणि कौटुंबिक सुखवस्तू सधनता असतानाही अतिरिक्त नात्याची गरज का भासावी ?
या मागे दडलेलं कारण नेमकं मनोवृत्तीत असतं ? आनंदाच्या अभावात आहे का ? की सेरोटोनीन आणि डोपामाइनचा खेळ आहे ?
कुणास ठाउक पण हे घडतंय हे खरंच
पारंपरिक धोक्याचं वळण तसं सोळा, सतरा ते बावीस पर्यंत समजत असलो तरी ते आता मधला बारा पंधरा वर्षांचा टप्पा ओलांडून झाल्यावर पस्तिशी ते चाळिशी बेचाळीशीही हे धोक्याचं वळण ठरु पाहतेय... पण का याचा मन धांडोळा घेत राहतं..
काही पटणारी काही न पटणारी मनाला उत्तरं मिळतातही पण त्यानं समाधान होत नाही.. काहितरी राहून गेलंय.. सुटलय नजरेतून असही वाटत राहतं
म्हणजे नई का.. सोला बरस की बाली उमर वगैरे...!
नवीन स्वप्न, त्यांची स्वप्नपूर्ती,धेय्य, धेय्यासक्ती या सगळ्याची सुरुवात होण्या आधी तिच्या शारीरिक ठेवणीत बेमालूम बदल होऊ लागलेले असताना किंवा त्याला नवीनच मिसरूड फुटत असताना.. हे सगळं मनात काहीही नसताना भिन्नलिंगी ओढ निर्माण होते.. नकळत, अजाणतेपणी मनात काहीतरी रुजत चाललेलं असताना वळणा वळणाच्या घाटातून मन मेंदू आणि देह जात असतो..
सोळा मधलं धोक्याच वळण हे समाजाने म्हणा किंवा मनाने मान्य केलेलच आहे पण काही प्रमाणात हवं ते स्थैर्य प्राप्त करून झाल्यानंतर हवंहवंस वाटणाऱ्या धोक्याच्या वाळणाला नेमकी कोणती कारणं द्यावीत अन कोणती परिमाणं लावावीत?
आर्थिक स्थैर्य आल्यावर आपसूकच कौटुंबिक स्थैर्य येतंच नि मागोमाग सामाजिक स्थैर्य...
सगळं कसं छान स्थिर स्थावर झालेलं असतं.. तरीही इथे ' पण' आडवा येतोच अगदी प्रत्येक व्यक्ती म्हणू शकत नाही आपण, पण तरीही बऱ्याच अंशी आयुष्यात अनामिक पोकळी असते.. कसली ते धड कळतही नसते अन् ती पोकळी भरूनही निघावी किंवा काहीतरी अपूर्ण आहे ते पूर्णत्वास जावं असही वाटत असावं ..
कधी कधी तो मनोवृत्तीचा भागही असतो.. हा मोठा गहन नि खोलात नेणारा विषय आहे..
प्रेम ही अशी आनंददायी भावना आहे की जी मेंदू मधील डोपामाईन आणि सेरोटोनिन ह्या दोन संप्रेरकांचं स्त्रवण्याचं प्रमाण वाढवतं..
आणि हीच दोन संप्रेरकं माणसाला फील गुड वाटायला मदत करतात. जणू फुलपाखरा सारखं हवेत तरंगत असल्याचे भास होत राहतात.
हेच ते प्रेम..!
सततच्या सहवासातील माणसाबरोबर असताना हीच संप्रेरके स्त्रवण्याचं प्रमाण कमी कमी होत जातं आणि त्याच बरोबर फील गुड आणि हवेत तरंगत राहण्यासारखे सतत आनंदी असण्यासारखे प्रमाण कमी कमी होत जाते.
म्हणून माणसं काही नवीन नाते संबंध किंवा नवीन काही शोधू पाहतायत का? स्वतःच किंवा इतरांच्या माध्यमातून हीच दोन संप्रेरकं वारंवार किंवा सातत्यानं स्त्रवावी ही सवय होऊ पाहतेय का ?
नेमकं काय खरं शोध घ्यायला हवाय ना !
अमिता पेठे पैठणकर