पबा आणि तंतुर

युवा लेख

युवा विवेक    13-Oct-2023   
Total Views |


पबा आणि तंतुर

तुम्ही कधी तांदळाची उकड किंवा गव्हाचा चीक खाल्ला आहे? नक्कीच खाल्ले असेल. गरमगरम कंफ़ोर्ट फूड या कॅटेगरीत मोडणारे हे दोन पदार्थ मला तरी सरळ आजीच्या घरी घेऊन जातात. उन्हाळ्यात कुरडया करण्याआधी आम्हाला गव्हाचा चीक तेल,तिखट मीठ किंवा दूध-साखर घालून खायला द्यायचे. मला चीक फार आवडायचा नाही पण वर्षातून एकदाच मिळतो आणि हाडे मजबूत होतात असे घरच्यांनी सांगितल्यावर मी खायचे. तांदळाची उकड मात्र देशावरच्या लोकांकडे कमीच बनते. कधीतरी उकडीचे मोदक केले तर उकड अशी असते हे समजते. हे सगळे आठवायचे कारण म्हणजे लडाखी लोक असाच एक पदार्थ बनवतात त्याचे नाव आहे पबा.

पबा बनवतात वेगवेगळ्या पिठापासून. सातू, बकव्हीट, बार्ली आणि कोरडे मटार/वाटाणे यांचे एकत्र पीठ बनवतात. पाण्यात मीठ टाकून याची उकड काढतात. यासाठी स्पेशल जर्दाळूच्या खोडापासून बनवलेला चमचा वापरतात. त्याला स्क्या म्हणतात. गव्हाचा चीक मिसळायला सुद्धा असाच मोठा लाकडी चमचा वापरायचे ना. मंद आचेवर सगळे पीठ शिजवल्यावर त्याला त्रिकोणी आकार देतात. पबा तयार! भाजलेले पीठ वापरले असल्याने पटकन वाफवून तयार होतो शिवाय त्याची चवही छान वेगळी असते.

पबा सोबत अजून एक पदार्थ खाल्ला जातो तो म्हणजे तंतुर म्हणतात. तंतुरही बनवायला अतिशय सोपे आहे. पाण्यात मोहरीची पाने ब्लांच करतात. (आता हि पाने आपल्या महाराष्ट्रात मिळणे थोडे कठीण आहे म्हणा.) ब्लांच केलेले मोहरीची पाने छान चिरून त्यात ताक मिसळतात. मोहरीचे तेल, लडाखी चाईव्ज, शहाजिरे यांची फोडणी या ताकावर देतात. इतके सोपे! पबा आणि तंतुर सोबत खाल्ले जाते. दुपारच्या जेवणाच्या वेळी मुख्यतः खाल्ला जाणारा हा पदार्थ. मोहरीची पाने नसतील तर इतर पालेभाज्याही वापरल्या जातात. झुणका, भाकरी आणि ताक याच्या तोडीचा हा पदार्थ! मराठी सिनेमात टोपलीत भाकरी, कांदा, झुणका आणि ताक ठेवून शेतकऱ्याची बायको दाखवतात. का कोण जाणे पण हा सिन लडाखमध्ये दिसला मला. लडाखी स्त्री टोपलीत पबा आणि तंतुर घेऊन पहाड चढत निघालेली माझ्या डोळ्यासमोर उभी राहिली. हा पदार्थही मला माहित नव्हताच पण भाजणीचे पीठ मिळते तसे हे पबा चे पीठ बाजारात मिळते का म्हणून मी इंटरनेटवर पहिले तर सगळीकडे शुकशुकाट! स्थानिक बाजारात मिळत असेल कदाचित. आपण असे मल्टिग्रेन पीठ दळून आणू शकतो आणि पबा बनवू शकतो. मोहरीच्या पानांऐवजी पालक-ताक बनवता येईल. नाहीच तर सरळ मठ्ठा बनवून त्यासोबत खायचे.

आता विचार केला तर लक्षात येईल कि किती पौष्टिक पदार्थ आहे हा. कार्ब्ज, प्रोटीन, फायबर, हिरव्या भाज्या, प्रोबायोटिक्स असं सगळंच आहे आणि शिवाय तेल किंवा तुपाचा भडीमार नाही. डायट फूडमध्ये सहज सामावून जाईल असा हा पदार्थ. आपण मायक्रो आणि मॅक्रो नुट्रीएंट्स यांचा हिशोबच करत बसतो पण पारंपरिक पदार्थ या सगळ्याचा आणि भौगोलिक परिस्थितीचा विचार करून बनवलेले असतात. इतक्या वर्षांपासून पिढ्यानपिढ्या हे पदार्थ खातात आणि त्यांची तब्येत ठणठणीत असते. आपण आपली जीवनशैली बदलायची सोडून आहार बदलतो आणि तरीही वेगवेगळ्या समस्यांना तोंड देतो.

भारतीय पदार्थ खरंच किती परिपूर्ण आहेत याची दरवेळी जाणीव होत असते. काहीकाही चुका जर आपल्या पूर्वजांनी केल्या असतील तर तितक्या चुका सुधारून पुढे जाणे आपण करावे. जुने पदार्थ सरसकट नाकारणे खरंच बरोबर नव्हे. पंजाबातल्या मक्के दि रोटी आणि सरसो के साग ला जितकी प्रसिद्धी मिळाली तितकीच या सोप्या आणि पौष्टिक जोडीला मिळावी हि माझी देवाकडे प्रार्थना आहे.

- सावनी