गावची उतारवयातली माणसं..!

युवा कथा

युवा विवेक    18-Oct-2023   
Total Views |

गावची उतारवयातली माणसं..!

हिवाचे दिस सरले अन् भर दुपारच्या कडक उन्हात गावात फेरफटका मारतांना गाव शांत शांत भासू लागला होता. दुपारच्या या वखताला गावातले गडी लोकं मजुरीला म्हणून कामधंद्याला गेले की गावाचे गावपण हरवल्याचे भास होतात. अन् मग ओसाड माळरान असलेलं म्होरशी पिंपळे हे गाव अजूनच ओसाड वाटायला लागतं.

सकाळी सकाळी कामाची चालू असलेली लगबग, रानात जायची सर्वांची चालू असलेली ती गरबड. नदीवर धूनं धुवायला मुबलक वाहते पाणी असल्यामुळे धूनं धुवायला नदी तीरावर होणारी बायकांची गर्दी, एकसुरात कपडे आपटण्याचा तो आवाज, दुसरीकडे तिसरी कशी आहे चौथी ती तशीच आहे ही विचारपूस.

माणूस माणसाला खायला उठतो त्याचे जिवंत उदाहरण म्हणजे पहाटच्याला म्होरशी पिंपळे गावच्या शिवना नदी तीरावर धूनं धुवायला येणाऱ्या बायका.

शिवना नदीचे संथ, सतत वाहणारे पाणी तितकेच संथ असते जितके एखाद्या वृद्ध व्यक्तीचे आयुष्य. पुंजा आबांची ती सकाळी उठून अंघोळ पाणी आवरून तीन-चार वर्षाच्या नातवाच्या मुलाला देऊळात घेऊन जाण्याची धांदल. एका हातात शरीराला आधार असलेली काठी तर दुसऱ्या हाताच्या बोटात आपल्या पिढीचा आधार असलेला नातवाच्या लेकराला घेऊन पूंजा आबा रोज देऊळात जातो.

लेकराच्या हातात दोन अगरबत्त्या त्यांना त्याचं न्याहाळत चालत राहणं, मध्येच दगडाची ठेच लागून तोल जावून खाली पडनं. त्याला उठवतांना पुंजा आज्याची होणारी फजिती अन् मग दोघांचं तोल सावरत चालत राहणे, लेकराचं प्रत्येक वाक्याच्या शेवटाला प्रश्न विचारणे आज्याचं त्याला मोजक्या शब्दात उत्तर देणं चालू असते.

दहाच्या सुमारास कर्ते मंडळी गावातल्या मुख्य पेठेतून घरी येणं, न्याहारी करून वावरात रोजच्या कामाला जाणं, मजुरी करायला जाणं. अकरा वाजता गाव पूर्ण सामसूम होतो रात्रीची शांतता जशी भासते तशी ही शांतता असते.

गावातल्या प्रत्येक मोकळ्या गल्लीत वाहत राहणारा तो कोरडा, शुष्क वारा ओट्यावर बसलेल्या म्हाताऱ्यांना आधार असतो. झुंबरआई दाळी-साळी सुपात घेऊन दळण करत बसलेल्या, त्यांच्या सोबतीला चार म्हाताऱ्या त्यांच्या जीवनाचा सारीपाट सांगत धान्य निवडत बसलेल्या असतात.

या सगळ्यात कधी कोणाच्या शब्दाची जोड नाही भेटली तर एकट्यात ओव्यांशी जुळवून घेणं झुंबरआईचं चालू असते,पूर्वीची प्रत्येक स्त्री एक छान कवयित्री होती तिला ही देणगी पिढीजात भेटत असायची पण काळ बदलत गेला अन् ओवी संपत गेली. गावात त्या पिढीच्या दोनचार म्हाताऱ्या आहे झुंबरआई, झोल्याआई, विठाई, किस्नाई, मुसलमान मोहल्यातील इस्मत आपा.

तिच्या ओव्या तर जिव्हारी लागतात तिला पांडुरंगाचं भलते वेड दिवसातून पाच वेळ नमाज पडून इस्मत आपा दोन टाईम विठ्ठल रखमाईच्या देवळात दिवाबत्ती करती तिचं हे विठू माऊलीच्या भक्तीचं वेड साऱ्या गावाला माहित असल्याने तिच्या खेरीज गावातली देवाची कामं होत नाही.

इतकं तिने देवाला अन् गावाला अर्पण करून घेतलं आहे. तिचा धाकला लेऊक मोहम्मद चाचा गावातल्या मस्जिदमध्ये मौलाना आहे दोघे मायलेक देवाचं इतकं मनोभावे काम करतात, भक्ती करतात म्हणून गाव त्यांना मान देतो.

एक-दुसरा नुकताच म्हातारपणाचे डोहाळे लागणारा पांडू आबा, त्याला या वातावरणात फार करमत नाही त्याला काम लागतं.

मग तो कधीतरी अडगळीत असलेल्या खोलीत आवरासावर करत राहतो. कधीतरी काहीतरी टाकावू पासून टिकावू करत रहातो, कधीतरी कोऱ्या धुडक्यात व्यवस्थित गुंडाळून ठेवलेली पुस्तकं कितीवेळ तो वाचत रहातो.

म्हातारपणात शेवटच्या दिवसाला आधार असणारी बाज तो विणवून घेत असतो. ती ही अस्सल काथिनं मग त्या काथिला कितीवेळ पाण्यात भिजवून ठेवणे, लाकडाच्या त्या बाजीला कीड लागू नये म्हणून शेणानं चोपडून वाळवत ठेवणं मग दोन-तीन दिवस वाळवून झालं की, एका विशिष्ट पद्धतीने त्या बाजीला काथिने विणवुन घेणं.

जसजस गावातली ही म्हातारी माणसे कमी होवू लागली, तसतशी गावातली ती पिंपळाच्या पारावरची गर्दी दिसेनाशी झाली. सांजेच्या चार वाजेला मंदिरात होत असणारा हरिपाठ कधीच बंद पडला अन् गाव भकास बकाल वाटायला लागलं.

गावाचं गावपण हरवलं तेव्हाच, जेव्हा ही पारावर बसून गावाचा इतिहास जपणारी मंडळी गावाला परकी झाली या गावच्या प्रत्येक घरात एक कथा आहे.

क्रमशः

- भारत लक्ष्मण सोनवणे.

भारत सोनावणे

माझे नाव भारत लक्ष्मण सोनवणे, मी औरंगाबाद येथील रहिवासी आहे.माझं पदव्युत्तर MBA हे शिक्षण डॉ.भिमराव आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथून झालेलं आहे..!
साहित्य क्षेत्रातील माझा परिचय,माझे ललित लेख,कथा या दै.सकाळ,दै.लोकमत,दै.नवाकाळ,इत्यादी दैनिकातून प्रसिद्ध.तसेच अनेक साप्ताहिक,मासिक,दिवाळी अंक यात लेखन प्रकाशित.
अनेक कवी संमेलनात सक्रिय सहभाग,नवोदित युवा कवी म्हणून अनेक ठिकाणी माझ्या लेखनीचा सन्मान.ऑनलाईन माध्यमातून अनेक वेब पोर्टलसाठी फ्रीलांसर म्हणून सध्या मी लेखन करतो."Writing From a Blank Mind" या ललित लेखन,कथा,कविता,पर्यटन,इतिहास अश्या अनेक विषयांवर माझ्या ब्लॉग माध्यमातून जवळ जवळ १४ देशात माझं लेखन वाचले जात आहे..!