पकत्सा मरखो आणि टेन टेन

युवा लेख

युवा विवेक    20-Oct-2023   
Total Views |

पकत्सा मरखो आणि टेन टेन

ही दोन्ही नावे पाहून घाबरू नका. लडाखी गोड पदार्थांची नावे आहेत. लडाखी पदार्थांमध्ये एक गोष्ट समान आहे, ती म्हणजे बरेच पदार्थ वाफवून किंवा पाण्यात उकळून बनवलेले आहेत. तिकडे असलेल्या थंडीमुळेही असेल; पण त्यामुळे ते पदार्थ पौष्टिक आहेत. भौगोलिक दृष्ट्या पाहिले, तर तिकडे दूध-तुपाची कमतरता असल्याने तळण कमीच असणार.

पकत्साचा उच्चार काहीसा चायनीज/तिबेटी स्टाईलचा आहे. मुरकू म्हणजे चकली हे दक्षिण भारतीयांना माहीत आहे; पण मरखो म्हणजे लोण्याचा सॉस. पकत्सा मुरखू पण असाच वाफवलेला गोड पदार्थ आहे. यासाठी कणिक पाण्यात भिजवतात. अगदी पोळ्यांसाठी भिजवतो तशी. त्याचे लहान गोळे करून हाताच्या पहिल्या आणि दुसऱ्या बोटात दाबून एक आकार दिला जातो. मथुरेचे पेढे कसे चौकोनी नाही, पण गोलही नाही अशा वेगळ्याच आकाराचे असतात. तसेच मला हे गोळे वाटले. हे गोळे गरम पाण्यात उकळले जातात. एक प्रकारचा पास्ताच म्हणू शकतो. पाच मिनिटे उकळल्यावर पाण्यातून काढले जातात, हेच ते पकत्सा. आता मरखो बनवताना लोण्यात हे वाफवलेले पकत्सा टाकून परतले जातात. दोन मिनिटांनी साखर टाकून ती विरघळल्यावर त्यात याक चीझची पावडर टाकतात. याऐवजी पार्मासॅन चीझ टाकले तरी चालते. चीझ वितळले, की सर्व्ह केले जाते. काहीशी मऊ, गुळगुळीत डिश आपल्याला आवडेल की नाही सांगता येणार नाही; पण वेगळी नक्कीच आहे. याच पदार्थाला तिबेटमध्ये भक्तसा मारकू म्हणतात. हा पदार्थही तिबेटहून इकडे आला असावा.

दुसऱ्या पाककृतीला खाल्ल्यावर दहा पैकी दहा मार्क्स मिळाले असणार म्हणून त्याचे नाव टेन टेन ठेवले असावे, असा वाईट जोक कोणालाही सुचू शकतो; पण तसं नाहीये. टेन टेन म्हणजे लडाखी पॅनकेक्स/धिरडे आहेत. यासाठी अंडे थोडेसे फेटून त्यात बकव्हीटचे पीठ मिसळतात. अंड्याऐवजी थोडा मैदा पाण्यात मिसळून वापरू शकतो. थोडे मीठ आणि शहाजिरे घालून पाण्यात पातळ भिजवतात. मिठाऐवजी साखर घातली तर गोड पॅनकेक्स बनवता येतात. लोणी किंवा तेलात हे मिश्रण टाकून धिरडे बनवावे. यासोबत अक्रोडची चटणी असते. कांदा किंवा कांद्याची पात, अक्रोड आणि मीठ बारीक वाटून चटणी बनवतात. गोड टेन टेन असेल, तर त्यासोबत जर्दाळूचा जॅम देतात. टेन टेन आणि अक्रोड चटणी अगदी डोसा-चटणी सारखे दिसतात. टेन टेन गोड असतील तर पॅनकेक म्हणू शकतो, खारे असतील तर धिरडे किंवा डोसा म्हणू शकतो. काही प्रकारात हे पीठ रात्रभर फर्मेंट केले जाते आणि दूध/चहासोबतही खातात.

हे दोन्ही पदार्थ तुम्हाला लोकल कॅफेत मिळतील. टेन टेनचे ९९ डोसा सारखे प्रकार बनलेत का? हे मला माहीत नाही; पण बनवायला हरकत नाही. याक चीझ वगैरे टेन टेनवर पसरवून नवीन प्रकार बनू शकतो. पकत्सा मरखो आपण घरी बनवू शकतो; पण आवडीने खाऊ की नाही ते सांगता येत नाही; पण दुसरे धिरडे मात्र नक्कीच बनवू शकतो. अक्रोडची चटणी बनवण्याइतके श्रीमंत कोणी असेल, तर तेही सोपे आहे. डोसासोबत अक्रोडची अशी चटणी दिली, तर त्याला प्रीमियम डोसा नक्कीच म्हणता येईल. पॅनकेकसोबत गोडमिट्ट सिरप किंवा मध ओतण्यापेक्षा जर्दाळूचा जॅम हा चांगला पर्याय आहे. किती नवल आहे ना, आपल्याकडे इंडो-चायनीज, इंडो-अमेरिकन पदार्थ आहेत; तसंच आता लडराठी (लडाख आणि मराठीची संधी) वगैरे प्रकार बनवायला हरकत नाही.

- सावनी