गावची उतारवयातली माणसं..! भाग - २

युवा कथा

युवा विवेक    26-Oct-2023   
Total Views |

गावची उतारवयातली माणसं..!

संग्रामवाडी साठ- सत्तर उंबऱ्याचं हे गाव. सांगितल्याप्रमाणे गावात नेहमीच म्हाताऱ्या माणसांचा बोलबाला असायचा त्याला कारणेही अनेक होती. गावाला शहर जवळ असल्या कारणाने, शहरात रोजगार मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाला अन् गावची तरुण पिढी शहराला जवळ करू लागली. घरात दोन भाऊ असेल तर एक शहराला अन् एक गावात असलेली आपली थोडीथिडकी बिघाभर जमीन ओलिताखाली आणीत होता.

साठ- सत्तर उंबऱ्याचं संग्रामवाडी हे गाव असलं तरी दोन - तीन एकरांच्या वर रान गावात कुणाला नव्हतं. त्यामुळं गाव,गावातील गावकरी मंडळी सुखात नांदत होतं. घरची कामं आवरली गावच्या बायका टोळी करून मुकरदम समिना आपाच्या संगतीने जवळपासच्या पाच - सहा गावात कामाला जायच्या.

बरसदीच्या दिवसात घरची कामे आवरली की, गावात पहाटे दोन-चार रिक्षा यायच्या अन् गावातल्या बायकाना मजुरीला म्हणून दुसऱ्या गावात घेऊन जायच्या. गावात शेती कमी असल्यानं बारा महिन्यातून नऊ-दहा महिने या बायका शेजारी असलेल्या गावातील मोप जमीन असलेल्या मंडळीकडे कामाला जायच्या.

कामाचा उरक बघून मग रोजंदारी ठरायची अन् हीच रोजंदारी मग साऱ्या आठ-दहा गावातील बायका घ्यायच्या, त्यात कुठला बदल होत नसे. कमी दिवसात जास्तीची कामं ओढायची असली की मग आपा ठरवून उक्त्या सुपाऱ्या घ्यायची. अन् तीन - चार दिवस तिची टोळी ढोरकष्ट करून पंधरादी भराचा रोजगार मिळवायची. एकूण मोप रोजंदारी अन् गावातील थोड्या बहुत शेतीतून मिळणारे उत्पन्न या एव्हढ्या वार्षिक मिळकतीवर गाव सुखी, समाधानी जीवन जगत होता.

गावात बिरोबाची बारमाही जत्रा भरत होती. त्यामुळं गावात जत्रेच्या काळात गावच्या लोकांची चलती असायची. पंचक्रोशीतील आठ-दहा गावं या पाच दिवस चालणाऱ्या बिरोबाच्या जत्रेला येऊन जायची. बिरोबा नवसाला पावत असायचा म्हणून अडलेल्या - तडलेल्या गावच्या लेकी सुना बिरोबाला उन्हाळ्याच्या सुरुवातीला जत्रा भरली की गोटी आंब्याची आरास घालायच्या.

बिरोबाने त्यांची दुवा कबूल केली तर पुढच्या नऊ महिन्यात गावची लेकबाळ पोटुशी राहून तिचा पाळणा हलायचा. असा बिरोबा अन् त्याची ख्याती अख्ख्या पंचक्रोशीमध्ये होती अन् त्यामुळं संग्रामवाडीचे नेहमीच गावांच्यात आपलेपण अन् या गावाकडे लोकांची ओढ होती.

गावच्या दक्षिणेला शिवना माय दर सालाला दुथडी भरून वाहत असायची. दुधाप्रमाणे पांढरे,शुभ्र असे तिचं पाणी नेहमीच खडकांच्या या रानात तिच्या पात्राशी खेळ करायचं. गावच्या एका अंगाला असलेल्या महादेवाच्या देऊळात सन वार असलं की, लोकं दिवाबत्ती करायला येऊन जायची. नाहीतर गावचं हे देऊळ सतत ओस पडलेलं असायचं. देऊळ पहाऱ्याला असलेल्या रंगाजी आबांची एक वेगळी कथा होती.

त्याला माणसं नकोशी वाटत, माणसांचा सहवास नकोसा वाटत म्हणून तो नव्वदीच्या वयात संसारातून मुक्त होऊन महादेवाच्या देवळात आश्रयाला आला. एक खाटेवर त्याचा संसार, संसार तरी काय झोपायचं अंथरूण, पांघरूण अन् दोन जोडी कपडे. एक डेकची पाणी तापायला.

गावकऱ्यांच्यात त्याची दोन टाईमची भाकर बारीला लाऊन दिली होती. दोन टाईम गावातून भाकर आली की ती घेण्या इतकाच रंगाजी आबांचा गावकऱ्यांशी संबंध यायचा. नाहीतर तो रोज आपलं देउळ झाडून काढायचा, झाडाला पाणी घालायचा, महादेवाच्या पिंडीवर असलेलं दोन हंड्याचं मडके कॅनीत धापा मारीत नदीतून पाणी आणून त्याला भरून ठेवायचा.

इतकं सगळं काम केलं की तो थकून जायचा. मग गावात ज्याची बारी असायची त्याच्या घरचं कोणी फडक्यात न्याहारी घेऊन यायचं.मग रंगाजी आबा महादेवाच्या देवळात असलेल्या एक शिंग तुटलेल्या नंदीजवळ बसून त्याच्या मोहरे चतकुर कूटका ठेऊन न्याहारी करायचा. दात तुटले असल्यानं कितीवेळ तो तोंडातला घास घोळीत राहायचा.

आर्धी चतकोर पोटात गेली की मग गाडग्यातून तोंडाला ओघळ लागेपर्यंत पाणी प्यायचा अन् नंदीला मान टेकून तिथेच झोपी जायचा. त्याची भात्यासारखी झालेली छाती मग एक सुरात वरखाली व्हायची अन् तंद्री लागावी तसं रंगाजी आबा तिथेच झोपी जायचा. देवळात वारंवावधान यायचं सारा सागाच्या झाडाचा पालापाचोळा उडायचा अन् या पालापाचोळ्यात रंगाजी आबा मेल्यागत झोपून राहायचा.

मग वावधन शांत झालं की रंगाजी आबा उन्हाच्या झळांनी आलेला घाम उपरण्याने पुसून काढीत अन् गाडग्यात असलेलं उरलेलं पाणी वाऱ्यावावधनाची घान गेल्यानं त्याला फुंकून फुंकून चहा पिल्यागत प्यायचा अन् मग फडकी घेऊन उकीडवा बसूनच फरफटत फरफटत सारं सभामंडप झाडून काढायचा.

क्रमशः

- भारत लक्ष्मण सोनवणे.

भारत सोनावणे

माझे नाव भारत लक्ष्मण सोनवणे, मी औरंगाबाद येथील रहिवासी आहे.माझं पदव्युत्तर MBA हे शिक्षण डॉ.भिमराव आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथून झालेलं आहे..!
साहित्य क्षेत्रातील माझा परिचय,माझे ललित लेख,कथा या दै.सकाळ,दै.लोकमत,दै.नवाकाळ,इत्यादी दैनिकातून प्रसिद्ध.तसेच अनेक साप्ताहिक,मासिक,दिवाळी अंक यात लेखन प्रकाशित.
अनेक कवी संमेलनात सक्रिय सहभाग,नवोदित युवा कवी म्हणून अनेक ठिकाणी माझ्या लेखनीचा सन्मान.ऑनलाईन माध्यमातून अनेक वेब पोर्टलसाठी फ्रीलांसर म्हणून सध्या मी लेखन करतो."Writing From a Blank Mind" या ललित लेखन,कथा,कविता,पर्यटन,इतिहास अश्या अनेक विषयांवर माझ्या ब्लॉग माध्यमातून जवळ जवळ १४ देशात माझं लेखन वाचले जात आहे..!