थुकपा - लडाखी नूडल सूप

युवा लेख

युवा विवेक    06-Oct-2023   
Total Views |

थुकपा - लडाखी नूडल सूप

लडाखला गेलात आणि हे सूप प्यायले नाही तर मुंबईत जाऊन वडापाव न खाल्ल्यासारखे आहे. फरक इतकाच, की वडापावच्या मानाने थुकपा बऱ्यापैकी पौष्टिक आहे. पंजाबी पदार्थ पाकिस्तानमध्येही मिळतात. केरळ, तामिळनाडूचे पदार्थ श्रीलंकेत आवडीने खाल्ले जातात, तसंच थुकपासुद्धा नेपाळ, भूतानमध्ये खाल्ला जातो. थोडाफार नूडल्स आणि चवीत फरक असेल; पण लोकांचे प्रेम मात्र या साध्याभोळ्या पदार्थाला सारखेच आहे. आतापर्यंत मी जितक्या लडाखी पदार्थांबद्दल लिहिले त्यापैकी थुकपा आणि मोमोज बऱ्याच लोकांना माहीत आहेत. मोमोज तर दिल्लीवालोकी जान वगैरे बनले आहेत.

नेपाळ, भूतान आणि बाकी राज्यांमध्ये मैदा/गव्हापासून नूडल्स बनवतात; पण लडाखमध्ये बकव्हीट किंवा सातूपासूनही नूडल्स बनवल्या जातात. तिबेटी परंपरेत नूडल्सचे अनेक प्रकार आहेत जसे की थेंतूक (पीठ ताणून बनवलेल्या नूडल्स), घ्यातूक (चायनीज नूडल्स), पाथुक (लाटून बनवलेल्या नूडल्स). पारंपरिक तिबेटियन पाककृतीत थुकपा बनवण्यासाठी आधी मटण, मीठ आणि मिरेपूड टाकून शिजवतात. मग त्यात ताज्या तयार केलेल्या नूडल्स घालून उकळतात. तिबेटी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी घुटुक नावाचा स्पेशल थुकपा बनवला जातो. (सूप पिताना घुटुक आवाज येतो म्हणून असे नाव ठेवले असेल.)

हा पदार्थ भारतात कसा आला याची कथा रंजक आहे. १९५९ मध्ये दलाई लामा भारतातील निर्वासितांना भेट देण्यासाठी आले होते. त्या सगळ्या प्रवासादरम्यान त्यांच्याकडे फार सामान नव्हते, तेव्हा त्साम्पा (भाजलेलं सातूचे पीठ जे बटर चहामध्ये टाकून खातात.) आणि थुकपा इतकेच पदार्थ खात होते. निर्वासितांच्या कॅम्पला भेट देतांना त्यांनी थुकप्याची ओळख लोकांना करून दिली आणि हा सोपा पदार्थ भारतात लोकप्रिय झाला.

मांस किंवा भाज्यांचे सूप आणि त्यात नूडल्स इतके सोपे रूप आहे या पदार्थाचे. आता भारतीय लोक म्हटल्यावर आपण त्यात मसाले वगैरे टाकले आणि अजून चविष्ट बनवला. दलाई लामांची ही मॅगी आता भारतात बऱ्याच ठिकाणी मिळते. आपणही तिबेटियन रेस्टारंटमध्ये गेलो की थुकप्याचा आस्वाद घेऊ शकतो. यासाठी लागणाऱ्या नूडल्स ऑनलाईन मिळतात; पण सूप नाही. भारताचे दुर्दैव की आपल्याकडे दूर देश कोरियातले रामेन पॅकेटमध्ये मिळते पण जवळचा थुकपा नाही. असो! असेच एखादे नूडलसूप आपणही एखाद्या पावसाळी संध्याकाळी बनवू शकतो.

- सावनी