गावची उतारवयातली माणसं..! भाग - ५

युवा कथा

युवा विवेक    22-Nov-2023   
Total Views |

गावची उतारवयातली माणसं..! भाग - ५

गवंडी बाबाचं दर आषाढी-कार्तिकेला वारीचं विठ्ठल-रखमाई दर्शन घ्यायला जाणं कधी चुकत नसायचं. हिवाळ्याची चाहूल लागली की, गवंडी बाबाचं वारीला जाण्याचं खूळ डोक्यातून वर येई अन् मग वारीला जाण्यासाठी त्यांच्या तयारी सुरू व्हायची. गवंडी बाबा जरी काम धंद्यासाठी गवंडी असला, मुळात मात्र तो सगळीच काम करायचा. त्यानं पंचविशीत गावच्या एकमेव धोंडू शिंप्याच्या पोराच्या संगतीने शिकाऊ कपडे शिवण्याचे काम शिकून घेतले होते. उभे आयुष्य त्यानं त्याची कपडे स्वतःच शिवून घेतली.

पुढं गवंडी बाबा उभे आयुष्य ढोर मेहनत करत राहिला, कष्टाची कामं करत राहिला. अन् गवंडी कामासाठी गावोगाव या गावातून त्या गावात सायकलीवर भटकत राहिला अन् वीस - तीस फुटांवर बांधलेल्या पालकावर थरथरत्या पायांनी लोकांच्या भिंती चोपड्या करत राहिला. त्यानं त्याच्या आयुष्यात किती घरं बांधली याची काही गिनती नव्हती.

वयाच्या बारा सालाचा असेल तेव्हा गवंडी बाबा गावातले मिस्तरी एजाज खान यांच्या इथे हजरीवर मजुरी करायला सुरुवात केली. एजाज खान मिस्तरी यांचा तालुक्याला मोठाल्या लोकांत उठबैस होती, आमदार लोकपर्यंत त्याची पोहच होती. त्यामुळे कुठल्या गावात काही सरकारी काम आले की एजाज खान मिस्तरी गोड बोलून चार लोकांना पार्ट्या देऊन ते काम आपल्याकडे ओढून घ्यायचा. मग गवंडी बाबासारखी हुशार मजूर बघून त्यांना दोन पैके जास्त देऊन, ती कामं दिल्या कालावधीत पूर्ण करून घेत असायचा.

त्यामुळं व्हायचं काय की, गवंडी बाबाला कामाची कधीच कमतरता नव्हती. पण; सुरुवातीला आठ-दहा वर्ष मिस्तरीच्या हाताखाली मजुरी केल्याने गवंडी बाबा पार कंबरातून वाकून गेला होता. पुढे स्वतः मिस्तरी झाला अन् त्याच्या शेजारच्या दोन-चार गावात त्यानं कित्येक घरं बांधली पांढऱ्या मातीत बांधली. तेव्हाचा तो काळच होता, आमच्या गावाला जुन्या पडक्या गढीच्या वाड्याजवळ पांढऱ्या मातीचा बराच साठा होता. म्हणजे ती जमिनच मुळात पांढऱ्या मातीची होती.

मग तिथून लोकं घरं बांधायला म्हणून बैलगाडीने, कधी खेचरावर दोन गोणपाटची झुल करून ती पांढरी माती घर कामाला घेऊन येत. अन् गवंडी बाबा कुंभार जसा मडकी गाडगी घडविण्यासाठी पायांनी चिखल तुडवत असतो तसे तो चिखल तुडवत,भाजलेल्या वीटकराचे भिंती बांधत असताना गळे भरायचा. असं करत मग हळूहळू वर्ष-सहा महिन्यांत एखादं घर गावच्या वेशीला उभे राहायचे.

मग घर उभे झालं की मग विहीरभरणी होते तशी घरभरणी व्हायची. मग अश्यावेळी गवंडी बाबाला शाल,श्रीफळ अन् डोक्याला मुंडासे,फेटा म्हणून कापड दिलं जायचं. मग गवंडी बाबा तो गुलाबी रंगाचा फेटा घालून गावभर स्वतःला मिरवत असे. गावात कुणी लोकं घर कामाचा सौदा करायला आले की,पारावर गप्पा झोडीत बसलेल्या लोकांना विचारत असत. गुलाबी फेटा घालणारे गवंडी बाबा कुठशीक राहतात..? अन् मग गावातल्या एखाद्या लहानग्या पोराला पाठवत गावची मंडळी त्यांना गवंडी बाबाचे घर दाखवत असे.

घर कसले मक्काच्या पाचटाचा अन् तुरीच्या पळकट्याची संगनमत करून विणलेल्या भिंती अन् हेच ते घर वजा गवंडी बाबांच सप्पर होतं. त्यात मग सपराच्या पुढे टाकलेली वेताने विणलेली खाट, सासऱ्याने आंदण म्हणून दिलेली म्हैस अन् तिचं पिल्लू बसलेलं असायचं. लोकांना वाटायचं गवंडी बाबाचे घर खूप ऐसपैस असेल पण तसं काही नव्हतं.

लोकांची घरं बांधत बांधत गवंडी बाबाच घर मात्र शेकारल्या भिंतीच अन् साधेच राहून गेलं होतं. त्याला याचं कधी दुःखही झालं नाही, उलट येणाऱ्या चार पाहुण्यांचे तो अगदी प्रेमाने या घरात स्वागत करत असे. आदरतिथ्य करत असे.

गवंडी बाबा पहाटेच त्याचं नित्य नियमाने उठून अंघोळपांघोळ करून चारलाच काकड्याला जात असे. काकड्यातून टाळ कुटून आला की मग घंटाभर देव्हाऱ्यातील सर्व पितळी देवांना दूधापाण्यात धुवत असे. पूजा करून धुपबत्त्ती बाहेर डब्ब्यात लावलेल्या तुळशीला मनोमन प्रार्थना करून पूर्वेला उगवत्या सूर्याला पाणी दाखवत असे.

पंढरपूराच्या दिशेनं तोंड करून सपरात बसून विठ्ठल रखुमाईच्या नावाचा धावा करत असे. अन् मग घराचे बांधकाम करण्यासाठी या सपरातच कित्येक सौदे पूर्ण होत, चहाच्या घोटावर तर कधी पिठले भाकरीच्या न्याहारीवर इसार देऊन घर बांधण्याची बोली सुटत असायची आणि मग ईसार म्हणून गवंडी बाबा दिलेली रक्कम स्वीकार करत असे.

क्रमशः

भारत लक्ष्मण सोनवणे.

भारत सोनावणे

माझे नाव भारत लक्ष्मण सोनवणे, मी औरंगाबाद येथील रहिवासी आहे.माझं पदव्युत्तर MBA हे शिक्षण डॉ.भिमराव आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथून झालेलं आहे..!
साहित्य क्षेत्रातील माझा परिचय,माझे ललित लेख,कथा या दै.सकाळ,दै.लोकमत,दै.नवाकाळ,इत्यादी दैनिकातून प्रसिद्ध.तसेच अनेक साप्ताहिक,मासिक,दिवाळी अंक यात लेखन प्रकाशित.
अनेक कवी संमेलनात सक्रिय सहभाग,नवोदित युवा कवी म्हणून अनेक ठिकाणी माझ्या लेखनीचा सन्मान.ऑनलाईन माध्यमातून अनेक वेब पोर्टलसाठी फ्रीलांसर म्हणून सध्या मी लेखन करतो."Writing From a Blank Mind" या ललित लेखन,कथा,कविता,पर्यटन,इतिहास अश्या अनेक विषयांवर माझ्या ब्लॉग माध्यमातून जवळ जवळ १४ देशात माझं लेखन वाचले जात आहे..!