श्रीमंत चोरी!
मला कराविशी वाटते 'तशी' चोरी, मनापासून.. अगदी मनापासून. आणि मिरवावसं वाटतं स्वतःला तसा चोर म्हणून.. त्यांचा चोर म्हणून!
'चोरी' हा शब्द आपल्या मनात एक स्वाभाविक नकार निर्माण करतो. तसं होणंही अगदीच सहज आहे. बहुधा गरजेचंही! किती साधा सोपा शब्द, पण आपल्यासोबत भयानक परिणामांची नकोशी जाणीव घेऊन येणारा. या शब्दाचा अर्थ, व्युत्पत्ती वगैरे सांगायची गरजच नाही, इतका प्रचलित आहे हा शब्द, ही घटना. पण मी म्हणतोय ती चोरी वेगळी. अगदीच वेगळी. कारण एरवी रस्त्यावर, घरात होणारी पैशांची, धनसंपत्तीची, सोन्यानाण्याची, मालमत्तेची चोरी मी म्हणतो त्या चोरांसाठी फार क्षुद्र आहे. कारण ती चोरी श्रीमंत नाही!
तुम्हाला वाटेल, की चोरी थोडीच श्रीमंत असते? आपण ज्या अर्थाने आणि ज्या चोरीबद्दल सतत ऐकत असतो ती चोरी नक्कीच श्रीमंत नाही. तशा चोर्या मग कितीही मोठ्या केल्या तरी त्या, त्या चोरांना श्रीमंत करुही शकत नाहीत. कारण श्रीमंत होण्यासाठी आधी 'श्री'चा अर्थ तर कळायला हवा! तो कळतो तो फार थोड्यांना.. आणि समोर असणारी 'श्री'ची समृद्धीही फार मोजक्या लोकांच्या आत झिरपते.
समाजातल्या बघुधा सगळ्याच अंगांमधे कसली ना कसली चोरी सहज दिसून येते. मग अगदी 'साहित्य' हा भागही त्यापासून वंचित राहिलेला नाहीय! त्यात चोरी होतीये म्हणजे तोही समाजातला किंबहुना जीवनातला एक अविभाज्य भाग आहे असं ज्यांना समजायचं राहून गेलं होतं त्यांनी किमान यातून समजून घ्यावं, ही गंमत. पण 'साहित्य' आणि 'चोरी' हा विषय फार आस्थेचा वाटू लागलाय. मनामधे एक स्वतंत्र जिव्हाळा निर्माण करणारा. आजकाल आपण अनेकदा आणि विषेशतः लिहित असू तर पाहातोच की अमूक एकाच्या 'कविता, चारोळ्या, लेख, कथा..काहीही' दुसर्याच कुणाच्या नावे फिरत असतात. बिनधास्तपणे. फेसबूकसारख्या माध्यमांतून तर हा प्रकार अधिक सुलभतेने घडताना दिसतो. पण मी म्हणतोय ती चोरी ही नाही.
'उत्तर रामचरीत' लिहिलं ते भवभूतीने. आपण त्याला रामचरीतासाठी विशेष ओळखतो. पण म्हणून ते रामचरिताच्या आधारावर आहे म्हणून आपण थोडीच त्याला चोरी म्हणतो? 'मध्यमव्यायोगा'सारखी नाटकं महाभारतावर आधारित असली, एखादं नाटक भारती कथेचीच गोष्ट सांगणारं असलं तरी आपण कुठे त्याला चोरी म्हणून हिणावतो? त्याला स्वतंत्र अभिजात कलाकृतीचा दर्जा आपण सन्मानाने देत आलो आहोत. त्याच्या मुळाशी मर्मज्ञ रसिकता तर आहेच, शिवाय एक उत्तम आणि निर्भेळ अशी वाड्मयीन जाण आहे. संस्कृतात रामायण महाभारतावर आधारलेल्या कितीतरी उत्कृष्ट साहित्यकृती आपल्या नजरेस पडतात. याला मराठी साहित्याचा अपवाद निःसंशय नाहीच. अगदी 'पुराणमूला' म्हणवणार्या, पुराणातील गोष्टी चितारणार्या कितीतरी काव्यात्म नाट्यात्म कलाकृती भाषाभाषांमधे दिसून येतात. त्या कथाही हळूहळू केवळ पुराणातील म्हणून न ओळखता त्यांच्या लेखककविंच्याच नावे जोडल्या जातात. किती सहज होते ही प्रक्रिया... होत आली आहे आणि राहिलही. बर्याचदा त्याच कथा काही बदलांसह सामोर्या येतात, निराळ्या दृष्टीकोनांतून आकार घेतात तर कधी तशाच अधिक विस्ताराने रंगवलेल्या दिसतात. म्हणून आपण त्यांना चोरी म्हणत नाही. नक्कीच नाही. सुजाण वाचकमनाला त्या कृतिमागचं लेखकाचं स्वतंत्र पण मुळ वाड्मयाशी अस्सल नाळ असलेलं अधिष्ठान जाणवतं. कधीकधी तर ते इतकं विलक्षण असतं, की दोन्हींमधली भेदरेषा हळूहळू विरघळून जाते. किती श्रेष्ठ चोरी म्हणावी याला! लोभस! जिचा मनापासून हेवा वाटावा.. मुक्तपणे तो व्यक्त करता यावा आणि ज्याची प्रांजळ स्पृहा करता यावी अशी चोरी. श्रीमंत!
रामकथेचे अगदी मराठी भाषेतील रुप बघा ना. किंवा कृष्णकथेवर आधारित रसपूर्ण साहित्यनिर्मिती. संत साहित्यात ओवीवांग्मयापासून ते भारुड गौळणींपर्यंत या व्यक्तीप्रसंगांची अनेकानेक अभिनव आवर्तनं आपल्या दिसून येतात. केवळ दिसूनच येत नाहीत, तर रमवतात, मोहवतात, सुखावतात! त्यामागचं कारण म्हणजे मूळ वैदिक वा पौराणिक बीजाचं सशक्त असणं आहेच, पण त्याचबरोबर नंतरच्या रचियत्याचा स्वतंत्र प्रातिभस्पर्श तेवढाच सामर्थ्यशील असतो. अगदी अलिकडे पाहिलं, तरी ज्ञानदेवांचे त्यांचे असे कित्तितरी शब्द आपण वापरतो. रुपकं, कथा स्वतंत्रपणे आपल्या कृतिमधे आपल्या शब्दांतून योजतो. आत्तापर्यंतच्या काही फार मोठ्या प्रसिद्ध प्रतिभावंतांनी आपल्या कवितांमधे, गीतांमधे अशा शब्दांचा, प्रतिमारुपकांचा चपखल उपयोग केलेला दिसतो. पण याला आपण चोरी थोडीच म्हणतो ? कारण शेवटी ते आपलंच तर संचित आहे. आपलं आणि आपल्यासाठीचं!
तेव्हा वाटतं, की करता यावी अशी चोरी आपल्यालाही. पण त्यासाठी खरोखरंच धैर्य लागतं. केवळ संदर्भांचे कळते न कळते धागे जोडून होत नसते अशी चोरी. तिची प्रक्रिया अशी शब्दांत थोडीच सांगता येते!? त्यासाठी मनापासून धडपडणारा चोर होऊनच करावं लागतं सगळं. मग अंधार दूर सारत, बिथरत.. पण निश्चय बाळगून सिद्ध होतो पण. आणि घडून येते चोरी. हवी तशी किंवा खरंतर अपेक्षेपेक्षा फार मोठी! पण धाडसासोबत लागतो तो साधनेचा अखंड निगर्वी सूर. शिवाय 'त्याचं' अधिष्ठान तर नित्यमेव अपरिहार्य!
म्हणून वाटतं की लिहिता यावं असं काही जी ठरेल श्रीमंत चोरी! त्यातील आशयांची समृद्धी आपाल्याला श्रीमंत तर करेलच शिवाय वाचकालाही ती श्रीमंती आपलीशी वाटेल. अगदी आपलीशी. जी तोही अखंड जोपासू शकेल मनाच्या आकाशात. एकाचवेळी आपण अनेकांसह श्रीमंत होणं हेच तर खरं श्रीमंत होणं आहे. अशाच श्रीमंतीची इच्छा करतो आहे. अशा चोरीचं सामर्थ्य मागतो आहे.
आणि जमलंच, तर होऊन जाईल संचित.. ज्यामधून होत रहातील अशाच अभिनव चोर्या अशा चोरीची प्रार्थना करतो आहे.
म्हणून म्हटलं..
मला कराविशी वाटते 'तशी' चोरी, मनापासून.. अगदी मनापासून. हीच प्रार्थना करतो आहे.
~ पार्थ जोशी.